हिरेबागेवाडीत आढळला दुर्मीळ उडणारा बेडूक
गावात निसर्गाचा अद्भूत आविष्कार : हवेत पॅराशूटप्रमाणे तरंगू लागला
वार्ताहर/बाळेकुंद्री
बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे दुर्मीळ उडणारा बेडूक आढळून आला आहे. गावातील बसस्थानकाजवळ असलेल्या माईस कम्प्युटर कार्यालयाच्या दरवाजावर शुक्रवारी सकाळच्या सुमारास हा बेडूक आढळून आल्याने गावातील बघ्यांची एकच गर्दी झाली होती. या बेडकाला वैज्ञानिक भाषेत (मलबार ग्लायडिंग फ्रॉग) म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सापडणारा हा अनोखा बेडूक उभयचर असून वर्षातील जवळपास आठ महिने निद्रावस्थेत घालवतो.
पश्चिम घाटातून बेडकाचे आगमन
हिरेबागेवाडी गाव हा पश्चिम घाटाचा भाग नाही. तथापि गावात हा एक उडणारा बेडूक आढळला आहे. सदर बेडूक अंडी देण्यासाठी झुकलेल्या झाडाच्या फांदीला घरट्यासाठी पसंती देतात. अंड्यातून तयार झालेली बेडकाची पिल्ले थेट खाली पाण्यात पडतात. महाराष्ट्र पश्चिम घाटाच्या पाण्याच्या प्रवाहासोबत तरंगत तरंगत येऊन या गावच्या ठिकाणी त्या बेडकाची संततीची उत्पती झाल्याचा अंदाज आहे.
-मंजुनाथ एस. नायक, वन्यजीव अभ्यासक