सुपरहिरो चित्रपटात रणवीर सिंह
रणवीर सिंह सध्या धुरंधर चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. अलिकडेच चित्रपटाच्या सेटवरून रणवीरचा लुक सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रणवीर आता पुढील काळात दिग्दर्शक बेसिल जोसेफ यांच्या आगामी चित्रपटाची तयारी करत आहे. या चित्रपटात रणवीरची एका दिग्गज बॉलिवूड अभिनेत्रीसोबत जोडी जमणार आहे. वामिका गब्बी आता रणवीर सिंहसोबत बेसिल जोसेफ यांच्या चित्रपटात काम करणार आहे. हा चित्रपट शक्तिमानचे बॉलिवूड रुपांतरण असू शकतो.
या चित्रपटासंबंधी मागील 5 वर्षांपासून काम सुरू आहे. वामिका देखील या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असून रणवीरसोबत ती पहिल्यांदाच काम करणार आहे. वामिका पुढील काळात अदिवी शेष आणि इम्रान हाश्मीसोबत जी2 चित्रपटात दिसून येणार आहे. वामिका गब्बीने 2007 मध्ये इम्तियाज अली याचा चित्रपट ‘जब वी मेट’द्वारे बॉलिवुडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने करिना कपूरच्या चुलत बहिणीची भूमिका साकारली होती. यानंतर तिने मौसम, बिट्टू बॉस, 83, खुफिया आणि बेबी जॉन यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.