रणजी करंडक राहणार महाराष्ट्रातच
अजिंक्यपदाच्या लढतीत मुंबई व विदर्भ झुंजणार : उपांत्य सामन्यात विदर्भाचा मध्य प्रदेशवर 62 धावांनी विजय
वृत्तसंस्था/ नागपूर
चुरशीच्या उपांत्य लढतीत तुल्यबळ मध्य प्रदेशला 62 धावांनी नमवत विदर्भ संघाने रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. नागपूरच्या सिव्हिल लाईन्स मैदानावर झालेल्या या मुकाबल्यात विदर्भाला पाचव्या आणि अंतिम दिवशी पाच विकेट्सची तर मध्य प्रदेशला 93 धावांची आवश्यकता होती. पण विदर्भाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत अवघ्या तासाभरात मध्य प्रदेशचा डाव गुंडाळला आणि दिमाखदार विजय साकारला. आता दि. 10 ते 14 मार्च या काळात होणाऱ्या अंतिम लढतीत विदर्भाची लढत 41 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या मुंबईशी होईल. विशेष म्हणजे, दोन्ही पैकी कोणत्याही संघाचा पराभव झाला तरी रणजी करंडक यंदा मात्र महाराष्ट्रात राहणार हे निश्चित आहे. विदर्भाकडून दुसऱ्या डावात 141 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या यश राठोडला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आले.
येथील नागपूर क्रिकेट असोशिएनच्या मैदानावर विदर्भाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या डावात अवघ्या 170 धावांत विदर्भाचा संघ सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशने पहिल्या डावात 252 धावा केल्या व 82 धावांची आघाडी घेतली. यानंतर विदर्भाने दुसऱ्या डावात ज्या पद्धतीने पुनरागमन केले, याची कोणालाच अपेक्षा नव्हती. यश राठोडने 200 चेंडूत 141 धावा केल्या. कर्णधार अक्षय वाडकरने 77 तर अमन मोखाडेने 59 धावांचे योगदान दिले. या जोरावर विदर्भाने दुसऱ्या डावात 402 धावा केल्या व मध्य प्रदेशसमोर विजयासाठी 321 धावांचे लक्ष्य ठेवले. मध्य प्रदेशकडून अनुभव अग्रवालने पाच विकेट घेतल्या.
मध्य प्रदेश 258 धावांत गारद
विजयी आव्हानाचा पाठलाग करताना मध्य प्रदेशची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावातील शतकवीर हिमांशु मंत्री 8 धावा काढून बाद झाला. यानंतर यश दुबे व हर्ष गवळी यांनी शतकी भागीदारी करत संघाला सावरले. हर्ष गवळीने 11 चौकारासह 67 धावा केल्या. हर्ष बाद झाल्यानंतर यशने एका बाजूने बराच काळ किल्ला लढवला पण विदर्भने दुसऱ्या बाजूने सातत्याने विकेट्स घेत मध्य प्रदेशच्या डावाला खिंडार पाडले. अनुभवी सागर सोळंकी (12) व कर्णधार शुभम शर्मा (6) पाठोपाठ बाद झाले. यश दुबेने 10 चौकारासह 94 धावांची खेळी साकारली पण शतकाच्या उंबरठ्यावर असताना दुबे बाद झाला. दुबे बाद झाल्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ थांबला. चौथ्या दिवसअखेरीस मध्य प्रदेशने 71 षटकांत 6 बाद 228 धावा केल्या होत्या. याच धावसंख्येवरुन त्यांनी पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. पाचव्या दिवशी पहिल्या सत्रात अवघ्या 30 धावांची भर घातल्यानंतर मध्य प्रदेशचा दुसरा डाव 81.3 षटकांत 258 धावांवर संपुष्टात आला. विदर्भाकडून यश ठाकुर आणि अक्षय वाखरे यांनी भेदक मारा केला. या दोघांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. याशिवाय आदित्य ठाकरे आणि आदित्य सरवटे यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
संक्षिप्त धावफलक : विदर्भ प.डाव 170 व दु.डाव 402
मध्य प्रदेश प.डाव 252 व दुसरा डाव 81.2 षटकांत सर्वबाद 258 (यश दुबे 94, हर्ष गवळी, 67, सारांश जैन 25, यश ठाकुर व अक्षय वाखरे प्रत्येकी तीन बळी).
53 वर्षानंतर दोन मराठमोळे संघ आमनेसामने
रणजी ट्रॉफीच्या इतिहासात दुसऱ्यांदा असं होणार आहे की, एकाच राज्याचे दोन संघ रणजी ट्रॉफीच्या फायनमध्ये पोहोचले आहेत. याआधी 1971 साली पहिल्यांदा असे झाले होते. त्यावर्षी मुंबईने रणजी ट्रॉफी फायनलमध्ये महाराष्ट्राला हरवत जेतेपदाला गवसणी घातली होती. यानंतर तब्बल 53 वर्षानंतर एकाच राज्याचे दोन्ही संघ रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये लढणार आहेत. अर्थात, एकाच राज्यातील मुंबई व विदर्भ या दोन संघांतील ही महाराष्ट्र ‘डर्बी’ असली तरी जेतेपद मात्र महाराष्ट्रातच राहणार, हे निश्चित आहे.
वानखेडेवर रंगणार अंतिम सामना
रणजी करंडकामध्ये दि. 10 ते 14 मार्च या कालावधीत मुंबई व विदर्भ यांच्यात अंतिम सामना होईल. हा सामना वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. दरम्यान, या अंतिम सामन्यात मुंबईचा संघ विक्रमी 42 वे जेतेपद तर विदर्भाचा संघ तिसरे विजेतपद मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. याआधी, विदर्भाने 2017-18 (दिल्लीचा पराभव) आणि 2018-19 (सौराष्ट्राचा पराभव) अशी दोन जेतेपदे पटकावली आहेत. तर मुंबईने आपले शेवटचे विजेतेपद 2015-16 मध्ये जिंकले होते. विशेष म्हणजे, रणजी करंडकाच्या इतिहासात मुंबईने 48 व्यांदा फायनल गाठली असून यामध्ये मुंबईने तब्बल 41 वेळा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम केला आहे. आता, घरच्या मैदानावर मुंबई& जेतेपद मिळवणार का, हे पाहणे महत्वाचे ठरेल.