For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रणजी क्रिकेटपटू सुभाष कंग्राळकर यांचे निधन

09:59 AM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
रणजी क्रिकेटपटू सुभाष कंग्राळकर यांचे निधन
Advertisement

बेळगाव : मूळचे बेळगाव तानाजी गल्ली व सध्या गोवा येथे राहणारे बेळगावचे भूषण गोव्याचे रणजीपटू व माजी कर्णधार सुभाष परशुराम कंग्राळकर (72) यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून लौकिक होता. जमिनीलगत फटके मारण्यात त्यांचा हातखंडा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. सुभाष कंग्राळकर यांनी बेननस्मिथ स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण पूर्ण करून गोगटे महाविद्यालयात क्रिकेट संघाचे कर्णधारपद भूषविले होते. त्याचवेळी प्रतिष्ठीत कर्नाटक विद्यापीठाचे ते कर्णधार होते. तंत्रशुद्ध फलंदाज म्हणून त्यांनी लौकिक मिळविला होता. जमिनीलगत फटके मारण्यात त्यांचा हातखंडा होता. बेळगावमधील गो गो या स्थानिक संघाचे ते संस्थापक व कर्णधार होते. गोवा येथील चौगुले ग्रुपमध्ये रुजू होऊन पुढील क्रिकेटला चालना मिळाली. त्यांनी गोव्याच्या क्रिकेटला दिलेले योगदान न विसरण्यासारखे आहे. गोव्यासाठी ते 30 प्रथमश्रेणी सामन्यात खेळले व 27 वेळा गोवा रणजी संघाचे कप्तानपद भूषविले. रणजीत 2 शतके व 6 अर्धशतकांची नोंद असलेल्या कंग्राळकरांनी 22.75 धावांच्या सरासरीने 1092 धावा केल्या. बीसीसीआयच्या ज्युनियर क्रिकेट निवड समितीतही त्यांनी काम केले होते.

Advertisement

गोवामध्ये बहरली कारकीर्द

स्थानिक क्रिकेट स्पर्धेत कंग्राळकरांनी चौगुले स्पोर्ट्स क्लबचे नियमित प्रतिनिधीत्व केले. चौगुलेंच्या आर्लेम क्रिकेट मैदानाचे ते इन्चार्जही होते. आर्लेम क्रिकेट क्लबच्या सचिवपदी असलेले सुभाष कंग्राळकर यांचे क्रिकेटमधील ज्ञान सर्वश्रुत होते. गोवा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विपुल फडके, सचिव रोहन गावस देसाई तसेच व्यवस्थापकीय मंडळातील सदस्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. गोव्याचे माजी रणजीपटू विनोद धामस्कर, सुदिन कामत, नितीन वेर्णेकर, शरद पेडणेकर, सुरेश महादेवन, सी. अशोक, उदय नाईक तसेच क्रीडा आयोजक संदीप हेबळे तर बेळगावमध्ये धारवाड विभागाचे समन्वयक अविनाश पोतदार, दिलीप वरूटे. व्यंकटेश नाईक, उदय मोटार, राजू ओऊळकर यांनीही कंग्राळकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.