रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती
संसदेतील 225 पैकी 134 मते प्राप्त : प्रतिस्पर्धी उमेदवाराला 82 मते
कोलंबो / वृत्तसंस्था
श्रीलंकेत आर्थिक संकट कायम असतानाच राजकीय गोंधळात देशाच्या संसदेने रानिल विक्रमसिंघे यांची राष्ट्रपती म्हणून निवड केली. 73 वषीय विक्रमसिंघे यांनी राष्ट्रपती झाल्यानंतर सर्व खासदारांचे आणि देशवासियांचे आभार मानले. त्यांना 225 पैकी 134 खासदारांचा पाठिंबा मिळाला. तर प्रस्तिस्पर्धी उमेदवार सत्ताधारी पक्षाचे खासदार दुल्लास अलाहपेरुमा यांना 82 खासदारांचा पाठिंबा मिळाला. पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत विक्रमसिंघे प्रथमच राष्ट्रपतीपदापर्यंत पोहोचले आहेत. यापूर्वी त्यांनी विक्रमी सहावेळा पंतप्रधानपद भूषवले आहे.
राष्ट्रपती निवडीसाठी श्रीलंकन संसदेत 44 वर्षांनंतर गुप्त मतदान झाले. अर्थातच 1978 नंतर प्रथमच राष्ट्रपतींची निवड आदेशाद्वारे नव्हे, तर खासदारांच्या गुप्त मतदानाद्वारे झाली. रानिल विक्रमसिंघे यांनी हंगामी राष्ट्रपती म्हणून श्रीलंकेत आणीबाणी लागू केली. आंदोलकांना हटवण्याचे अधिकार पोलीस आणि सुरक्षा दलांना देण्यात आले होते. आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्यानंतर रानिल विक्रमसिंघे यांनी हे पाऊल उचलले होते.
रानिल विक्रमसिंघे यांचा जन्म 24 मार्च 1949 रोजी कोलंबो, श्रीलंकेत एका संपन्न कुटुंबात झाला. वडील एसमंड विक्रमसिंघे हे पेशाने वकील होते. याशिवाय त्यांचे काका ज्युनियस जयवर्धने हेही श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष राहिले होते. विक्रमसिंघे यांच्या कुटुंबाची राजकारण, व्यवसाय तसेच मीडिया जगतात पकड होती. रानिल यांनी आपल्या वडिलांचा मार्ग अवलंबत सिलोन विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर 1970 च्या दशकात राजकारणात प्रवेश केला. युनायटेड नॅशनल पार्टीपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. 1977 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली. या विजयानंतर त्यांना परराष्ट्र मंत्रालयात उपमंत्रीपद देण्यात आले. विक्रमसिंघे यांच्याकडे युवा आणि रोजगार मंत्रालयासह इतर अनेक मंत्रालयेही होती.