राणी रामपालची हॉकी क्षेत्रातून निवृत्ती
नवी दिल्ली : भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार राणी रामपालने गुरुवारी येथे आंतरराष्ट्रीय हॉकी क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली. राणी रामपालने आपल्या 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय हॉकी कारकिर्दीला आता पूर्णविराम दिला आहे. 29 वर्षीय राणी रामपालचा जन्म हरियाणामधील एका ग्रामीण भागात वास्तव्य केलेल्या गरीब कुटुंबात झाला. तिचे वडील हातगाडी चालवून आपला उदनिर्वाह करत असत. राणी रामपालच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला हॉकी संघाने 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत चौथे स्थान मिळविले होते. राणी रामपालने आपल्या वैयक्तिक हॉकी कारकिर्दीत 254 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना 205 गोल नोंदविले. 2020 साली राणी रामपालचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला होता. तसेच तिला 2020 साली पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. राणी रामपालला माजी ऑलिम्पिक हॉकीपटू बलदेव यांचे मार्गदर्शन लाभले होते.