राणेंनी गोमेकॉत कॅमेरासमोर माफी मागावी
गोमेकॉतील डॉक्टर बनले आक्रमक : डीन कार्यालयासमोर काळी पट्टी बांधून निदर्शने : 2 तास आंदोलनामुळे सेवा विस्कळीत
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील (गोमेकॉ) मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांचा कथित अपमान प्रकरण आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना डोईजड झाले आहे. डॉक्टरांच्या विविध संघटनांनी तसेच विरोधकांनीही हे प्रकरण काल सोमवारी सलग तिसऱ्या दिवशीही लावून धरले. राणे यांनी एका वृत्तवाहिनीच्या माध्यमातून डॉ. कुट्टीकर आणि त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागितली. पण त्यांच्या माफीतून डॉ. कुट्टीकर, अन्य डॉक्टर्स तसेच डॉक्टरांच्या संघटनांचे समाधान झाल्याचे दिसले नाही. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉत येऊन ज्या ठिकाणी अपमानास्पद प्रकार घडला त्याच ठिकाणी व्हिडिओ कॅमेरासमोर येऊन माफी मागावी, अशी मागणी लावून धरली आहे. एकंदरीत या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डॉ. कुट्टीकर, अन्य डॉक्टर्स, डीन, आरोग्य अधीक्षकांसमवेत बैठक घेतली.
गोमेकॉमधील डॉक्टरांनी काल सोमवारी सकाळी डीनच्या कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांच्या अपमानाबद्दल आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी गोमेकॉत येऊन, व्हिडिओ कॅमेरासमोर माफी मागावी अशी आक्रमक मागणी केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदनपत्र गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांना सादर केले. डॉक्टरांनी सुमारे दोन तास निदर्शने केली. त्यामुळे गेमेकॉची सेवा दोन तास विस्कळीत झाली होती. या आंदोलनामुळे गोमेकॉ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
निदर्शनांमध्ये सर्व डॉक्टरांचा सहभाग
निदर्शनांमध्ये सर्व प्रकारचे डॉक्टर्स सहभागी झाले होते. त्यात सर्व विभागप्रमुख, सल्लागार, आयएमए कौन्सिल सदस्य, विद्यार्थी आणि वैद्यकीय क्षेत्रातील विविध स्तरातील व्यक्तींचा सहभाग होता. निदर्शकांनी आम्हाला न्याय हवा आहे. अशा घोषणा दिल्या आणि कर्तव्य बजावणाऱ्या सहकाऱ्याला अन्यायाची वागणूक दिल्याबद्दल संताप व्यक्त केला.
निवेदन आरोग्यमंत्र्यांपर्यंत पोचविले : डॉ. बांदेकर
डॉक्टरांचे निवेदन स्विकारल्यानंतर डीन डॉ. बांदेकर म्हणाले की, डॉ. कुट्टीकर यांना मिळालेल्या अपमानास्पद वागणूकप्रकरणी राणे यांनी जाहीरपणे माफी मागावी, ही आंदोलक डॉक्टरांची मागणी आहे. आम्ही आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडे निवेदन पोचते केले आहे. तसेच, 7 रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ ज्या व्यक्तीने काढला होता, त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टरांनी डीन बांदेकर यांना सादर केलेल्या मागण्या
- आरोग्यमंत्रीविश्वजितराणे यांनी डॉ. कुट्टीकरसह वैद्यकीय समुदायाची जाहीर माफी मागावी.
- सरकारकडूनलेखीआश्वासन हवे की आरोग्यसेवेचे कर्तव्य बजावताना छळ, धमकी दिली जाणार नाही.
- आपत्कालीनवअपघाती वॉर्डसारख्या संवेदनशील वैद्यकीय क्षेत्रात व्हिडिओ रेकॉर्डिंगवर, विशेषत: माध्यमांना बंदी असावी.
- डॉक्टारांच्याकामातव्हीआयपींचा हस्तक्षेप होता कामा नये.
- राजकीयकिंवासामाजिक प्रभावावर नव्हे तर क्लिनिकल तातडीच्या आधारावर उपचार काटेकोरपणे करावेत.
व्हिडिओग्राफर विराधात तक्रार दाखल
‘गार्ड’ या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. आयुष शर्मा यांनी गोमेकॉत 7 जून रोजी घडलेल्या घटनेचा व्हिडिओ काढल्या प्रकरणात व्हिडिओग्राफरच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची मागणी केली होती. त्या व्हिडिओग्राफरच्या विरोधात आगशी पोलिसस्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
ते आपत्कालीन इंजेक्शन नाही : डॉ. कुट्टीकर
ज्या बी-12 इंजेक्शनमुळे हा सारा वाद निर्माण झाला ते आपत्कालीन काळातील इंजेक्शन नाही. सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रातही ते इंजेक्शन उपलब्ध आहे, असे डॉ. रुद्रेश कुट्टीकर यांनी सांगितले. कोणतीही चौकशी न करता मंत्र्यांनी आपणास अपमानास्पद वागणूक देणे योग्य आहे काय? एका वृत्तवाहिनीद्वारे माफी मागितली जाते याला काहीही अर्थ नसून ज्या ठिकाणी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी माझा अपमान केला आहे. त्याठिकाणी येऊन कॅमेरासमोर त्यांनी माफी मागावी, अन्यथा पुढील कारवाई सुरुच राहाणार असल्याचा इशाराही डॉ. कुट्टीकर यांनी दिला आहे.
राणेंना मंत्रिमंडळातून हटवा : काँग्रेस
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी निषेधाचे आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांना पाठिंबा दिला आहे. त्यांनी तेथे जाऊन डॉक्टरांच्या मागण्यांचे समर्थन केले. आरोग्यमंत्री राणे यांनी गोमेकॉत येऊन डॉक्टरांची माफी मागावी, तसेच राणे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी पाटकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणी बोलताना केली. आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी देखील डॉक्टरांच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील सोयी सुविधा वाढवा म्हणजे गोमेकॉवर ताण येणार नाही, असे बोरकर यांनी सुचवले.