प्रेयसीसोबत विवाहबद्ध होणार रणदीप
मणिपूरच्या लिन लॅशरामसोबत थाटणार संसार
बॉलिवूडमधील आणखी एक कलाकार लवकरच बोहल्यावर चढणार आहे. अभिनेता रणदीप हुड्डा आणि त्यांची प्रेयसी लिन लॅशराम विवाहबंधनात अडकणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस ते विवाहबद्ध होऊ शकतात. हा विवाहसोहळा अत्यंत निवडक लोकांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत. यात केवळ जवळचा मित्रपरिवार आणि कुटुंबीयच सामील होतील आणि हा सोहळा मुंबईत पार पडणार आहे.
रणदीप हुड्डा स्वत:च्या विवाहसोहळ्यावर प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधू इच्छित नाही. विवाह संपन्न झाल्यावरच याची घोषणा होणार आहे. 47 वर्षीय रणदीप आणि 37 वर्षीय लिनने स्वत:च्या रिलेशनशिपविषयी कधीच जाहीर वाच्यता केलेली नाही. रणदीपने 2021 मध्ये स्वत:च्या प्रेमाची कबुली दिली होती. लिन ही मणिपूरची असून आघाडीची मॉडेल आहे. रणदीप हा लवकरच ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटात दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन तोच करत आहे. याचमुळे त्याच्या या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. रणदीप यापूर्वी सुष्मिता सेनसोबत रिलेशनशिपमध्ये होता, परंतु दोघांचा काही कारणांमुळे ब्रेकअप झाला होता.