Ranbhajya: जंगली भाज्यांचा औषधी रानमेवा, डोंगरी भागांत आढळणाऱ्या रानभाज्या कोणत्या?
गावांच्या शेतशिवारात पावसाच्या पाण्यावर भाज्या उगवण्यास सुरुवात झालीये
By : संजय कडूकर
कानूर : चंदगड तालुक्याच्या पश्चिम भागात सह्याद्रीच्या डोंगररांगा पसरल्या आहेत. सह्याद्रीच्या घाटमाथ्यास लागून 1400 ते 1500 हेक्टरच्या भाग दाट जंगलाने व्यापलेला आहे. या जंगलाच्या पायथ्याशीच सिंधुदुर्ग जिह्याची हद्द लागते. या सीमेलगतच फाटकवाडी मध्यम प्रकल्प आहे.
या प्रकल्पाच्या पायथ्याशी पिळणी, सडेगुडवळे, फाटकवाडी ही गावे वसली आहेत. या गावांच्या शेतशिवारात पावसाच्या पाण्यावर भाज्या उगवण्यास सुरुवात झाली आहे. भागामध्ये प्रामुख्याने अंकुर, तोंडला, नाली, पाथरी, कुर्डु, अळू इत्यादी भाज्या या भागात आढळतात. अंकुर या भाजीचे वेल उगवतात. तसेच तोंडला नावाची भाजी उगवते. भाजीचे लांबलचक एक फुटापर्यंत 10 ते 15 फुटापर्यंत वेल उगवतात.
भाजीचे वेल काटेरी झुडूपाच्या आधाराने पसरतात. अंकुराच्या भाजीला चवळीसारखी पाने असतात. जेव्हा ही पाने कोवळी असतात, तेव्हा भाजी करता येते. साधारण गणेश चतुर्थीनंतर या वेलांना मोहोर येतो. या मोहराचा आकार नागली वरीच्या बारीक तांदळासारखा असतो. परंतु, याचा मोहोर हाताच्या बोटा एवढ्या लांब झुबक्याचा असतो. या मोहराची भाजी चटणी बनवतात.
नाली : नाली की एक प्रकारची पानवर्गीय पालेभाजी आहे. याही भाजीची जुलैपासून उगवण होऊन गणेशोत्सवाच्या अखेरीस या भाजीचा आहारामध्ये उपयोग करता येतो. याची रोपे तंतुमय आणि जमिनीलगत असतात. या भाजीची रोपे एक फुटापर्यंत वाढतात. परंतु, तंतुमय असल्याने रोपे फार काळ टिकतात. या भाजीचा आहारामध्ये दोन ते तीन महिने उपयोग करता येतो.
पाथरी : पाथरी या नावाची भाजी जून महिन्यात मिळते. या भाजीची पाने लांब व रुंद असतात. लांबी अर्ध्या फुटांपर्यंत असते. पाच-सहा पानांची एक जुडी याप्रमाणे उगवण होते. पाथरीची भाजी सुकी चांगल्या प्रकारे बनवून रोजच्या जेवणात उपयोग करता येतो. पालकाप्रमाणे पाथरीच्या भाजीची रोपे असतात.
अळू : अळूची भाजी बनवण्यासाठी देठासह पाने कापून घ्यावी लागतात. देठ सोडून पानावरील तंतुमय धाग्याचे आवरण काढून अळूच्या कांड्या सोलून घ्याव्या लागतात. नंतर पाने आणि देठ चिरून आमटी बनवता येते. अळूमध्ये आरोग्यास लाभदायी घटक असतात. म्हणून रोजच्या जेवणात वापर करता येतो. अळूच्या जमिनीतील कंदाची पातळ आमटीही बनवता येते. त्यामुळे विनामूल्य औषधी रानमेवा निसर्गाने बहाल केला आहे. त्याचा लाभ सर्वांनी घेतल्यास आरोग्याच्या दृष्टीने हितावह ठरणार आहे.
कुर्डू : कुर्डू या भाजीची रोपे अर्धा फुटावर येतात. फांद्यांची पाने तोडून भाजीसाठी वापर करता येतो. या भाजीच्या रोपांची उंची पाच फुटापर्यंत असू शकते. नोव्हेंबर महिन्यापर्यंत या भाजीच्या रोपांना फुलांची गुलाबी रंगाची बोंडे येतात. या बोंडामध्ये राजगिरा भाजीच्या बियासारख्याच बिया असतात. या बियांच्या झाडाच्या मुळाचा आणि पानांचा मुतखडा तसेच उष्णतेच्या आजारावर गुणकारी उपयोग होतो.
तोंडला
तोंडला या भाजीची रोपे अडीच इंचापासून दोन फुटांपर्यंत असतात. या भाजीची उगवण वळिवाच्या पावसापासून सुरू होते. ही भाजी दोन-तीन महिने वापरता येते. ही भाजी आरोग्यास हितकारक असून डोळ्यांचे विकार नष्ट होतात. या भाज्या पावसातील दिवसात वरचेवर खाणे हितकारक आहे.