For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगावातून पळाला...गदगमध्ये सापडला

11:28 AM Jun 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगावातून पळाला   गदगमध्ये सापडला
Advertisement

अट्टल घरफोड्याला अटक : सुमारे 20 लाखांचा ऐवज जप्त

Advertisement

बेळगाव : तब्बल दोनवेळा बेळगाव पोलिसांच्या हातातून निसटलेला चोरी प्रकरणातील संशयित आरोपी गदग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. बेळगाव येथील तिघा जणांना अटक करून त्यांच्याजवळून सुमारे 20 लाख रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. खाजा अस्लम ऊर्फ रफिक सय्यद ऊर्फ शेख (वय 32), अरमान इरफान शेख (वय 19), मेहबूब इब्राहिम मुल्ला (वय 18) तिघेही राहणार वैभवनगर, बेळगाव अशी त्यांची नावे आहेत. गदगचे जिल्हा पोलीसप्रमुख बी. एस. नेमगौडर यांनी या कारवाईची पुष्टी दिली आहे.

वेगवेगळ्या ठिकाणी या त्रिकुटाने चोरलेले 401 ग्रॅम सोने, दोन किलो चांदी व दीड लाखाचे एक वाहन असा एकूण 20 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बेळगाव, होस्पेट, बळ्ळारी व आंध्रप्रदेशमधील गुंटकल येथेही या टोळीने चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. 23 मे रोजी गदग येथील शेखरगौडा पाटील यांच्या घरी चोरी झाली होती. या चोरी प्रकरणाचा तपास करताना आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करून मोठ्या प्रमाणात ऐवज जप्त करण्यात आला आहे. खाजा शेखला अटक करण्यासाठी बेळगाव पोलीसही त्याच्या मागावर होते. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी अलीकडे त्याने गाव सोडले होते. अमननगर परिसरात मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खाजा चोरीसाठी आला होता. केए 22 ईएक्स 9949 क्रमांकाच्या दुचाकीवरून तो आला होता. यासंबंधी माहिती मिळताच त्याला जाळ्यात अडकविण्यासाठी पोलिसांनीही सापळा रचला होता.

Advertisement

यापूर्वीही दुचाकी टाकून बेळगावातून पळ 

माळमारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी पाळत ठेवली होती. पोलिसांना पाहताच आपली दुचाकी तेथेच टाकून खाजा शेख पळाला होता. बेळगाव शहर व जिल्ह्याबरोबरच हुबळी-धारवाड, बळ्ळारी, होस्पेट,गुंटकलसह महाराष्ट्र व गोव्यातही गुन्हे करणाऱ्या खाजाने यापूर्वीही दुचाकी टाकून बेळगावातून पळ काढला होता. मात्र, आता तो गदग पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

Advertisement
Tags :

.