For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सज्जन चित्ताला रामनाम

06:37 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
सज्जन चित्ताला रामनाम
Advertisement

श्रीराम हा मंत्र समस्त भारतीयांचा श्वास आहे. राम हा जनमानसात दृढपणे आणि खोलवर रुजला आहे. रोजच्या जगण्यातील आणि आयुष्यातील देखील पहाट जेव्हा होते तेव्हा तो रामप्रहर असतो. खेड्यात त्याला रामपारी असे म्हणतात. माणसाची दैनंदिनी सुरू होते रामनामाने. श्रीरामनामाचे आवर्तन सुरू असताना दिवस सरतो आणि संध्याकाळी घरोघरी रामरक्षा हा मंत्र निनादतो. दिवस आणि रात्र यांच्यामधला संधीप्रकाश आतल्या आवाजाला प्रकट होण्याची संधी देतो. तो पुन्हा पुन्हा जागे करीत सांगतो की जीवनाच्या सायंकाळी हाकेला धावून येणारा फक्त राम आहे. दोन माणसांची जेव्हा भेट होते तेव्हा रामराम म्हणण्याची पद्धत समर्थ रामदास स्वामींनी घालून दिली आहे. पू. डोंगरे महाराज म्हणतात, दोनदा राम कां म्हणायचे?  एकदा, तीनदा, चार वेळा कां नाही? कारण दोघांच्या हृदयात एकमेकांचा राम आहे. त्या प्रकाशदायी रामामुळे आपण परस्परांना पाहू शकतो. तुम्ही माझ्यात रामाचे दर्शन करा. मी सुद्धा तुमच्या रामाचे दर्शन घेईन. हा भाव मनाला शांती प्रदान करणारा आहे.

Advertisement

भारताच्या विविध प्रदेशात रामनामाचा गजर होतो. उत्तर भारतामध्ये ‘रामजी की जय, सियावर रामचंद्र की जय’ असे म्हणत सारा आसमंत दणाणून जातो. महाराष्ट्रात ‘जय जय रघुवीर समर्थ’ ने गजराची सांगता होते, तर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा मंत्र माळेवर जपला जातो. वारकरी संप्रदायात ‘जय जय राम कृष्ण हरी’ हा मंत्र म्हणजे भूलोकीचे अमृत आहे. ‘जानकीजीवन स्मरण जय जय राम’ हा मंत्र साक्षात ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे दर्शन करवून देतो. आदर्श राज्य म्हणजे रामराज्य. याविषयी भाष्य करताना मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्राr किंजवडेकर म्हणतात, ‘श्रीरामांनी पित्याचा शब्द पाळून चौदा वर्षे वनवास स्वीकारला. आज्ञापालन म्हणून हक्काने चालत आलेले राजसिंहासन सोडले. निरपेक्ष अरण्यवास स्वीकारला. त्यामुळे रामाचा शक्तिसंचय एवढा झाला की राज्याचे सिंहासन सोडताच प्रजेने रामाला आपल्या हृदयसिंहासनावर तर बसवलेच पण शेवटी रामराज्य हे एक स्वतंत्र उपमान होऊन बसले.

संत कबीर श्रीरामनाम हा नामयज्ञ करीत. कबीर कपडे विणत असताना सतत रामनाम घेत. त्यांनी विणलेल्या कपड्याच्या छोट्याशा गाठीत एक कोटी यज्ञाचे फळ सामावले होते. संत एकनाथ महाराज म्हणतात, ‘कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडे’. आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांचे सुंदर गीत आहे, ‘कबिराचे विणतो शेले, कौसल्येचा राम’. संत कबीर हे वस्त्र विणताना रामरूप होत असत. ‘दास रामनामी रंगे, राम होई दास, एक एक धागा गुंते, रूप ये पटास, राजा घनश्याम, कौसल्येचा राम’. आतबाहेर श्रीरामनाम. मग काय झाले?  तर- ‘विणून सर्व झाला शेला, पूर्ण होईल काम, ठायी ठायी शेल्यावरती दिसे रामनाम, गुप्त होई राम’.  शरीरातल्या रोमरोमावर श्रीरामनामाची मोहर असल्याने ती प्रत्यक्ष वस्त्रावर उमटली. व्यवहारात पांढऱ्या रेशमी काठाच्या वस्त्राला रामकाठी म्हणतात. पूर्वी सांकेतिक भाषेत रुपयाला राम, अधेलीला सीताबाई, तर एक आण्याला रामदास म्हणत.

Advertisement

समर्थ रामदास स्वामींच्या चरित्रात सतीबाई शहापूरकरांची कथा आहे. एकदा रामप्रहरी समर्थ रामदास स्वामी शहापूरच्या कुलकर्ण्यांच्या दारी भिक्षेसाठी आले आणि ‘रघुपती राघव राजाराम पतीत पावन सिताराम’ हे भजन म्हणू लागले. हे भजन कानावर पडताच सतीबाई नावाची त्या घरातील स्त्राr तावातावाने बाहेर आली आणि म्हणाली, अहो गोसावी, मुलाबाळांनी भरलेल्या नांदत्या घरात हे म्हणतात का? समर्थांनी आश्चर्याने विचारले, ‘मग कुठे म्हणायचे रामाचे भजन?’ ‘अहो, ते शेवटच्या पालखीच्या वेळी म्हणायचे, हे साधे माहीत नाही का तुम्हाला?’  समर्थांना हे ऐकून काय वाटले असेल? त्यानंतर कुलकर्ण्यांच्या घरावर आलेले संकट समर्थांनी दूर करून अखंड रामनामाचा वसा त्या पूर्ण कुटुंबाला देऊन त्यांच्या मनुष्यजन्माचे सार्थक केले. समर्थ संप्रदायातील भीमस्वामी तंजावरकर हे सतीबाईंचे पुत्र. त्यांनी वयाच्या 99 व्या वर्षापर्यंत समर्थसंप्रदायाची सेवा केली. पू. डोंगरे महाराज म्हणत, ‘या शरीराचे मालक तुम्ही आहात का? देह हे घर भाड्याचे आहे. इहलोकी तुम्ही भाडेकरू म्हणून एखाद्या घरात राहत असाल तर दीर्घ काळानंतर त्या घरावर हक्क सांगू शकता. परंतु हा कायदा देवाजवळ लागू होऊ शकत नाही. त्याच्याकडून घर सोडा हा हुकूम आला की क्षणात ‘राम नाम सत्य है’ म्हणत हा भाड्याचा देह सोडावाच लागेल.’  समर्थ म्हणतात, ‘देह केव्हा पडेल याचा काहीही भरवसा नाही. प्रसंग कसा येईल कोण जाणे! म्हणून ‘या कारणे सावधान असावे, जितुके होईल तितके करावे, भगवत्कीर्तने भरावे, भू मंडळ.’  रामाचे नाव हेच सत्य आहे.

मराठी भाषेत रोजच्या जगण्यात पदोपदी राम डोकावतो. ताकापुरते रामायण किंवा केवढे रामायण घडून गेले!, इतके वर्ष रामायण ऐकले अन् म्हणे रामाची सीता कोण? ...असे अनेक वाक्प्रचार, म्हणी यांचा उगम रामायणातून झाला आहे. श्री मारुतीरायांना सीता मातोश्री दिसल्याबरोबर भूक लागली. आईचे दर्शन झाले ना! म्हणून. तेव्हा अशोकवाटिकेतील झाडांनी त्याग केलेली फळे तू खा, असे सीतामाईंनी मारुतीरायांना सांगितले. त्यावरून ‘पडत्या फळाची आज्ञा’ हा वाक्प्रचार रूढ झाला. न संपणाऱ्या किंवा लांबणाऱ्या गोष्टीला मारुतीचे शेपूट असे म्हणतात. ‘दे माय धरणी ठाय’ ही सीतामाईंनी आईला केलेली विनवणी आहे. लंकेत सोन्याच्या विटा, कुणी वाली उरला नाही, कुंभकर्णी झोप, शबरीची बोरे, लक्ष्मणरेषा, राम-लक्ष्मणाची जोडी, रामसीतेचा जोडा असे अनेक वाक्प्रचार वापरून मराठी भाषा श्रीरामांशी संलग्न आहे. आमच्या पूर्वज स्त्राrने जगण्याचे मोल ओवीतून सांगितले-

‘साखर मुंगीला, मध तो माशीला

तैसे सज्जन चित्ताला, रामनाम’.

-स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.