रमिता, दिव्यांश भारताचे प्रमुख आव्हानवीर
वृत्तसंस्था/ निंगबो, चीन
येथे मंगळवारपासून सुरु होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल आणि पिस्तुल आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेतील चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात रमिता जिंदाल आणि दिव्यांश सिंग पनवाल यांच्या कामगिरीवर अधिक लक्ष राहिल.
अलिकडेच झालेल्या आशिया चॅम्पियनशिप स्पर्धेत भारतीय नेमबाज संघाने दर्जेदार कामगिरी केली. कझाकस्तानमध्ये यापूर्वी झालेल्या विश्वचषक आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या टप्प्यात भारतीय नेमबाजांनी दर्जेदार कामगिरी करताना 31 पदके मिळविली. यामध्ये 14 सुवर्ण, 8 रौप्य आणि 3 कांस्यपदकांचा समावेश आहे. निंगबोमधील स्पर्धेत 42 देशांचे सुमारे 320 नेमबाज 10 नेमबाज प्रकारातील सुवर्णपदकासाठी लढत देत आहेत.
येत्या नोव्हेंबर महिन्यात कैरो येथे होणाऱ्या आगामी विश्व नेमबाजी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दृष्टिकोनातून भारतीय नेमबाजांना निंगबोमधील ही स्पर्धा सरावाच्या दृष्टिकोनातून अधिक महत्त्वाची ठरत आहे. चालू वर्षीच्या नेमबाजी हंगामात ऑलिम्पिक नेमबाज रमिता जिंदाल आणि उमामहेश मद्दनिनी आणि दिव्यांश पन्वर मेघना सज्जनार हे एकत्रित खेळणार आहेत. तसेच पुरुषांच्या विभागात रिदम सांगवान आणि निशांत रावत हे मिश्र एअर पिस्तुल नेमबाजी प्रकारात भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मंगळवारपासून सुरु होणाऱ्या या स्पर्धेत भारत, फ्रान्स, इटली, जर्मनी तसेच ऑस्ट्रेलिया, इराण, सर्बिया, स्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि व्हिएतनाम यांचा समावेश आहे.