रामेश्वरम कॅफे स्फोटाचा मुख्य सूत्रधार गजाआड
एनआयएला मोठे यश : तामिळनाडूतून घेतले ताब्यात
वृत्तसंस्था /चेन्नई
बेंगळूर येथील रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटप्रकरणी एनआयएला मोठे यश मिळाले आहे. तपास यंत्रणेने तीन राज्यांमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकल्यावर मुख्य सूत्रधाराला अटक केली आहे. एनआयएच्या पथकांकडून कर्नाटकात 12, तामिळनाडूत 5 तर उत्तरप्रदेशात एका ठिकाणी छापे टाकण्यात आले होते. या कारवाईनंतर मुजम्मिल शरीफ याला अटक करण्यात आली असून तो कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे समजते. रामेश्वरम कॅफेत झालेल्या स्फोटानंतर 3 मार्च रोजी एनआयएने या प्रकरणाचा तपास स्वत:च्या हातात घेतला होता. यानंतर स्फोट घडवून आणणारा आरोपी मुसाविर शाजीब हुसैन असल्याचे समोर आले होते. तसेच तपास यंत्रणेने आणखी एक सूत्रधार अब्दुल मथीन ताहाची ओळख पटविली होती. हे दोन्ही आरोपी सध्या फरार असून त्यांना पकडण्यासाठी एनआयए प्रयत्नशील आहे. मुजम्मिल शरीफने 1 मार्च रोजी बेंगळूरच्या आयटीपीएल रोड, ब्रुकफील्ड येथील कॅफेत आयईडी स्फोट घडवून आणण्याकरता अन्य दोन्ही आरोपींना लॉजिस्टिक मदत पुरविली होती. विस्फोटामुळे कॅफेतील ग्राहक तसेच कर्मचारी जखमी झाले होते. यातील काही जण गंभीर जखमी झाले होते. स्फोटाच्या तपासादरम्यान आरोपींच्या घरांसोबत अन्य संशयितांच्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. यादरम्यान रोख रकमेसोबत विविध प्रकारचे डिजिटल उपकरण जप्त करण्यात आले होते.