For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘रामेश्वरम’ स्फोट : हुबळीतील संशयिताला अटक

12:12 PM May 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘रामेश्वरम’ स्फोट   हुबळीतील संशयिताला अटक
Advertisement

एनआयएची कारवाई : आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाचवर

Advertisement

बेंगळूर : बेंगळूरच्या रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी एनआयएने शुक्रवारी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. त्यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या पाचवर पोहोचली आहे. शोएब अहमद मिर्झा उर्फ छोटू (वय 35) असे त्याचे नाव असून तो हुबळीतील रहिवासी आहे. रामेश्वरम कॅफेमध्ये स्फोट घडविण्यात आल्याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी एनआयएने कर्नाटकसह चार राज्यांत छापे टाकले होते. बेंगळूरमध्ये चार ठिकाणी तर हुबळी-धारवाडमध्ये तीन ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या होत्या. शोएब मिर्झाच्या हुबळीतील निवासस्थानी छापा टाकून त्याला आणि त्याच्या भावाला ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी शोएबला अटक करण्यात आली आहे. लष्कर-ए-तोयबा (एलईटी) संघटनेने 2012 मध्ये रचलेल्या घातपाताच्या कट प्रकरणात तो 2018 दोषी आढळला होता. शिक्षा भोगून कारागृहातून मुक्तता झाल्यानंतर तो नव्या कटात सहभागी झाल्याचा संशय आहे. आता रामेश्वरम कॅफे स्फोट प्रकरणात तो सहभागी असल्याच्या संशयावरून एनआयएने अटक केली आहे. तीन दिवसांपूर्वी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. विदेशातील ऑनलाईन हॅन्डलरशी संपर्क असलेल्या शोएब मिर्झाने नंतर रामेश्वरम कॅफेतील स्फोट प्रकरणाचा मुख्य आरोपी अब्दुल मतीन ताहाची ओळख करून दिली. शिवाय त्याने ऑनलाईन हॅन्डलर आणि अब्दुल मतीन ताहा यांच्यात कोडवर्डमध्ये संवाद साधण्यासाठी ई-मेल आयडी दिला होता, अशी माहिती एनआयएने दिली आहे. 1 मार्च 2024 रोजी बेंगळूरच्या ब्रुकफिल्ड येथील रामेश्वरम कॅफेमध्ये बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. या घटनेत 9 जण जखमी झाले होते. 3 मार्च रोजी एनआयएने हे प्रकरण हाती घेऊन तपास केला. शिमोग्याच्या तीर्थहळ्ळी येथील अब्दुल मतीन ताहा आणि मुसावीर हुसेन शाजीब या दोघांचा या स्फोटात हात असल्याचे उघडकीस आले. या दोघांना 12 एप्रिल रोजी एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर येथे अटक केली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.