कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

रमेश तवडकर, कामत शपथबद्ध

12:40 PM Aug 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी दिली पदाची, गोपनीयतेची शपथ : दरबार सभागृहात खचाखच गर्दी; काणकोण, मडगावच्या जनतेची मोठी उपस्थिती

Advertisement

पणजी : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना काल गुरुवारी करण्यात आली. त्यानुसार भाजपचे ज्येष्ठ आमदार तथा सभापती राहिलेले रमेश तवडकर आणि भाजपचे आमदार तथा माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत हे दोघेही शपथबद्ध झाले. दोनापावला येथील राजभवनावर शपथविधी सोहळा झाला. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी सोहळ्याला व्यासपीठावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू उपस्थित होते. त्याचबरोबर उपस्थितांमध्ये मंत्रिमंडळातील सर्व मंत्री होते. पाच आमदार गैरहजर राहिले. इतर मान्यवरांमध्ये महापौर रोहित मोन्सेरात, उद्योगपती श्रीनिवास धेंपो, गत लोकसभा निवडणुकीतील उमेदवार पल्लवी धेंपो, सरकारातील वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, प्रशासनातील सचिव उपस्थित होते.

Advertisement

काणकोण, मडगावकरांची गर्दी

राजभवनातील दरबार सभागृहात गुऊवारी सकाळपासून शपथविधी सोहळ्याला काणकोण व मडगाव येथील जनतेने मोठी गर्दी केली होती. या शपथविधी सोहळ्याला दरबार सभागृह गर्दीने खचाखच भरले होते. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू यांनी आमदार रमेश तवडकर व दिगंबर कामत यांना मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ दिली. कामत व तवडकर या दोघांनीही कोकणी भाषेतून दुपारी 12 वाजता शपथ घेतली. मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू यांनी नियुक्तीचा आदेश वाचून दाखवला व त्यानंतर राज्यपालांनी कामत व तवडकर यांना शपथ दिली.

तवडकर, कामतांवर शुभेच्छांचा वर्षाव

रमेश तवडकर यांनी शपथविधी सोहळ्यापूर्वी सभापतीपदाचा राजीनामा विधीमंडळाच्या सचिव नम्रता उल्मन यांच्याकडे सादर केला. शपथविधी सोहळ्यानंतर काणकोण, मडगाव येथील जनतेने रमेश तवडकर व दिगंबर कामत यांना भेटण्यासाठी मोठी गर्दी केली. मंत्री तवडकर व मंत्री कामत हे जनतेच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर शपथविधी सोहळ्यानंतर दीड तास उपस्थित होते.

आमोणकर, काब्राल यांना उशीर

राजभवनातील कामत व तवडकर यांच्या शपथविधी सोहळ्याला सरकारातील बहुतांश मंत्री व आमदार उपस्थित होते. दरबार सभागृह गर्दीने खचाखच भरले होता. मात्र भाजपचे आमदार नीलेश काब्राल व आमदार संकल्प आमोणकर हे शपथविधी सोहळा अंतिम टप्प्यात आल्यानंतर पोहचले.

सत्ताधारी सहा आमदारांची अनुपस्थिती

राजभवनातील शपथविधी सोहळ्याला पाच आमदार अनुपस्थित होते. यामध्ये पणजीचे आमदार तथा मंत्री बाबुश मोन्सेरात, म्हापशाचे आमदार तथा उपसभापती ज्योशुआ डिसोझा, कळंगुटचे आमदार मायकल लोबो, शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो, प्रियोळचे आमदार गोविंद गावडे तसेच वेळ्ळीचे आमदार आलेक्स सिकेरा यांचा समावेश होता. यावरुन काही आमदारांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांची नाराजी दिसून आली. गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरुन हटविल्याने त्यांनी गैरहजर राहून आपली नाराजी प्रकट केली, अशी चर्चा सुरू होती.

जड अंत:करणाने सभापतीपद सोडण्याचा निर्णय : तवडकर

भारतीय जनता पक्षाचा आदेश हा सर्वश्रेष्ठ असल्याने या आदेशामुळे आपण जड अंत:करणाने सभापतीपद सोडण्याचा निर्णय घेतला, असे रमेश तवडकर यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांना सांगितले. मंत्री तवडकर यांनी सांगितले की, 2027 च्या विधानसभा निवडणुकीवर लक्ष ठेवून हा पक्षाने घेतलेला निर्णय आहे. पक्ष आणि लोकांसाठी कार्य करण्यासाठी मंत्रिपद आवश्यक असते. सर्वांनी एकजूट राखून लोकांसाठी कार्य केल्यास 2027 सालात स्पष्ट बहुमत मिळण्यासह दक्षिण गोव्यातही पक्षाला मोठे यश मिळणार आहे. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता म्हणून अनेक वर्षे पक्षासाठी काम केलेले आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातही खूप काम केलेले आहे. 29 मार्च 2022 या दिवशी सभापतीपदाची सूत्रे हातात घेतली. साडेतीन वर्षे सभापती राहिलो. सभापती म्हणून मुख्यमंत्री तसेच आमदारांनीही माझ्या कार्याचे कौतुक केले. त्यामुळे सभापतीपद सोडताना खूप वाईट वाटते. सभापती पदावर असताना पक्ष संघटनेसाठी काम करणे शक्य होत नाही. त्यामुळे पक्षाने 2027च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून मला मंत्रिपद घेण्याचा आदेश दिला. मंत्रिपद मिळाल्यानंतर सर्वसामान्य जनतेसाठी आणि कार्यकर्ते यांना प्रथम प्राधान्य राहील, असे मंत्री तवडकर यांनी सांगितले.

मंत्रिपदामुळे जनतेची सेवा आणखी नेटाने : दिगंबर कामत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांच्यामुळे आपला मंत्रिमंडळात समावेश झालेला आहे. आपण यापूर्वी मुख्यमंत्रिपदावरही काम केलेले आहे. त्यामुळे अमूक एक खात्याचा आग्रह आपण धरणार नाही. खाते देण्याविषयी मुख्यमंत्री आपल्याकडे चर्चा करतील. कारण आपण ज्यावेळी मुख्यमंत्री होतो त्यावेळी आपल्याकडे अर्थ आणि गृह ही महत्त्वाची खातीही नव्हती. त्यामुळे सध्या तरी मंत्रिपद मिळाल्याने जनतेची सेवा आणखी नेटाने करणे शक्य होणार आहे, अशी प्रतिक्रिया दिगंबर कामत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांना दिली. मंत्रिपदाची शपथ घेतलेले दिगंबर कामत अनेक वर्षे मंत्रिपदी राहिलेले आहेत. सुरूवातीला फ्रान्सिस सार्दिन यांच्या सरकारात ते वीजमंत्री होते. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री होते. 2005 सालात त्यांनी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2007 ते 2012 या काळात ते काँग्रेसचे मुख्यमंत्री होते. कामत यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात माजी मुख्यमंत्री रवी नाईक हे गृहमंत्री होते. 2012 नंतर दिगंबर कामत यांना आता पुन्हा एकदा मंत्रिपद मिळालेले आहे.

 

इथे पूर्णविराम झालेला नाही : मुख्यमंत्री,अन्य मंत्रिपदच्या निर्णयाबाबत डॉ. प्रमोद सावंत यांचे सूचक विधान

दोनापावला येथील राजभवनावर रमेश तवडकर व दिगंबर कामत यांना मंत्रिपदाची शपथ दिल्याने पक्षाचे बळ आणखी वाढलेले आहे. या दोघा अनुभवी नेत्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे, मात्र इथे पूर्णविराम झालेला नाही, असे सूचक विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राजभवनातील शपथविधी सोहळ्यानंतर केले. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केलेल्या या सूचक विधानामुळे पुढच्या काही दिवसांत कळंगुटचे आमदार मायकल लोबो किंवा शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो या दोघांपैकी एकाला तसेच आमदार संकल्प आमोणकर यांनाही मंत्रिपद मिळण्याची अजूनही शक्यता आहे.

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, 2027च्या विधानसभा निवडणुकीत नि:संदेह भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार आहे. भाजपचे हे यश खऱ्या अर्थाने विकासावर अवलंबून असणार आहे. भाजपचे सर्व आमदार आणि मंत्री विकासकार्याला महत्त्व देत असल्याने भाजपने सध्या पुढील विधानसभा निवडणुकीवर लक्ष्य केंद्रीत केले असल्याचेही ते म्हणाले. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “सध्या रमेश तवडकर व दिगंबर कामत हे अनुभवी व ज्येष्ठ आमदार असल्याने त्यांना मंत्रिपदे देण्यात आलेली आहेत. या शपथविधी सोहळ्याचा अजूनही पूर्णविराम झालेला नाही,” त्यामुळे भविष्यात आणखी एका दोघाला मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे.

तवडकर, कामत यांच्याकडे प्रदीर्घ अनुभव : ढवळीकर

दोनापावला येथील राजभवनात रमेश तवडकर व दिगंबर कामत यांना देण्यात आलेली शपथ आणि हा शपथविधी सोहळा अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण आहे.  तवडकर व कामत हे दोघेही राजकारणातील मुरलेले नेते आहेत. या दोघांकडे मंत्रिमंडळातील आणि राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आहे. त्याचा फायदा भाजप सरकारला नक्कीच होणार आहे. कार्यकर्त्यांची आणि सामान्य जनतेची नाळ या दोघाही नेत्यांशी जोडलेली आहे. दोन्ही नेत्यांनी तळागाळातून कार्य केलेले आहे. विधानसभा निवडणुकीत या दोन्ही नेत्यांना देण्यात आलेल्या मंत्रिपदाचा फायदा सरकारला नक्कीच होणार आहे, असे सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article