अ. गो. मराठी साहित्य संमेलन स्वागताध्यक्षपदी रमेश तवडकर
काणकोण : अखिल गोमंतक साहित्य सेवक मंडळातर्फे काणकोण तालुक्यात 13 व 14 जानेवारी, 2024 रोजी 29 वे मराठी साहित्य संमेलन भरविण्यात येणार असून या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी पैंगीणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांची, तर पैंगीणचे उपसरपंच सुनील पैंगणकर यांची कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या संमलेनाच्या स्वागत समितीची निवड करण्यासाठी नुकतीच श्रीस्थळ येथील सरकारी विश्रामधामात बैठक घेण्यात आली. या बैठकीला साहित्य सेवक मंडळाचे रमेश वंसकर, विठ्ठल गावस, राजमोहन शेट्यो, अभय रेडकर हे पदाधिकारी, श्री बलराम निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका सविता तवडकर, श्री कात्यायणी बाणेश्वर विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक शांताजी गावकर, शैला प्रभुदेसाई, दिलखुश शेट, प्रकाश गावकर, अमिता देसाई, आलोख मोडक, प्रभाकर गावकर, निवृत्त शिक्षक नारायण देसाई, गोविंद लोलयेकर, बलराम उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य कृतिका ना. गावकर, सुविधा कोमरपंत, सुभाष महाले, संजय गावकर, सिद्धार्थ देसाई आणि अन्य मराठीप्रेमी उपस्थित होते. यानंतर स्वागत समिती सभासदांची बैठक घेऊन संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात येणार असून संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती वंसकर यांनी दिली.