रिपाईचे ऐक्य होत असेल तर माझ्यासाठी मंत्रीपद महत्वाचे नाही, आठवलेंनी स्पष्टच सांगितलं
प्रकाश आंबेडकर यांनी रिपाई ऐक्याचे नेतृत्व करावे
सांगली : रिपाई ऐक्यासाठी मी आज नव्हे तर १९९० सालीच प्रयत्न केला होता. आजही रिपाईचे ऐक्य होत असेल तर माझ्यासाठी मंत्रीपद महत्वाचे नाही. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून रिपाई ऐक्याचे नेतृत्व करावे अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी सांगलीत पत्रकार बैठकीत बोलताना केली.
उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे तसेच शरद पवार व अजित पवार यांच्या एकत्रिकरणांची मी वाट पाहतोय, अशी मिश्किल टिप्पणीही यावेळी त्यांनी केली. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रविवारी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. रिपाई ऐक्यासाठी मी यापुर्वीही प्रयत्न केला होता.
१९९० साली मी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसबरोबर गेलो. रिपाईतील अन्य नेते त्यावेळी माझ्याबरोबर आले नाहीत. त्यावेळी मी एकटाच मंत्री झालो, आम्ही सगळे एक असतो तर कदाचित रिपाई म्हणून आम्हाला १० ते १२ मंत्रीपदे नक्की मिळाली असती. आठवले म्हणाले, आजही रिपाई ऐक्यासाठी मी प्रयत्नशील आहे.
रिपाईच्या ऐक्य होत असेल तर माझ्यासाठी मंत्रीपद महत्वाचे नाही. माझा पक्ष छोटा आहे. एनडीएमध्ये गेल्यानंतर माझ्या पक्षाचा विस्तार देशातील अनेक राज्यामध्ये झालेला असून सभासदही मोठ्या संख्येने झाले आहेत. रिपाई ऐक्यासाठी माझ्याबाजूने कोणतीच अडचण नाही. पण रिपाई नेत्यांचे चार चार गट आहेत.
खुद्द प्रकाश आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व भिमराव आंबेडकर असे तीन पक्षांचे गट आहेत. त्यांनी प्रथम एकत्रित यावे. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची वंचित बहुजन आघाडी बरखास्त करून रिपाई ऐक्याचे नेतृत्व करावे.
रिपाईला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे
शरद पवार मुख्यमंत्री असताना रिपाई म्हणून आम्हाला सत्तेचा मोठा वाटा मिळत होता. महायुती म्हणून आमच्या कार्यकर्त्यांना जिल्हा नियोजनसह सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. सत्तेत असलो तरी जिथे अन्याय होईल तेथे रिपाईच्या कार्यकर्त्यांनी जरूर आवाज उठविला पाहिजे. असे आठवले म्हणाले. पुण्यातील वैष्णवी हगवणे हिचा मृत्यू नव्हे तर दोन कोटीच्या मागणीसाठी तिची हत्या करण्यात आलेली आहे.
याप्रकरणी संबधितावर कलम ३०२ नुसार गुन्हा नोंदविण्यात यावा. संबंधित लोक हे पुर्वी शरद पवार व सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आहेत असे सांगितले जाते. असे गुन्हे करणारे लोक हे कोणत्याही पक्षाचे असोत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. महिलांच्या सुरक्षितेबाबत राज्य शासन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावले उचलली पाहिजेत.
हुंड्यासाठी छळ वगैरे बाबीमध्ये समाजाच्या मानसिकेत बदल होणे गरजेचे आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याची मागणी होत असली तरी त्यांनी तक्रारींचे जलदगतीने निरसन करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही आठवले म्हणाले.