रामचंद्र मुळेंना अध्यक्षपदावरुन उतरविले
6 विरुद्ध 0 मतांनी अविश्वास ठराव संमत
पणजी : गेली अनेक वर्षे सहकारक्षेत्रात सक्रिय राहिलेले गोवा राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामचंद्र मुळे यांना एका नाट्यामय पद्धतीने 8 पैकी 6 संचालकांनी अविश्वास ठराव आणून अध्यक्षपदावरुन उतरविले आहे. संचालक मंडळाच्या काल सोमवारी झालेल्या बैठकीत रामचंद्र मुळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव 6-0 फरकाने संमत झाला. अन्य एका संचालकाबरोबरच स्वत: रामचंद्र मुळे यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला. त्यामुळे विरोधकांनी आणलेला ठराव हा 6 विरुद्ध शून्य मतांनी संमत करण्यात आला. ज्या संचालकांनी मुळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव मांडला व संमत केला त्यामध्ये विजयकांत गावकर, देविदास जांभळे, प्रदीप धुळापकर, दत्तात्रय नाईक, हृदयकांत नाईक, मशाल अडपईकर इत्यादींचा समावेश होता. यापूर्वी श्रीकांत नाईक हे अध्यक्ष होते. त्यांच्याविरोधात मुळे यांनी दीड - दोन वर्षांपूर्वी अविश्वास ठराव आणला होता. तो संमत झाल्यानंतर रामचंद्र मुळे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र आता दीड वर्षानंतर मुळे यांच्यावर अविश्वास ठराव आणून त्यांना अध्यक्षपदावरुन हटविण्यात आले.
संचालकांनी घेतली सहकारमंत्र्यांची भेट
दरम्यान, रामचंद्र मुळे यांच्या विरोधात अविश्वास ठराव संमत झाल्यानंतर लागलीच सर्व संचालकांनी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. या संचालकांना मंत्री शिरोडकर यांनी आपल्या शुभेच्छा दिल्या.