For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जखमांचं रामायण

06:21 AM Nov 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
जखमांचं रामायण
Advertisement

आप गैरों की बात करते हैं, हम ने अपने भी आजमाये हैं!

Advertisement

लोग काँटो से बचकर चलते हैं, हम ने फूलों से जख्म खाये है।

‘हे बंध रेशमाचे’ हे नाटक घडताना अभिषेकी बुवांना अपेक्षित असलेलं पद काही जमून येत नव्हतं. तेव्हा त्यांनी हा शेर शांताबाईंना ऐकवला. आणि शांताबाईंनी पद रचलं,

Advertisement

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी

मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे.

खरोखरच परक्या माणसाने जर जखमा दिल्या तर त्याचं दु:ख जरूर होतं पण जर आपल्या माणसांनी विश्वासघात केला तर होणारं दु:ख दुप्पट होतं. कारण त्याला विश्वासघात आणि अपेक्षाभंगाची किनार असते. वाढत्या वयाबरोबर आयुष्यात येणाऱ्या खाचखळग्यांना तोंड देण्याची मनाची तयारी झालेली असते. त्यामुळे जगताना अनेक अनोळखी किंवा अपरिचित किंवा परक्या माणसांकडून आपल्याला त्रास होणारच हे गृहीत धरलं जातं. पण ज्यांना आपण आपली माणसं म्हणतो तीच जर त्यावेळी आपल्या बाजूने उभी राहिली नाहीत तर अतिशय वाईट वाटतं.

नातेवाईक म्हणण्याऐवजी नातेवाईट म्हणायची वेळ येते. शेवटी आपल्याला एकट्याने लढायचं आहे याची जाणीव आपण करून घेतो. परंतु सर्वात वाईट वाटतं ते तेव्हा, जेव्हा आपल्याच माणसांविरुद्ध दंड थोपटून उभं राहावं लागतं. कारण या गोष्टीची आपण कल्पनाही केलेली नसते. असं म्हणतात की सख्ख्या नातेवाईकांचं खरं खरं प्रेम दिसण्याच्या जागा दोनच आहेत! एक म्हणजे रजिस्ट्रार

ऑफिस. आणि दुसरं म्हणजे सिव्हिल कोर्ट! हे थोडे थट्टेने म्हटलं गेलं तरी ही थट्टा कडवट आहे. कारण खरोखरच आपल्याला दिवाणी न्यायालयात वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले अनेक दावे दिसतात. आणि त्यातले पाऊणशे टक्के दावे भावाभावांचे बहिणीबहिणींचे किंवा भावंडांचे कधीकधी तर बापामुलांचे, वारसांचे एकमेकांविरुद्ध दिसून येतात.

अक्षरश: पाच ते दहा फूट लांबीच्या आणि दोन रुंदीच्या पायवाटेसाठी चालणारा झगडा अभूतपूर्व असतो. दिवाणी न्यायालयंसुद्धा आपापसात समझोता करून दावे मिटवावेत यासाठी प्रोत्साहनच देत असतात. तरीही आपल्या क्षुल्लक अहंकारासाठी किंवा एखाद्या विशिष्ट आणि विचित्र हेक्यापोटी हे दावे वर्षानुवर्षे चालवले जातात. त्यात पुन्हा हरलेली पार्टी अपील करते आणि तो मातीचा तुकडा वर्षानुवर्ष कोणाच्याच ताब्यात न राहता कोर्टाच्या निकालाकडे आ वासून वाट बघत राहतो.

या सगळ्या करामती करण्यात प्रचंड पैसा आणि वेळ खर्च होत असतो. यात जराही अतिशयोक्ती नाही की काही वेळा आजोबांनी सुरू केलेला दावा नातू कर्ता होईपर्यंत चालूच राहतो. तीन तीन पिढ्या त्यासाठी लढतात. त्यांचा वेळ, त्यांचे पैसे, नातेसंबंध हे सर्व त्यासाठी खर्ची पडतात. पण त्यांना शहाणपण येत नाही. या सर्व घटना आजच घडणाऱ्या नाहीत. अगदी फार पूर्वीपासून, महाभारतकाळापासून हे सगळं घडतं आहे.

भगवद्गीता जन्माला येण्याच्या पाठीमागे आपापसातलं युद्ध हेच कारण आहे. याला दोन बाजू असतात. त्यातली एक बाजू म्हणजे ज्या वेळेला आपल्या न्याय्य हक्कापासून आपल्याला वंचित ठेवलं जातं तेव्हा ती वंचित ठेवणारी व्यक्ती कोण आहे याचा विचार न करता आपल्याला न्याय मिळवायचा आहे हे मनात पक्कं धरून रणांगणावर उभं राहावं लागतं. आणि दुसरी बाजू अशी आहे की आपल्याच व्यक्तींशी भांडून आपण जे काही मिळवलेलं असतं ते उपभोगण्यासाठी आपलं मन तोपर्यंत शांत राहील का? याचा विचार उभं राहतानाच करून घ्यायचा असतो.

बाकी जखमा अनेक प्रकारच्या असतात. काही तर अशा असतात की ज्या जखमा असूनही हव्याहव्याशा असतात. म्हणून तर भीमराव पांचाळे यांची ‘जखमा कशा सुगंधी झाल्यात काळजाला केलेत वार ज्याने तो मोगरा असावा,’ ही ओळ प्रचंड लोकप्रिय होते आणि ही लोकप्रियता आजपर्यंत टिकते. खरंतर गजल हा जखमांतूनच जन्म झालेला प्रकार असावा. कारण गजलांमधून बऱ्याचदा भळभळत असते ती कधीच न भरलेली जखम. सूचकता आणि अवगुंठन घेऊनच समोर येणे हा गझलेचा एक फार मोठा विशेष आहे. तेव्हा अत्यंत सूचक असणाऱ्या आणि हे झाकीव सौंदर्य घेऊन येणाऱ्या गझला प्रचंड लोकप्रिय झाल्या नाहीत तरच नवल! मग त्यामध्ये हारण्यास एक नवा डाव पाहिजे

साकळे जुना, नवीन घाव पाहिजे

ही भीमरावांनीच गायलेली सुंदर रचना असेल किंवा अगदी ‘ठेच लागली जाता जाता जोडवी टचकली’ सारखी महाखट आणि झणझणीत लावणीची ओळ असेल, जखमांचे निरनिराळे पोत आणि वेगळी गंमत जाणवत राहते. काही जखमा शब्दात पकडून सुनावल्या जात नाहीत. पण आतून त्या वाहत्या असतात हे अगदी स्पष्ट जाणवतं.

लळा जिव्हाळा शब्दच खोटे, माश्या मासा खाई

कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही.

या हताश ओळींच्या पाठी स्वकीयांनी दगा दिल्याची केवढी मोठी जखम आहे हे समजण्यासाठी आणि हे गाणं खऱ्या अर्थाने अनुभवण्यासाठी विश्वासघाताचा एखादा तडाखा खाल्लेला असला पाहिजे माणसाने. काही जखमा भरतात तर काही भरतच नाहीत. काही जखमांचे वण आयुष्यभर राहतात. मग ते नातं, तो विश्वास परत नव्याने येत नाही. काही जखमा महाभारत घडवतात तर काही जखमांनी रामायण घडवलंय. मुळात ‘मा निषाद’ या आर्त उद्गारातून महर्षि वाल्मिकींना महाकाव्य सुचलं ते म्हणजेच रामायण! क्रौंच पक्ष्यांच्या जोडीतील एकाची हत्या एका निषाद म्हणजेच भिल्लाने केली. तो जखमी पक्षी झाडावरून तडफडत खाली पडला आणि त्याने जीव सोडला. ते दृश्य सहन न होऊन वाल्मिकी ऋषींच्या हातून एक महाकाव्य जन्मलं. आणि या कथेतली सगळी युद्ध परिस्थिती उद्भवली तीही कशी? तर विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथीची कृती

सूड घे याचा लंकापती, असा थयथयाट करत रावणाची बहीण शूर्पणखा आपले विरूप नाक कान घेऊन जखमी अवस्थेत लंकेत पोहोचली आणि तिच्या त्या जखमांच्या साक्षीनेच रावणाने रामाला धडा शिकवण्याचा निश्चय केला. रामायण घडलं ते या जखमेतून. पण ते संपतानाही रामसीतेचा वियोग करून वाचकांना अखंड जखमी करीतच राहिलं आहे.

‘स्वामी’कारांनी लिहिलेल्या...

आज आकाशाचा डोळा कशाने गं ओला झाला?

सती जानकीचा त्याग आज रामराये केला.क्षितिजाला दुभंगून रथ जानकीचा गेला सुकलेल्या आसवांत स्वामी अयोध्येचा न्हाला

या ओळी त्याच जखमेची साक्ष पटवीत उभ्या आहेत.

अॅड. अपर्णा परांजपे प्रभु

Advertisement
Tags :

.