अध्यक्षीय निवडणूक लढविणार नाहीत रामास्वामी
आयोवा प्रांतात ट्रम्प यांचा विजय : विवेक यांना रिपब्लिकन पार्टीची उमेदवारी मिळणे अवघड
वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन
भारतीय वंशाचे विवेक रामास्वामी यांनी अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठीची स्वत:ची उमेदवारी रद्द केली आहे. रामास्वामी आता निवडणूक लढविणार नाहीत. रामास्वामी यांनीच यासंबंधी मंगळवारी माहिती दिली आहे. अमेरिकेतील आयोवा प्रांतात रामास्वामी हे रिपब्लिक पार्टीमधील उमेदवारीसाठीच निवडणूक हरले होते. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा विजय मिळविला आहे. येथील निवडणुकीत विवेक हे चौथ्या क्रमांकावर राहिले आहेत.
मी अध्यक्ष होण्याचा कुठलाच मार्ग नाही, यामुळे मी माझी प्रचारमोहीम संपुष्टात आणत असल्याचे रामास्वामी यांनी अध्यक्षीय उमेदवार होण्याच्या शर्यतीतून बाहेर पडत म्हटले आहे. रामास्वामी हे आता ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकेच्या न्यू हॅम्पशायर येथे प्रचारसभा घेणार आहेत.
आयोवाच्या निवडणुकीत फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डी-सेंटिस तर तिसऱ्या क्रमांकावर भारतीय वंशाच्या निक्की हेली राहिल्या आहेत. आयोवात प्रचार करताना ट्रम्प यांनी विवेक रामास्वामी यांच्यावर निशाणा साधला होता. ट्रम्प यांनी रामास्वामी यांना थेट फ्रॉड आणि ठक संबोधिले होते. तसेच ट्रम्प यांनी स्वत:च्या समर्थकांना रामास्वामी यांना साथ न देण्याचे आवाहन केले होते. विवेक यांना मतदान म्हणजे विरोधी पक्षाला मतदान केल्यासारखे असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले होते.
ट्रम्प यांनी सोशल मीडियावर स्वत:च्या प्रचाराचा नवा व्हिडिओ प्रसारित केला आहे. यात अमेरिकेची काळजी घेण्यासाठी देवानचे ट्रम्पला निर्माण केले असल्याचे म्हटले गेले आहे. 14 जून 1964 रोजी देवाने स्वत:ला एका केयरटेकरची गरज असल्याचा विचार केला. मला एक मजबूत आणि साहसी व्यक्तीची गरज आहे, जो लांडग्यांच्या कळपाला घाबरणार नाही असे देवाने म्हटले मग त्याने अमेरिकेला ट्रम्प दिला, असे या व्हिडिओत म्हटले गेले आहे. या व्हिडिओत ट्रम्प यांचे बालपणीचे छायाचित्र दाखविण्यात आले आहे. यानंतर चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांना ट्रम्प भेटतानाचे दृश्य दर्शविण्यात आले आहे.
रामास्वामी यांची पार्श्वभूमी
38 वर्षीय विवेक रामास्वामी यांचा जन्म ओहायो येथे झाला होता. त्यांचे आईवडिल हे भारतातून अमेरिकेत स्थलांतरित झाले होते. विवेक यांनी हार्वर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले आहे. येल येथे शिक्षण घेत असताना अपूर्वा यांना ते भेटले होते. दोघांनीही 2015 मध्ये विवाह केला होता. विवेक यांनी 2014 मध्ये स्वत:ची बायोटेक कंपनी रोइवंत सायन्सेसची स्थापना केली होती.
आयोवातील ट्रम्प यांचा विजय महत्त्वपूर्ण
4 गुन्हेगारी खटले आणि अमेरिकेच्या 2 प्रांतांमध्ये अध्यक्षीय पदाच्या उमेदवारीच्या निवडणुकीतून बाहेर पडल्यावरही ट्रम्प यांनी पहिली प्रारंभिक निवडणूक जिंकली आहे. आयोवा रिपब्लिक नॅशनल कन्व्हेंशनचे केवळ 1.6 टक्के आहे, म्हणजेच निवडणुकीच्या दृष्टीकोनातून हा फार मोठा प्रांत नाही. परंतु ट्रम्प यांनी येथे मोठ्या फरकाने विजय मिळविला आहे. येथे ट्रम्प यांना 51 टक्के मते मिळाली आहे. अध्यक्षीय निवडणुकीसाठी रिपब्लिकन पार्टी अद्याप ट्रम्प यांनाच मजबूत उमेदवार मानत असल्याचे यातून दिसून येत आहे.