For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रामाचे राजकारण

06:51 AM Jan 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
रामाचे राजकारण
Advertisement

‘मंदिर वही बनाएंगे’, अशी अनेक वर्षांची घोषणा आणि स्वप्नपूर्तीमुळे देशभर रामभक्तीची आणि हिंदू संघटनांची लाट आली आहे. भाजपा आणि मोदी-शहा जोडीने तर ती आपलीसी केली आहे. आणि या लाटेने भयभीत झालेले पक्ष संघटना भाजपाला लक्ष करू पहात आहेत. यातून एकच स्पष्ट होते, समोर असलेल्या निवडणुका या रामाचे राजकारण करत आणि या निवडणुकीत हिंदू मते एकवटत भाजपा मैदानात उतरणार. 22 जानेवारीला अयोध्येत भव्य-दिव्य अशा राममंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. नरेंद्र मोदी यांनी दोन आठवड्याचे खडतर तप व उपवास करून मूर्तीत प्राणप्रतिष्ठा केली आणि अवघ्या भारत वर्षात रामदिवाळी साजरी झाली. देशभरातली महानगरे, शहरे, वाड्या-वस्त्या श्रीरामाचा जयजयकार करत भगवी पताका नाचवत होत्या आणि खुशीचे लाडू-पेढे वाटून फटाके फोडत रामभक्तीत न्हाऊन निघाल्या होत्या. देशभरातील संत, महंत विविध क्षेत्रातील प्रमुख आणि निमंत्रित यांच्या उपस्थितीत झालेला सोहळा एक उत्तम व नियोजनबद्ध कार्यक्रम होता. भव्यता, दिव्यता, उत्सुकता, सौंदर्य, भक्ती आणि परंपरा यांचे उत्कृष्ट दर्शन यातून झाले आणि केवळ अयोध्येचीच नाही तर  भारतातील पर्यटन व्यवसायाची दिशाच बदलली गेली. सामाजिक माध्यमे आणि प्रचार-प्रसार माध्यमे यातून या सोहळ्याला जी प्रसिद्धी मिळाली आणि देशभर त्यांचे जे पडसाद उमटले, उमटत आहेत ते अभूतपूर्व आहेत. या लाटेला रामलाट म्हणावी की, त्सुनामी असा अनेकांना प्रश्न पडावा, अशी ही शक्ती आहे आणि वर्षानुवर्षे संघर्ष करणाऱ्या आणि ‘मंदिर वही बनाएंगे’ चा नारा देत मागणी लावून धरणाऱ्यांना त्याचा लाभ होणार, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही. भाजपाचे विरोधकही आता राम कुणा पक्षाचा नाही, राम सर्वांचा आहे म्हणत या लाटेत तरण्याचा प्रयत्न करत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून खोटा समाजवाद आणि ढोंगी राजकारण यावर प्रहार करत रामजन्मभूमी आंदोलन गाजवले होते. भाजपाने 370 कलम रद्द, रामजन्मभूमी मुक्ती व भव्य मंदिर आणि समान नागरी कायदा, अशी आश्वासने दिली होती. मोदी-शहांनी या आश्वासनांना न्याय दिल्याने हिंदू मतपेटी बळकट होत असल्याचे दिसते आहे. त्याच जोडीला हिंदू-मुस्लीम असे मतांचे ध्रुवीकरणही दिसते आहे. काँग्रेस आणि भाजपा विरोधी प्रादेशिक पक्ष व त्यांच्या इंडिया आघाडीला या रामत्सुनामीतून कसे तरायचे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेनेने नाशिक येथे काळाराम मंदिरात ठाकरे कुटुंबियांच्याहस्ते रामाची पूजा, गोदावरीची आरती आणि शिवसेना ठाकरे गटाचे अधिवेशन घेऊन भाजपावर शरसंधान केले आहे. उद्धव ठाकरे यांचा भगवा पेहराव आणि गळ्यात रूद्राक्षमाळ बरेच काही सांगून जाणारी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात पात्रता अपात्रता खरी खोटी ही लढाई सुरू आहे. त्याचा शेवट काय होतो, हे पहावे लागेल. पण, उद्धव ठाकरे हे संजय राऊत यांना सोबत घेऊन भाजप व एकनाथ शिंदे गटावर रोज आगपाखड करत आहेत. राज्यात रामलाटे इतकाच आरक्षण संघर्ष आहे. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे भगवे वादळ घेऊन मुंबईकडे कूच करीत आहेत. तर ओबीसी संघटनाही पिवळे वादळ नेण्याची तयारी करून आहेत. या दोन्ही वादळाचा तडाखा मुंबईला बसला तर मुंबईची काय हालत होईल, हा प्रश्नच आहे. पण, जातीच्या मोठ्या मतपेट्या सरकारला वाकवू शकतात, हवे ते निर्णय करून घेऊ शकतात, असे चित्र समोर येते आहे. शिंदे सरकार आणि राज्यातील सर्वच राजकीय पक्ष ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार, असे म्हणत आहेत. पण, टोकाचा संघर्ष आणि शक्तीप्रदर्शन सुरू आहे. यातून आगामी काळात काय होते, हे पहावे लागेल. तूर्त मुंबई आणि महाराष्ट्र संघर्षाच्या टोकावर उभा आहे. भाजपाचे केंद्रीय नेते महाराष्ट्रावर लक्ष ठेऊन आहेत. प्रजासत्ताक दिनाची दिल्लीत तयारी सुरू आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना ‘भारत रत्न’ ने गौरवले जाणार आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीचे अंदाजे तारीख सोळा एप्रिल असेल, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ही तारीख म्हणजे निवडणुकीची घोषणा नव्हे तर प्रशासनाला मार्गदर्शक किंवा डेडलाईन अशी संभाव्य तारीख आहे. या पत्रकाचा अर्थ सर्वच राजकीय पक्षांना लागला आहे. एप्रिलमध्ये 17 तारखेला रामनवमी आहे. त्यामुळे या दरम्यान मतदानाची तारीख जाहीर झाली तर रामाचे राजकारण तीव्र होणार, हे स्पष्ट आहे. अयोध्येत राममंदिराच्या उद्घाटनानंतर बालकराम दर्शनासाठी भाविकांचा महासागर उसळला आहे. पहिल्या दिवशीच प्रचंड गर्दी करत सुमारे तीन लाख लोकांनी रामदर्शन साधले. भाविकांना आवरताना पोलीस आणि प्रशासनाची दमछाक होते आहे. गर्दी, चेंगराचेंगरी यामुळे अयोध्येत काहीही होऊ शकते, हे लक्षात घेऊन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला फैलावर घेतले आहे. स्वत: या परिसराची हवाई पहाणी करत राममंदिराची सुरक्षा व शिस्त या संदर्भात पावले उचलली आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी सुमारे कोटी-दीड कोटी जनतेने अयोध्येत जाऊन बालकराम दर्शन घ्यावे, अशी योजना भाजपा पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अवघे मंत्रीमंडळ एकसाथ दर्शन घेणार आहेत. भाजपाने आपल्या सर्व आमदार, खासदार, मंत्री व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना जनतेला एक हजार रूपयात प्रभू रामाचे मंदिर व दर्शन घडावे, असे आदेश दिले आहेत. देशात अनेक प्रमुख शहरातून अयोध्येसाठी विशेष रेल्वेचे आयोजन केले आहे. संसदेचे अधिवेशन समोर आहे. सरकार अंतरिम बजेट सादर करणार आहे. अर्थात निवडणूक पूर्व अशा या अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणा असणार हे उघड आहे. राहूल गांधी भारत जोडा यात्रा पार्ट-टूचा प्रयोग करत आहेत. पण, मुंबईत मिलिंद देवरांनी काँग्रेस सोडून लोकसभा मैदानातील वाऱ्याची दिशा स्पष्ट केली आहे. रामाचे राजकारण आणि व्होट बँका जातीय संघटना, देशाचे राजकारण कोठे नेणार हे ठरवत असल्या तरी मतपेटीतून कोणाला कौल येणार यावरच लोकशाहीचे, देशाचे हित आणि भविष्य ठरणार आहे. तूर्त श्रीरामलाट जोराची आहे व त्यावर स्वार होऊन यशासाठी जो तो संधी शोधतोय.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.