For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहरात रमजान ईद उत्साहात साजरी

11:04 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहरात रमजान ईद उत्साहात साजरी
Advertisement

बेळगाव : मुस्लीम बांधवांचा पवित्र सण म्हणून ओळखली जाणारी रमजान ईद शहरात गुरुवारी उत्साहात साजरी करण्यात आली. पारंपरिक पद्धतीने अंजुमन येथील ईदगाह मैदानावर सामुदायिक नमाज पठण करून मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. मुस्लीम बांधवांनी श्रद्धा आणि भावनेने रोजे करून रमजान ईद साजरी केली. या निमित्ताने घरी खाद्यपदार्थांची रेलचेल पहावयास मिळाली. दूध, सुकामेवा आणि शिरखुर्माचाही बेत आखण्यात आला होता. दि. 12 मार्चपासून रोजांना प्रारंभ झाला होता. या कालावधीत विविध सौंदर्यप्रसाधने, सुकामेवा, खजूर आदींची मागणी वाढली होती. त्यामुळे बाजारातही मुस्लीम बांधवांची रेलचेल पहावयास मिळाली. गुरुवारी मुस्लीम बांधवांनी शुभेच्छा आणि भेटवस्तूंची देवाण-घेवाण करून ईद मुबारक अशा शुभेच्छा दिल्या. चंद्र दर्शनानंतर ईद शुभेच्छा देणारे संदेश सोशल मीडियावर फिरत होते. एकूणच इस्लाम धर्मियांचा महत्त्वाचा मानला जाणाऱ्या रमजान ईद सणाबाबत मुस्लिमांमध्ये चैतन्याचे वातावरण पहावयास मिळाले.

Advertisement

वडगाव परिसरात मिरवणूक

शहर परिसरात गुरुवारी रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. विविध उपनगरांमध्ये रमजान ईदनिमित्त मिरवणूक काढण्यात आली. यावेळी मुस्लीम बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. वडगाव येथील निजामीया दर्ग्यापासून मिरवणूक काढण्यात आली. तत्पूर्वी मौलाना अहम्मद यांनी नमाज पठण केले. यावेळी मुस्लीम समाजाचे पंच सलीम सय्यद, अन्वर पठाण, अशरफ मदरंगी, यासीन, मलिक सनदी आदींनी मिरवणुकीत सहभाग घेतला होता. निजामीया चौक येथून मिरवणुकीला प्रारंभ होऊन विष्णू गल्ली, वझे गल्ली कॉर्नर, महात्मा फुले रोड, नाझर कॅम्प येथून ईदगाह मैदानावर पोहोचली. त्या ठिकाणी सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. त्यानंतर मिरवणूक रामदेव गल्ली, चावडी गल्ली, धामणे रोडमार्गे विष्णू गल्ली कॉर्नर येथील निजामीया दर्ग्यात पोहोचली. यावेळी मुस्लीम बांधवांना हिंदु बांधवांकडूनही ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.