राम मंदिराला दहशतवाद्यांकडून धोका
जैश-ए-मोहम्मदने दिली धमकी : सुरक्षेत वाढ
वृत्तसंस्था/ अयोध्या
मागील तीन दिवसांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले आहेत. आता अयोध्येतील राम मंदिर देखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तानातील दहतशवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने एक ऑडिओ जारी करत राम मंदिरावर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. तर दहशतवादी हल्ल्याचा इशारा मिळाल्यावर पोलिसांनी मंदिर परिसरातील सुरक्षा वाढविली आहे.
अयोध्येच्या सुरक्षेत भर करण्यासाठी तेथे एनएसजीचे केंद्र स्थापन करण्याचा विचार केंद्र सरकारकडून सुरू आहे. हे देशातील एनएसजीचे सहावे केंद्र असणार आहे. यापूर्वी चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि अहमदाबाद येथे एनएसजीचे केंद्र आहे. आता अयोध्येतही एनएसजीचे केंद्र स्थापन केले जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तवच हे पाऊल उचलण्यात येणार आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा धोका पाहता अयोध्येत एनएसजीचे कमांडो तैनात केले जाणार आहे.
अयोध्येतील राम मंदिरावर हल्ला करण्याची धमकी देणाऱ्या जैश-ए-मोहम्मदने यापूर्वी येथे हल्ला केला होता. 2005 साली या दहशतवादी संघटनेने स्फोटकांनी भरलेली जीप आदळवून स्फोट घडवून आणला होता. या हल्ल्यानंतर देशाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले हेते. आता देखील अशाच प्रकारचा हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. मागील वर्षी देखील दहशतवाद्यांकडून स्फोटाची धमकी देण्यात आली होती. आता जैश-ए-मोहम्मदने ऑडिओ जारी करत अयोध्येत दहशतवादी हल्ल्याची धमकी दिली आहे.