शहरात रामनवमी भक्तिभावाने साजरी
बेळगाव : शहर परिसरात रामनवमी भक्तिभावाने व मोठ्या श्रद्धेने साजरी करण्यात आली. राम मंदिरांसह अन्य मंदिरांमध्ये रामनामाचा अखंड गजर सुरू होता. पहाटेपासूनच मंदिरांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम झाले आणि दुपारी 12 वाजता रामजन्मोत्सव झाला. महिलांनी रामाचा पाळणा म्हटला. विविध मंदिरांमध्ये तीर्थप्रसाद वितरित करण्यात आला. काही मंदिरांनी महाप्रसादाचेही आयोजन केले होते.
लोकमान्य श्रीराम मंदिर
लोकमान्य संचालित शहापूर गाडेमार्ग-आचार्य गल्ली येथील पुरातन असलेल्या श्रीराम मंदिरामध्ये बुधवारी सकाळी 8 वाजता लोकमान्य सोसायटीचे संचालक सुबोध गावडे यांच्या हस्ते राममूर्तीवर दुग्धाभिषेक करण्यात आला. 9 वाजता जीवनविद्या मिशन, स्वानंद केंद्र-खासबाग यांच्यावतीने हरिपाठ झाला. 10.30 वाजता हभप जोतिबा महाराज चौगुले-अलतगे यांचे प्रभू श्रीरामचंद्रांवर आधारित कीर्तन झाले. खासबाग महिला मंडळाच्यावतीने रामल्ललांचा पाळणा म्हणण्यात आला. त्यानंतर 12 वाजता रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित महाप्रसादाचा 3 हजारांहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संचालक, सीईओ, सुरक्षा अधिकारी, पीआरओ तसेच कर्मचारी उपस्थित होते.
गणेशपूर श्री रुद्रकेसरी मठ
गणेशपूर येथील श्री रुद्रकेसरी मठामध्ये हरिगुरु महाराजांच्या उपस्थितीत रामनवमी साजरी करण्यात आली. सकाळी सर्वप्रथम श्री सिद्धारुढ महाराजांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाअभिषेक व आरती झाली. सकाळी 10 वाजता भजन व त्यानंतर 12 वाजता महिलांनी पाळणा म्हणून राम जन्मोत्सव साजरा केला. यानंतर तीर्थप्रसाद वितरित करण्यात आले. हरिगुरु महाराजांनी आपल्या प्रवचनामध्ये भगवंतांची अनेक रूपे पण त्यातील एकतत्व एकच राम आपल्या सर्वांमध्ये आत्मारामाच्या रुपामध्ये वसतो, असे सांगितले. सायंकाळी विविध भजनी मंडळांचे भजन, संतांचे चरित्र पठण होऊन महाआरतीने सांगता झाली.
माळमारुती
श्री साई मंदिर अभिवृद्धी सेवा समितीतर्फे सकाळी 6 वाजता अभिषेक, पूजा, दुपारी 12 वाजता श्रीराम व श्री साई जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आरतीनंतर दुपारी 1 वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ झाला. सायंकाळी पुन्हा आरती झाली. भाविकांनी दर्शनाला व महाप्रसादाला गर्दी केली होती.
सूर्यवंशी क्षत्रिय संघ
बेळगाव दक्षिण विभाग सूर्यवंशी क्षत्रिय कलाल समाज सेवा संघातर्फे रामनवमी साजरी करण्यात आली. सकाळी 10 वाजता पूजा, 12 वाजता अभिषेक व 12.30 नंतर महाप्रसाद झाला. कणबर्गी येथील रामतीर्थ देवस्थानमध्ये मंगळवार दि. 16 रोजी हिरेमठापासून श्रीराम मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी सकाळी 8 वाजता श्रीराम मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. दुपारी 12 वाजता जन्मोत्सवानंतर 12.30 ते 5.30 वाजेपर्यंत महाप्रसाद झाला.
शाहूनगर
साई कॉलनी, शाहूनगर येथील ओम श्री साई सेवा मंडळातर्फे रामनवमी उत्सव व साई मंदिराचा दहावा वार्षिकोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी विष्णू याग झाला. सायंकाळी 4.30 वाजता साई मंदिर ते गणेश व दत्त मंदिरापर्यंत पालखी सोहळा झाला. बुधवारी पहाटे 6 वाजता काकडारती, रुद्राभिषेक, 12 वाजता रामजन्मोत्सव सोहळा व आरती, 12.30 वाजता शंकर मुतगेकर यांचे भक्तिगीत झाले. त्यानंतर महाप्रसाद झाला. 7 वाजता धुपारती होऊन रात्री 9 वाजता शेजारतीने सांगता झाली.
बिच्चू गल्ली-शहापूर
येथील राम मंदिरात सकाळी 8 वाजता पंचामृत अभिषेक, सकाळी 8.30 वाजता पुष्पालंकार, दुपारी 12 वाजता राम जन्मोत्सव व प्रसाद वाटप झाले. सायंकाळी 5 वाजता महिला योग मंडळातर्फे भक्तिगीत व भावगीत कार्यक्रम, रामरक्षा व रामनाम जप व त्यानंतर बोंद्रे यांचे भजन झाले.