ट्रम्प सहकाऱ्यांकडून राम मंदिराचा उल्लेख
काश्यप पटेल यांना सीआयए प्रमुखपद
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकेच्या अध्यक्षपद निवडणुकीत विजय झाल्यानंतर सध्या त्यांच्या एका निकटच्या सहकाऱ्याचे नाव चर्चेत आहे. भारतीय वंशाचे काश्यप पटेल हे सहकारी आहेत. ट्रम्प यांच्या प्रथम कार्यकाळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले होते. आता त्यांची नियुक्ती कदाचित सीआयए या अमेरिकेच्या जगप्रसिद्ध गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फेब्रुवारीत अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरात भगवान रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेत सत्तेत नव्हते. मात्र, काश्यप पटेल ज्यांचा उल्लेख काश पटेल असा केला जातो, त्यांनी या घटनेवर केलेले भाष्य आता पुन्हा चर्चेत आले आहे.
प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला अमेरिकेतल्या वृत्तपत्रांनीही मोठी प्रसिद्धी दिली होती. पण ती देताना टीकात्मक अंगाने दिली होती. रामजन्मभूमी आंदोलनाचा गेल्या 50 वर्षांचा इतिहास अमेरिकेच्या वृत्तपत्रांमध्ये विशेषत्वाने दिला होता. मात्र, अयोध्येतली रामजन्मभूमीच्या स्थानी असणारे मंदिर आता निर्माण केले नसून ते गेल्या 500 वर्षांपासून तेथे आहे. या मंदिरासाठीच्या आंदोलनाचा इतिहास केवळ गेल्या 50 वर्षांचा नसून तो 500 वर्षांचा आहे, असे वक्तव्य काश्यप पटेल यांनी केले होते. आता ट्रम्प पुन्हा विजयी झाल्यानंतर हे विधानही पुन्हा चर्चेत आले असून त्याचा संदर्भ सध्याच्या घटनांशी जोडला जात आहे.
निकटचे सहकारी
पटेल हे ट्रम्प यांचे निकटचे सहकारी आहेत. ट्रम्प यांच्या अडचणीच्या काळातही ते त्यांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जात होते. त्यांची नियुक्ती सीआयएच्या प्रमुखपदी करावी, अशी मागणी अनेक सहकाऱ्यांनी ट्रम्प यांच्याकडे केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.