For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर परिसरात रामभक्तीचा दरवळ

12:04 PM Jan 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर परिसरात रामभक्तीचा दरवळ
Advertisement

रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा अपूर्व उत्साहात साजरा : भगवे ध्वज फडकावून फुलापानांची उधळण : हनुमान चालिसा पठण

Advertisement

बेळगाव

‘विजय पताका श्रीरामाची

Advertisement

झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी।।

गुलाल उधळून नगर रंगले

भक्तगणांचे थवे नाचले।।

रामभक्तीचा गंध दरवळे

गुढ्या तोरणे घरोघरी।।

या गाण्याच्या ओळी सोमवारी शहरवासियांच्या उत्साहामुळे सार्थ ठरल्या. रांगोळ्या रेखाटून, तोरणे लावून, भगवे ध्वज फडकावून फुलापानांची उधळण करून श्री रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा बेळगावकरांनी अपूर्व उत्साहात साजरा केला आणि खऱ्या अर्थाने शहरात रामभक्तीचा गंध दरवळला. 22 जानेवारी रोजी अयोध्या येथे श्री रामलल्ला मूर्तीची प्रतिष्ठापना होईल, असे पंतप्रधानांनी जाहीर केल्यानंतर पूर्ण आठवडा शहर राममय झाले होते. आठवडाभरापासूनच राममंदिरांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली. त्याचबरोबर शहरातील अन्य मंदिरांचीही स्वच्छता झाली. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तर गल्लोगल्ली कार्यकर्त्यांनी विविध उपक्रम करून हा सोहळा यशस्वी केला. सोमवारी सकाळी ठिकठिकाणी प्रभातफेरी, पालखी मिरवणूक, शोभायात्रा, सामूहिक रामरक्षा पठण, हनुमान चालिसा पठण असे कार्यक्रम सुरू झाले. शिवाय प्रत्येक गल्लीमध्ये राममूर्तीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवून तिची सजावट करून पूजा आणि रामरक्षा पठण करण्यात आले. विशेष म्हणजे शहरातील असा कोणताही भाग नव्हता की जेथे राममूर्तीचा उद्घोष झाला नाही. बेळगावमध्ये या सोहळ्याचा उत्साह अपूर्व होता. शनिवारी दुपारपासूनच कार्यकर्ते तयारीला लागले होते. गल्लोगल्ली कोणी भगव्या पताका लावल्या, कोणी बल्ब लावून परिसर उजळवला, कोणी पूर्ण गल्लीमध्ये विद्युत रोषणाई केली. सोमवारी झालेल्या महाप्रसादासाठी रविवारी दुपारपासूनच कार्यकर्ते खपत होते. रविवारी रात्री शहरातील बहुसंख्य गल्ल्यांमध्ये महिलांनी कलात्मक अशा रांगोळ्या रेखाटल्या.

मंदिरांमध्ये धार्मिक विधी पार पडले. अयोध्या येथे पंतप्रधानांनी ठरलेल्या मुहूर्तानुसार रामलल्लाच् ााr प्रतिष्ठापना केली आणि एकच जल्लोष सुरू झाला. त्यानंतर ठिकठिकाणी महाप्रसाद सुरू झाले. असंख्य ठिकाणी महाप्रसाद असले तरी प्रत्येक ठिकाणी भाविकांची गर्दी अलोट होती. पांगुळ गल्ली, हेमू कलानी चौक, टिळकवाडी-आगरकर रोड, ताशिलदार गल्ली, अनंतशयन गल्ली, नेहरूनगर येथील बसवण्णा मंदिर यासह अनेक ठिकाणी महाप्रसाद पार पडले. कार्यकर्त्यांनी यासाठी बरेच परिश्रम घेतले. नागरिकांनीसुद्धा रांगेत उभे राहून महाप्रसादाचा आस्वाद घेतला. याशिवाय गल्लोगल्ली जेथे जेथे राममूर्ती किंवा प्रतिमा उभारण्यात आल्या, तेथेसुद्धा कार्यकर्त्यांनी गूळपोहे, शिरा, लाडू अशा प्रसादाचे वाटप केले. हेमू कलानी चौक येथे तर सकाळपासून रात्रीपर्यंत वेगवेगळ्या प्रांतांचे खाद्यपदार्थ प्रसाद स्वरुपात वाटण्यात आले. प्रसाद म्हणून जिलेबी वाटप करण्यात आली तरी जिलेबी करणाऱ्या आचाऱ्यालाच कार्यकर्त्यांनी स्टॉल मांडून दिला. त्यामुळे ताज्या आणि गरमागरम जिलेब्यांचा आस्वाद नागरिकांना मिळाला. सायंकाळी ठिकठिकाणी लेझर शो पार पडले. तत्पूर्वी संध्याकाळी बहुसंख्य मंदिरांमध्ये आणि गल्ल्यांमध्ये सामूहिक आरती आणि दीपोत्सव करण्यात आला. लेझर शोद्वारे तसेच विद्युतमाळांच्या रोषणाईमध्ये ‘श्रीराम’ अशी अक्षरे दिसून आल्याने अनेकांनी कार्यकर्त्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले. बहुसंख्य मंदिरांमध्ये श्रीरामाची तसेच जानकी-लक्ष्मणासमवेत रांगोळी रेखाटण्यात आली होती. या रांगोळ्या पहाण्यासाठीसुद्धा नागरिकांनी गर्दी केली.

श्रीरामभक्त सेवा संघ

श्रीरामभक्त सेवा संघ, टिळकवाडीतर्फे सोमवारी सकाळी श्रीरामांची पालखी काढण्यात आली. दुसरे रेल्वेगेट येथील मारुती मंदिरहून सकाळी 7.30 वाजता ही पालखी मिरवणूक निघाली. तेथून रानडे रोड, आगरकर रोड, नेहरू रोड येथून शिवराम मंदिरामध्ये मिरवणूक पोहोचली. त्यानंतर सकाळी 11 वा. श्रीरामाची पूजा करण्यात आली. दुपारी दीडनंतर महाप्रसाद झाला. सायंकाळी या परिसरातील सर्व लोकांनी घरोघरी दीपोत्सव साजरा केला.

वेंकटरमण देवस्थान

विठ्ठलदेव गल्ली, शहापूर येथील वेंकटेश्वर देवस्थानाच्यावतीने श्रीरामाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने रथ काढण्यात आला. वास्तविक, या मंदिरातर्फे दसऱ्यादिवशी रथ काढण्यात येतो. परंतु, या दिवसाचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व लक्षात घेऊन मंदिरातर्फे सोमवारी रथ काढण्यात आला. देवस्थानापासून आचार्य गल्ली आणि परिसरामध्ये हा रथ काढण्यात आला. तेव्हा महिलांनी ठिकठिकाणी श्रीरामाच्या मूर्तीची आरती केली. त्यानंतर देवळामध्ये महाआरती होऊन प्रसाद वितरण करण्यात आले.

रामभक्त महिला संघ

रामभक्त महिलांनी सोमवारी सकाळी समर्थ मंदिर येथे सामूहिकरित्या रामरक्षा म्हटली. त्यानंतर सर्व महिला रामदेव गल्लीतील राम मंदिरामध्ये आल्या. तेथे महिलांनी एकत्रितपणे सामूहिकरित्या रामरक्षा व हनुमान चालिसा पठण केले. टिळकवाडी आणि शहरातील बहुसंख्य महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या.

कपिलेश्वर कॉलनी

येथील रिद्धीसिद्धी विनायक मंदिरमध्ये सकाळी होम झाला. त्यानंतर स्वरगंध भजनी मंडळाचे भजन झाले. कलावती आईचे भजन झाले. प्रभू रामचंद्रावर आधारित नृत्यही सादर करण्यात आले. यानंतर हनुमान चालिसा आणि विष्णू सहस्रनाम पठण झाले. दुपारी रामकृष्ण मिशनच्या स्वामींचे कीर्तन व भजन, सायंकाळी 6 वाजता परशुराम कणगुटकर महाराज यांचे कीर्तन झाले. 6 ते 7 यावेळेत इस्कॉन मंदिरातर्फे नृत्य, भजन व कीर्तन झाले व रात्री 8.30 वा. महाआरती झाली.

रेणुकादेवी मंदिर

जुना पी. बी. रोड येथील रेणुका मंदिरामध्ये सकाळी 11 वा. होमहवन, सायंकाळी 5 वा. 1008 वेळा रामनाम जप झाला. 6 वा. 1008 दिवे प्रज्वलित करून 1008 सुवासिनींची ओटी भरण्यात आली. सायंकाळी 7.30 वा. महाआरती झाली.

बिच्चू गल्ली, शहापूर

बिच्चू गल्ली, शहापूर येथील श्रीराम देवालयात प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त सकाळी नित्यपूजा, त्यानंतर विशेष पूजा, पंचामृत व दुपारी 12 वाजता आरती आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी 4 ते 5 या वेळेत महिला मंडळाचा भक्तीगीतांचा कार्यक्रम झाला. 5 ते 6 या वेळेत रामनाम जप आणि रामरक्षा पठण करण्यात आले. सायंकाळी 6 नंतर दीपोत्सव आणि आरती होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

मारुती देवस्थान, खडेबाजार-शहापूर

खडेबाजार शहापूर येथील मारुती देवस्थानात प्राणप्रतिष्ठेनिमित्त सकाळी 10 ते 11 या वेळेत हनुमान चालिसा पठण करण्यात आले. 11 ते 1 रामनाम जप करण्यात आला. सायंकाळी 6 ते 8 यावेळेत रामरक्षा आणि रामनाम जप झाला. रात्री 8 वा. आरती आणि प्रसादाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी महिला आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गंगापुरी मठ, कोरे गल्ली

श्री गंगापुरी मठ ट्रस्ट आणि सार्वजनिक श्री गणेशोत्सव तरुण मित्रमंडळ यांच्यातर्फे प्राणप्रतिष्ठेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. सकाळी 10.30 ते दुपारी 12.30 या वेळेत स्वामी समर्थ महिला भजनी मंडळाचा सत्संग झाला. त्यानंतर रामनाम स्तोत्रपठण, 56 प्रसादांचा भोग, सायंकाळी 5.30 ते 7 या वेळेत प. पू. कलावती आई भजनी मंडळ यांचा रामनवमी भजनाचा कार्यक्रम झाला. 7 ते 8.30 श्री गंगापुरी महाराज भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री 8.30 वा. श्रीराम मूर्तीची व गंगापुरी महाराजांची पूजा आणि महाआरती झाली. रात्री 9 वा. तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.

अनंतशयन गल्ली

अनंतशयन गल्ली येथे अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. टिळक चौक ते श्रीराम मंदिर अनंतशयन गल्ली या दरम्यान शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी महिला व पुरुष मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सकाळी 11 वाजता राममूर्ती पूजा व पंचामृत अभिषेक करण्यात आला. त्यानंतर रामनाम जप व होम करण्यात आला. दुपारी 1 नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. 4 हजारांहून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी रामरक्षा पठण करण्यात आले. सायंकाळी 6 वा. महाआरती करून मंदिर परिसरात दीपोत्सव करण्यात आला. मंदिर परिसरात 6 फूट उंच अगरबत्ती लावण्यात आली. मंदिराचे संचालक राजेश कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. होम व पौरोहित्य जयतीर्थ जालीहाळ व संजय वाळवेकर यांनी केले.

महालक्ष्मी मंदिर, हिंदवाडी

हिंदवाडी महिला मंडळातर्फे महालक्ष्मी मंदिरामध्ये विशेष पूजाअर्चा करण्यात आली. सकाळी होम झाला. तत्पूर्वी रुद्राभिषेक व अलंकार पूजन झाले. महामंगळारतीनंतर सायंकाळी दीपोत्सव करण्यात आला. विशेष म्हणजे महिला मंडळातर्फे श्रीरामांना 56 भोग दाखविण्यात आले.

अंबाबाई देवस्थान, नाथ पै सर्कल

सोमवंशीय सहस्रार्जुन समाजाच्या अंबाबाई देवस्थानामध्ये पंचकमिटी व विश्वस्त यांच्या पुढाकाराने रविवारी 1 लाख 8 हजार रामनाम जप करण्यात आले. त्यानंतर होम आणि यज्ञ होऊन 12 हजार आहुती देण्यात आल्या. यजमानपद महेश मिरजकर व हरीश धोंगडी यांनी स्वीकारले होते. आरती झाल्यानंतर महाप्रसादाला सुरुवात झाली.

साईमंदिर, शाहूनगर

रामलल्ला मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने शाहूनगर येथील साई मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पहाटे काकडारती करण्यात आली. यानंतर श्रीरामांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यानंतर दुपारी 12 वाजता भजन पार पडले. यानिमित्ताने मंदिरामध्ये विद्युत रोषणाई करून फुलांची सजावट करण्यात आली. श्री साईबाबांच्या मूर्तीला विशेष आरास करण्यात आली होती. मूर्तीसमोर रांगोळीमध्ये प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण, हनुमानांचे सुरेख चित्र रेखाटण्यात आले होते. कंग्राळी खुर्द येथील ह.भ.प. शंकर मुतगेकर व त्यांच्या सहकाऱ्यांकडून भजन सादर करण्यात आले. दुपारी 12.30 वाजता अक्षता अर्पण सोहळा संपन्न झाला. यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. साई कॉलनी येथील महिला मंडळांतर्फे गीत रामायण व भजन सादर करण्यात आले. यानंतर सायंकाळी टाळ व मृदंगाच्या गजरात श्रीराम प्रतिमेची फेरी काढण्यात आली. यानंतर सायंकाळी मंदिरामध्ये दीपोत्सव करण्यात आला.

मध्यवर्ती मार्केट, झेंडा चौक

मध्यवर्ती मार्केट व्यापारी बंधू संघटना, झेंडा चौक, मार्केट, बेळगावच्या व्यापाऱ्यांच्या वतीने अयोध्येत श्री राम प्राणप्रतिष्ठापनानिमित्त श्री राम प्रतिमा पूजन सोहळा पार पडला. त्यांनी पारंपरिक पूजाविधी केल्यानंतर आरती झाली आणि सर्व जाणाऱ्या भाविकांना, सार्वजनिक प्रसाद लाडूचे वाटप केले. यावेळी परिसरातील व्यापारी, भाजी विव्रेते उपस्थित होते. प्रचंड आतषबाजीचे प्रदर्शन करण्यात आले. बाजारपेठेचा संपूर्ण परिसर भगवे ध्वज आणि पताका यांनी सजविण्यात आला होता.

स्वातंत्र्यसैनिक भवन

पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र यांच्या प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त स्वातंत्र्य सैनिक भवन येथे धार्मिक कार्यक्रम झाले. संघाचे अध्यक्ष राजेंद्र कलघटगी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्रीराम प्रतिमेचे पूजन संघाचे उपाध्यक्ष सुभाष होनगेकर, सचिव विवेकानंद राम पोटे याच्या हस्ते करण्यात आले. सुभाष होनगेकर यांनी सर्वांचे स्वागत करून मनोगत व्यक्त केले. यावेळी सर्व संचालक उपस्थित होते.

कपिलेश्वर मंदिर

दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरामध्ये राममंदिर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवपिंडीला चंदनाचा लेप लावून सुंदर आरास करण्यात आली होती. सोमवारी सकाळी कपिलेश्वराला रुद्राभिषेक करण्यात आला. अयोध्या येथील राम मंदिराच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचे स्क्रीनवर थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. सनई-चौघड्यांच्या मंगल वाद्यामध्ये हा सोहळा पार पडला. सायंकाळी नगर प्रदक्षिणा घालून सोहळ्याची सांगता झाली. त्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले.

मारुती गल्ली, अनगोळ

अनगोळ येथील मारुती गल्ली येथे राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. मारुती मंदिरात सकाळी विशेष पूजेचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाआरती करण्यात आली. महापौर शोभा सोमनाचे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. सायंकाळी 7.30 नंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. 3 ते साडेतीन हजार नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी महिला मंडळ व युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोतीलाल चौक, भेंडीबाजार

मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील स्Žिद्धिविनायक ट्रस्टच्यावतीने सोमवारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सिद्धिविनायक मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 20 हजाराहून अधिक नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भेंडीबाजार, पांगुळ गल्ली, भोई गल्ली, टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली, आझाद गल्ली, कसाई गल्ली, माळी गल्ली, मेणसी गल्ली, भातकांडे गल्ली यांच्या सहकार्याने महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. परिसरातील व्यापारी व युवक कार्यकर्त्यांनी मेहनत घेऊन महाप्रसादाचे वितरण केले.

श्रीरामाचा जयघोष...

  • रामलल्ला मूर्ती प्रतिष्ठापनेच्या सोहळ्याचे प्रक्षेपण सर्वांना पहाता यावे यासाठी विविध ठिकाणी स्क्रीन उभी केली होती.
  • बँकांना अर्धा दिवस सुटी देण्यात आल्याने अडीचनंतर बँकांचे कामकाज सुरू झाले.
  • केंद्र सरकारच्या कक्षेत येणारे टपाल कार्यालय, रेल्वे कार्यालय, आयकर कार्यालयाचे कामकाज दुपारनंतर सुरू झाले. रेल्वेसेवा मात्र सुरळीत सुरू होती.
  • राज्य सरकारने शाळांना सुटी जाहीर केली नाही. तथापि, पालकांनी आपल्या मुलांना सोहळ्याचे प्रक्षेपण पहाता यावे यासाठी त्यांना शाळेला पाठविले नाही. त्यामुळे शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या तुरळक होती.

लोकमान्य राममंदिरात विविध कार्यक्रम

लोकमान्य श्रीराम मंदिर येथे पहाटे काकड आरती करण्यात आली. त्यानंतर लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब यांनी सपत्निक अभिषेक आणि आरती केली. ह.भ.प. भैरू महाराज धामणेकर आणि सहकारी यांनी प्रभू रामचंद्रांचे कीर्तन सादरीकरण करून वातावरण राममय केले. त्यांना मयुर गोविंद हुंदरे यांनी मृदंगाची तर शंकर महाराज मेलगे यांनी वीणासाथ केली. यावेळी बेळगावसह येळ्ळूर, देसूर, धामणे, कोंडसकोप, नंदिहळ्ळी, शहापूर, वडगाव, खासबाग येथील वारकरी उपस्थित होते. 12.28 च्या मुहूर्तावर आरती आणि नैवेद्य करण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद झाला. महाप्रसादाचा लाभ पाच हजाराहून अधिक लोकांनी घेतला. या प्रसंगी लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगटी, संचालक गजानन धामणेकर, पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, सीईओ अभिजित दीक्षित, सीएसओ निवृत्त कर्नल दीपक गुरूंग, समन्वयक विनायक जाधव व लोकमान्य सोसायटीचे कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी फटाक्यांची आतषबाजी करून या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी ढोलताशा पथकाचे वादन झाले.

Advertisement
Tags :

.