जागतिक पोलिओ निर्मूलन दिनी आज रॅली
रोटरी क्लब मिडटाऊनतर्फे आयोजन
बेळगाव : माणूस हा सतत भ्रमंती करत राहणारा आहे. ही भ्रमंती त्याच्या पायांच्या हालचालींमुळे सोपी होते. परंतु, दुर्दैवाने पोलिओ झालेल्या व्यक्तींना अशी हालचाल करणे शक्य नसते. हे दिव्यांगत्व त्यांच्यासाठी त्रासदायक असते. अशा व्यक्तींना आणि त्यांच्या कुटुंबीयांनासुद्धा यामुळे सामाजिक, मानसिक, आर्थिक स्तरांवर वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच पोलिओग्रस्त मूल जन्माला येऊ नये यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ निर्मूलन मोहीम हाती घेतली. या मोहिमेचे स्वागत जगभरातून झाले. परंतु ही मोहीम यशस्वी झाली ती जागतिक आरोग्य संघटनेला लाभलेल्या रोटरी परिवाराच्या सहकार्यामुळे. डॉ. जोनास साल्क यांनी पोलिओ निर्मूलनासाठीची लस विकसित केली. त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 24 ऑक्टोबर रोजी जागतिक पोलिओ निर्मूलन दिनाचे आचरण केले जाते.
पोलिओ एका विशिष्ट विषाणूंमुळे होतो, ज्यामुळे व्यक्तीला हालचाल करणे अशक्य होते. हात आणि पायांमध्ये सुया टोचल्याच्या वेदना होतात. डोकेदुखी, उलटी, जडत्व, घसा दुखी, ताप अशी लक्षणे दिसून येतात. 1980 च्या दशकामध्ये एक लाख मुले या विषाणूमुळे संक्रमित झाली आणि जागतिक आरोग्य संघटनेने ही बाब गांभीर्याने घेतली. तेव्हापासून पोलिओ निर्मूलन मोहिमेला गती आली. 1985 साली रोटरी इंटरनॅशनलने पोलिओ प्लस ही ऐतिहासिक मोहीम सुरू केली. त्यावेळी जगातील 125 देशांमध्ये पोलिओचे लाखो रुग्ण होते. रोटरीने या मोहिमेत आजपर्यंत 2.1 अब्ज अमेरिकी डॉलरहून अधिक निधी दिला असून 20 लाखांहून अधिक रोटेरियन स्वयंसेवकांनी जगभरात लसीकरण व जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे.
या जागतिक उपक्रमाला जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ, सीडीसी, बिल व मेलिंडा गेट्स फाऊंडेशन यांचे सहकार्य लाभले आहे. रोटरीने उभारलेल्या निधीच्या दुप्पट रक्कम गेट्स फाऊंडेशन दरवर्षी या मोहिमेसाठी देते. रोटरीच्या अथक प्रयत्नांमुळे जगातील 99 टक्क्यांहून अधिक भाग पोलिओमुक्त झाला आहे. सध्या केवळ पाकिस्तान व अफगाणिस्तान या दोन देशांमध्येच पोलिओचे रुग्ण आढळत आहेत. भारताने 2014 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून पोलिओमुक्त देश ही मान्यता मिळविली, ज्यामध्ये रोटरी परिवार, आरोग्य विभाग व हजारो स्वयंसेवक यांचा सहभाग महत्त्वाचा ठरला. यावर्षीही रोटरी परिवाराने ‘एंड पोलिओ नाऊ’ या घोषवाक्याखाली रॅली, व्याख्यान, सामाजिक माध्यम आदींद्वारे जनजागृती सुरू ठेवली आहे. केवळ पोलिओ निर्मूलन हे रोटरीचे ध्येय नसून निरोगी समाज, शिक्षण आणि मानवतेची सेवा यावर भर आहे.
पोलिओ निर्मूलनार्थ आज रॅलीचे आयोजन
जागतिक पोलिओ निर्मूलन दिनाच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ बेळगाव मिडटाऊनतर्फे दि. 24 ऑक्टोबर रोजी सायं. 5 वा. पोलिओ निर्मूलनार्थ रॅलीचे आयोजन केले आहे. धर्मवीर संभाजी चौक येथून या रॅलीला सुरुवात होईल. माजी प्रांतपाल अविनाश पोतदार, आनंद सराफ, बबन देशपांडे व नियोजित प्रांतपाल अशोक नाईक यांच्या उपस्थितीत रॅलीला प्रारंभ होईल. या रॅलीची सांगता चन्नम्मा सर्कल येथे होईल. सर्व रोटरी सदस्यांनी रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष उदयसिंह रजपूत, सचिव नंदन बागी व इव्हेंट चेअरमन श्रीशैल मेटगुड यांनी केले आहे.