राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता जागृती मासनिमित्त रॅली
वाहतुकीचे नियम पाळून अपघात रोखण्यासाठी जागृती
बेळगाव : प्रादेशिक परिवहन खाते, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी राष्ट्रीय रस्ते सुरक्षितता जागृती मास साजरा करण्यात आला. या निमित्ताने धर्मवीर संभाजी चौक येथून जागृती रॅली काढण्यात आली. ‘सडक सुरक्षा, जीवन सुरक्षा’ या घोषवाक्याखाली ही जागृती मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये वाहतुकीचे नियम आणि अपघाताचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून जागृती केली जात आहे. अलीकडे रस्ते वाहतुकीत अपघाताचे प्रमाण वाढले आहे. ते रोखण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रमांतून जागृती केली जाणार आहे. बसस्थानक, शाळा आणि विविध रस्त्यांवर भित्तीपत्रक, पथनाट्या आणि विविध माध्यमांद्वारे जागृती केली जाणार आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे, रस्ते अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी करणे, बेजबाबदारपणे वाहने चालविणाऱ्यांना शिस्त लावणे, याबाबत जागृती होणार आहे.