सरकारी महाविद्यालयातील ‘ड’ वर्ग कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करा
कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी
बेळगाव : महाविद्यालयांमध्ये ड वर्ग कर्मचारी म्हणून आऊटसोर्सिंगद्वारे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करावी व त्यांना सेवा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीसाठी कर्नाटक राज्य उच्चशिक्षण विभाग सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालय आऊटसोर्सिंग डी ग्रुप एम्प्लॉईज असोसिएशनच्यावतीने गुरुवारी सुवर्ण विधानसौधसमोर आंदोलन करण्यात आले. सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये अकुशल कर्मचारी व महाविद्यालयीन विकास समिती कर्मचारी म्हणून प्रतिदिनी 300 रुपये पगारावर काम करत आहेत. सध्या आऊटसोर्सिंगद्वारे त्यांना वेतन दिले जात आहे.
2022 मध्ये 347 ड वर्ग कर्मचाऱ्यांपैकी 201 जणांना डाटा एंट्री ऑपरेटरपदी नियुक्ती देण्यात आली. उर्वरित कर्मचाऱ्यांना 2025 मध्ये कार्यालय साहाय्यक, प्रयोगशाळा साहाय्यक म्हणून नियुक्त करण्यात आले. महाविद्यालयीन शिक्षण विभागाच्या सरकारी प्रथमश्रेणी महाविद्यालयांमध्ये ड वर्ग कर्मचाऱ्यांवर अद्याप अन्याय झाला असून त्यांना सेवेत कायम करण्यासोबतच वेतनवाढ करण्याची मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांसाठी आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी, कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे रजेची सुविधा द्यावी, नवीन पदभरती करताना प्रथमत: सेवा बजावलेल्या आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांचा विचार करावा, अशी मागणी आली.