जंतर-मंतरवर केजरीवालांच्या समर्थनार्थ सभा
इंडिया आघाडीच्या नेत्यांची उपस्थिती
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी तिहार तुरुंगात कैद आहेत. याप्रकरणी सीबीआयने केजरीवालांच्या विरोधात आरोपपत्र देखील दाखल केले आहे. आता केजरीवालांच्या समर्थनार्थ इंडिया आघाडीच्या नेत्यांनी जंतर-मंतर येथे निदर्शने केली आहेत. काँग्रेसच्या वतीने प्रमोद तिवारी आणि गौरव गोगोई, द्रमुकचे ए. राजा, एआयएफबीचे जी. देवराजन, माकपचे दीपांकर भट्टाचार्य, भाकपचे डी. राजा, शिवसेनेचे (युबीटी) संजय राउत आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) प्रमुख शरद पवार यांनी निदर्शनस्थळी जात केजरीवालांना समर्थन दर्शविले आहे. याचबरोबर आम आदमी पक्षाच्या वतीने गोपाल राय, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि अरविंद केजरीवालांच्या पत्नी सुनीता यावेळी उपस्थित होत्या.
अरविंद केजरीवालांना तुरुंगात डांबण्यात आले आहे, उमर खालिद दीर्घकाळापासून तुरुंगात आहे. दिल्ली दंगलीच्या खोट्या आरोपात अनेक लोकांना तुरुंगात कैद करण्यात आले आहे. भीमा कोरेगाव प्रकरणी आमच्या एका आदिवासी नेत्याला तुरुंगात कोंडण्यात आले आणि तुरुंगातच त्यांचा मृत्यू झाला. विरोधातील आवाज दडपण्यासाठी जबरदस्तीने आमच्या लोकांना तुरुंगात डांबले जात आहे, परंतु यावेळच्या जनादेशाने हा प्रकार चालणार नसल्याचे सिद्ध केले आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये निवडणूक होणार आहे. या तिन्ही राज्यांमध्ये भाजपला धडा शिकवा असे आमचे आवाहन आहे. इंडिया आघाडीचा विजय हाच केजरीवालांवर होत असलेल्या अन्यायावरील प्रत्युत्तर असेल असे माकपचे नेते दीपांकर भट्टाचार्य यांनी म्हटले.
पापाचा घडा फुटणार
हुकुमशाही सरकारच्या विरोधात संघर्ष जारी राहणार आहे. हा नैतिक किंवा राजकीय समर्थन नव्हे तर संघर्ष आहे. आम्ही मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावतीने समर्थन देण्यासाठी आलो आहोत. काँग्रेसचा प्रत्येक शिपाई केजरीवालांसोबत आहे. प्रचंड बहुमताने जिंकून आलेल्या मुख्यमंत्र्याला बेकायदेशीर मार्गाने अटक करण्यात आली आहे. आम्ही या संघर्षात आम आदमी पक्षासोबत उभे आहोत. परंतु आता नरेंद्र मोदींच्या पापाचा घडा फुटणार आणि केजरीवाल तुरुंगातून बाहेर पडणार असल्याचा दावा काँग्रेस नेते प्रमोद तिवारी यांनी केला आहे.
5 वर्षे नाही चालणार सरकार
पोलीस, सीबीआयची भीती दाखविल्याने आम्ही गप्प बसू असा भाजपचा भ्रम असेल तर तो चुकीचा ठरेल. इंडिया आघाडीतील कुठलाही पक्ष भाजपला घाबरत नाही. 2024 मध्ये निष्पक्ष निवडणूक झाली असती तर भाजप विरोधी पक्षात असता आणि आमचे सरकार असते. परंतु भाजपचे घाबरलेले सरकार पाच वर्षे नाही चालणार, आम्हा सर्वांना निवडणुकीसाठी तयार रहावे लागणार असल्याचे काँग्रेस नेते गौरव गोगोई यांनी म्हटले आहे.