राकसकोप जलाशयाची पाणीपातळी स्थिर
खुल्या करण्यात आलेल्या दरवाजांतील विसर्गानंतर पाणीपातळी अर्धाफुटाने कमी
तुडये/वार्ताहर
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या राकसकोप जलाशय पाणलोट क्षेत्रात शनिवारी पावसाने थोडी उसंत दिल्याने पाण्याचा ओघ कमी झाला आहे. शुक्रवारी दिवसभरानंतर रात्रभर पावसाचा जोर कायम राहिल्याने शनिवारी सकाळी 124.5 मि.मी. पावसाची नोंद झाली तर 2476.70 फूट पाणीपातळी नोंद झाली. जलाशयाकडील दोन दरवाजे पावणेदोन फुटांनी, एक दरवाजा दीड फुटाने तर एक दरवाजा सहा इंचांनी शुक्रवारी सायंकाळी खुले करण्यात आल्याने प्रचंड पाण्याचा विसर्ग मार्कंडेय नदीत सुरू झाला. दिवसभर खुल्या करण्यात आलेल्या दरवाजांतील विसर्गानंतर सायंकाळी पाणीपातळी ही प्रथमच अर्धाफुटाने कमी होत 2476.20 फुटावर आली आहे. सायंकाळी 7 वाजल्यापासून पुन्हा पावसाने जोर दिल्याने पूरमय परिस्थिती राहणार आहे.
जलाशय ओव्हरफ्लो होणे झाले 2018 पासून बंद
जलाशयाची स्थापना 1962 साली झाली. त्यानंतर दरवर्षी जुलै ते ऑगस्ट महिन्यात हा जलाशय तुडुंब झाल्यानंतर ओव्हरफ्लोचे पाणी मार्कंडेय नदी पात्रातून सोडण्यात येते. 2018 नंतर वेस्टवेअरच्या सहा दरवाजांवर पाच फुटाने पत्रे बसविल्याने तीन वर्षांत 2475 फुटाची पाणीपातळी वाढण्यास मदत झाली. त्यामुळे पाणीपातळी 2480 फुटापर्यंत वाढली. त्यामुळे 56 वर्षांनंतर गेली सहा वर्षे जलाशय ओव्हरफ्लो होणे बंद झाले आहे. आता 2475 फुटाची पाणीपातळी स्थिर ठेवताना पाणीपुरवठा मंडळाला कसरतीचे बनले आहे. आता 2475 फुटाची पाणीपातळी स्थिर ठेवताना पाणीपुरवठा मंडळाला कसरतीचे बनले. 2480 फूट पाणीपातळी झाल्यास तुडये-मळवी, इमान बडस, बेळवट्टी, राकसकोप येथील शेतकऱ्यांच्या जलाशय काठावरील पिकांतून पाणी घुसते आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे.