प्रत्येक वर्षी पोपटाला राखी
प्राणी किंवा पक्षीप्रेमी लोकांचे जग आणि त्यांची मानसिकता सर्वसामान्यांपेक्षा भिन्न असते, असे अनेकदा दिसून आले आहे. आज शनिवारी ‘रक्षाबंधना’चा दिवस आहे. या दिवशी बहिणी भावांना रखी बांधतात. हिंदू समाजात या सणाचे मोठे महत्व आहे. बव्हंशी हिंदू घरांमध्ये हा सण प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. छत्तीसगड राज्यात सरगुजा जिल्ह्यात वास्तव्य असणारी ‘स्वपन’ नामक एक युवतीही हा सण साजरा करते. पण तिची तो साजरा करण्याची पद्धत अतिशय भिन्न आहे. तिचे रक्षाबंधन अन्य लोकांपेक्षा इतके वेगळे आहे, की अशी कल्पनाही आपण करु शकणार नाही. स्वपन हिला सख्खा भाऊ नाही. त्यामुळे तिला राखी बांधून हा सण साजरा करता येत नाही. पण तिने यावर एक उपाय शोधला आहे.
कोरोना उद्रेकाच्या काळात ती घरात असताना तिच्या घराजवळ एक पोपटाचे पिल्लू आले. ही युवती पक्षीप्रेमी असल्याने तिने या पिल्लाचा सांभाळ करायचा निर्णय घेतला. आता हे पिल्लू मोठे झाले असून या पोपटालाच ती आपला बंधू मानते आणि प्रत्येकवर्षी राखी पौर्णिमेला त्यालाच राखी बांधते. ही राखीही सामान्य असत नाही. ती सोन्याची असते. या युवतीने ही माहिती स्वत:च प्रसिद्ध केली आहे. या पोपटाचे नाव तिने ‘हीर’ असे ठेवले आहे. त्याच्यापूर्वी ती घरात पाळलेल्या एका सशाला राखी बांधत होती. माणसांवर भरवसा ठेवता येत नाही. भाऊ मानलेला माणूसही विश्वासघात करु शकतो. मात्र, मुके प्राणी आणि पक्षी निरागस असतात. ते विश्वासघात करुच शकत नाहीत. त्यांच्यावर विश्वास ठेवणे निर्धोक असते. माणसाकडून त्यांची अपेक्षा केवळ सुरक्षा अणि निरपेक्ष मायेचीच असते. त्यामुळे त्यांच्यावर विश्वास आहे, असे तिचे म्हणणे आहे.