राजवाडा परिसरात अतिक्रमण हटावचा हातोडा कधी ?
गोल बागेच्या समोरच खेळणीवाल्यामुळे वाहने दिसत नाहीत,
चांदणी चौकात टेम्पोतून भाजी विक्रेत्यांची स्पर्धा
सातारा
सातारा शहरात राजवाडा परिसरात अलिकडच्या काळात बकाल स्वरुप येवू लागले आहे. मंगळवार तळे रस्त्याकडून येताना पोलीस चौकीच्याचसमोर चॉंदणी चौकात भाजी विक्री करणारे टेम्पो उभे असतात. त्याचबरोबर गोलबागेच्या समोर सुद्धा काही खेळण्याची दुकाने ही रस्त्यातच पुढे पुढे सरकली आहेत. त्यामुळे अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता असून या परिसरात अतिक्रमण हटाव विभागाचा धाक राहिला नाही. या विभागाचा हातोडा कधी फिरणार असा सवाल उपस्थित होत आहे.
अलिकडे सातारा शहरात रस्त्यावर विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठी आहे. त्यामध्ये फुटपाथ सुद्धा कमी पडताना पहायला मिळते. जागेवरुन सुद्धा अनेक ठिकाणी वाद होतात. जसे मंडईत विक्रेत्यांचा जागेवरून वाद होतात. तसाच प्रकार फुटपाथवर आणि रस्त्यावर बसण्यावरुनही साताऱ्यात घडू लागले असले तरीही आता विक्रेत्यांनीही कितीही कारवाई केली तरी आम्ही पुन्हा तेथेच आपला व्यवसाय सुरु करणार असा पवित्रा घेतला गेल्याचे दिसते. त्याचाच प्रत्यय चांदणी चौकात राजवाडा एसटी स्टॅण्ड मधील पोलीस चौकीला लागूनच भाजीपाल्याचे टेम्पो सायंकाळी लागलेले दिसतात. त्यामुळे मंगळवार तळ्याकडून येणाऱ्या वाहनांना खालून आलेले वाहन दिसत नाही. अपघात होण्याची शक्यता असते. तसेच वरुन येणारी वाहने गोलबागेला वळसा मारुन शुक्रवार पेठ, गडकर आळीकडे जात असताना कोपऱ्यातली खेळण्याची दुकाने ही बाहेर रस्त्याच्या कडेची रस्त्यातच सरकल्याची दिसून येत आहेत. त्यामुळे तेथेही अपघात होण्याची भीती असून सातारा पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे, अशी मागणी सातारा शहरातील नागरिकांनी केली आहे.