राज्याचं मंत्रिमंडळ म्हणजे लुटारूंच टोळकं, शक्तीपीठवरुन Raju Shetty यांचा घणाघात
महापुराच्या दरीत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग कदापिही होऊ देणार नाही
कोल्हापूर : शक्तिपीठ महामार्गाला बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध आहे. महाराष्ट्राचे मंत्रिमंडळ म्हणजे महाराष्ट्राचे मालक नाहीत. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळ हे लुटारूंच टोळक झालं आहे. तीस हजार कोटींमध्ये तयार होणारा रस्ता 86 हजार कोटींमध्ये करून 50 हजार कोटींची लूट सरकारला करायची आहे. त्यामुळे आम्ही शेतकरी ते होऊ देणार नाही, असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केले.
शक्तीपीठी महामार्गावरुन त्यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले, ड्रोनच्या माध्यमातून सर्वे करण्याचा प्रयत्न केला तर गोफण कसी फिरवायची हे शेतकऱ्यांना माहिती आहे. त्याच गोफणीच्या दगडांनी सगळे ड्रोन पाडू असा इशाराही त्यांनी दिला. कोल्हापूर जिल्ह्याला महापुराच्या दरीत लोटणारा शक्तीपीठ महामार्ग कदापिही होऊ देणार नाही. शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या शक्तीपीठ महामार्गाला आम्ही विरोध करणार, असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजन क्षीरसागर म्हणाले, महाराष्ट्रातील शेतकरी या प्रकल्पाला मान्यता देणार नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी कवटाळून कवडीमोल भावाने हिसकवण्याचा प्रकल्प शेतकरी उधळून लावतील. महाराष्ट्राला कर्जात बुडवणारा आणि शेतकऱ्यांना उद्धवस्त करणारा प्रकल्प आहे. पर्यावरणाची नासधूस करणारा प्रकल्प आणि खाणीतील खनिजे बंधरांपर्यंत पोहोचवून कवडीमोल भावानं निर्यात करणारा हा प्रकल्प महाराष्ट्राची धुळधाण करेल.
त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी कदापि तो यशस्वी होऊ देणार नाही. पैशाचे आमिष दाखवून शेतकऱ्यांमध्ये फूट पाडण्याचं कारस्थान कराल तर याद राखा असा इशारा त्यांनी दिला. गोळीबार केलात तरी शेतकरी जमीन सोडणार नाहीत, जमीन आणि हक्क सोडणार नसल्याचे काल उस्मानाबाद येथील शेतकऱ्यांनीही स्पष्ट केलं आहे.