राजू शेट्टी-अजित दादांची सांगलीत सेटलमेंट!
दत्त इंडिया देणार गतवर्षीचे 100 आणि यंदा 3140!
सांगली प्रतिनिधी
स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात हातकणंगलेच्या जागेवरून जयंत पाटील यांच्या विरोधात सेटलमेंट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोल्हापूर प्रमाणे सांगलीत ऊसदराची कोंडी न सुटण्यास जयंत पाटील कारणीभूत आहेत हे दाखवून देण्यासाठी सांगलीच्या वसंतदादा कारखान्यात दत्त इंडिया या खाजगी व्यवस्थापनाशी मंगळवारी रात्री उशिरा यशस्वी तडजोड करून एफ आर पी च्या तीन हजार ४१ मध्ये शंभर रुपये वाढवून 3141 यंदाचे आणि गतवर्षीचे शंभर रुपये जादा देण्याचे ठरविण्यात आले आहे!
गेल्या वर्षीचे शंभर रुपये आणि यंदाची उचल एफ आर पी अधिक शंभर रुपये देण्यास सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी सोमवारी रात्री नकार दिल्याने स्वाभिमानीच्या पदाधिकाऱ्यांशी जिल्हाधिकारी यांच्या मदतीने सुरू असलेली चर्चा निषफळ ठरली होती. मात्र रात्री उशिरा दत्त इंडिया या खाजगी व्यवस्थापनाने ही कोंडी फोडली आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे कोल्हापूर पॅटर्न प्रमाणे मागणी मान्य करण्याचे पत्र दिले. त्यामुळे आता राजू शेट्टी यांचा मोर्चा दुसरे खाजगी कारखानदार दालमिया शुगर चालवत असलेल्या निनाईदेवी कारखान्याकडे वळला आहे. सांगली जिल्ह्यातील कारखानदारात फूट पाडण्यात राजू शेट्टी यांना यश आले असले तरी या यशामागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ताकद असल्याचे दिसून येत आहे.
दत्त इंडिया व्यवस्थापन हे मूळचे पुणे जिल्ह्यातील असून त्यामध्ये अजित दादा पवार यांच्या समर्थकांचा वर चष्मा असल्याची गेली काही वर्षे चर्चा आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत दिलीपराव पाटील हे अध्यक्ष असताना आणि राष्ट्रवादी एक संघ असताना जयंतरावांच्या संमतीनेच सांगलीचा वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना दत्त इंडियाकडे चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता. आता याच कारखान्याने ऊस दराची कोंडी फोडल्याने राजकीय वर्तुळाच्या नजरा रोखल्या गेल्या आहेत. गेले दोन दिवस राजू शेट्टी यांचा कारखान्याच्या दारात ठिय्या असताना पोलिसांच्या कडून हे आंदोलन अत्यंत शांतपणे हाताळले गेले. वादावादी घोषणाबाजी वगळता त्याला कुठेही गंभीर स्वरूप आले नाही त्यामुळे राजू शेट्टी दत्त इंडिया कारखान्याची तडजोड करून सांगली जिल्ह्यात ऊर्जाची कोंडी फोडणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत दत्त इंडिया कडून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवले जाईल असे सांगून वेळ केला जात होता. मात्र दिवस पालटण्यापूर्वी ते पत्र जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी जो पॅटर्न स्वीकारला आहे तोच सांगली जिल्ह्यात आपण स्वीकारत असल्याचे या व्यवस्थापनांने कळवले.
सांगली जिल्ह्यातील कारखानदारांवर जयंत पाटील यांचे वर्चस्व आहे आणि त्यांच्या दबावामुळेच ते दर देण्यास तयार नाहीत अशी राजू शेट्टी यांची भूमिका आहे. तर हातकणंगले लोकसभा निवडणुकीत जयंतरावंचे पुत्र प्रतीक पाटील आणि माजी खासदार राजू शेट्टी हे आमने सामने येण्याची शक्यता आहे. अजित दादा गटाने जयंतरावंना शह देण्यासाठी सांगली जिल्ह्यात हालचाली सुरू केल्या आहेत. जयंतरावंचे पूर्वीचे सहकारी फोडण्यात अजित पवार यांना यश आले आहे. सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी त्यासाठी त्यांनी स्वतःवर घेतली असून जयंत रावांवर शरद पवारांचा तंबू सोडण्यासाठी दबाव वाढवला आहे. नेमक्या याच काळात राजू शेट्टी यांच्या आंदोलन सुरू झाल्याने त्यांना दत्त इंडियात शंभर रुपये वाढवून देऊन अजित दादांकडून अप्रत्यक्षरीत्या ताकद देण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे एका खासगी कारखान्याने मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यातील इतर सहकारी कारखान्यांवर सुद्धा शंभर रुपये अधिकचे देण्याचा दबाव वाढू शकतो. इतर कारखान्यातील एका पदाधिकाऱ्याने नाव प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले की, खाजगी कारखान्यांना नफ्याचा रेशो ऊस दर नियंत्रण समितीने सहकारी कारखान्यांपेक्षा अधिक ठेवला असल्याने त्यांना अशी मागणी तातडीने मान्य करणे शक्य असते. सहकारी कारखान्यांना आपला नफा तोटा, कर्ज व्याज आणि विक्रीसह इतर बोजे यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळेच आता शेट्टी यांनी जिल्ह्यातील दुसरा खाजगी कारखाना दालमिया शुगरकडे आपले लक्ष वळवले असून आता जिल्ह्यात खरी चुरस निर्माण झाली असून त्याला सत्तेचे अप्रत्यक्ष पाठबळ लाभण्याची चिन्हे आहेत.