Karad Crime : कराड पोलिसांच्या फिल्डिंगमध्ये उघडकीस आले राजू खून प्रकरण
साताऱ्यात मित्राने केला मित्राचा घातपात
सातारा : माझ्या मित्रानेच माझा घात केला... आदित्य देसाईने मला भोसकले हे शब्द आहेत रक्तबंबाळ अवस्थेत मृत्यूकडे निघालेल्या सुदर्शन उर्फ राजू हणमंत चोरगेचे. बहिणीशी अखेरचे हे शब्द बोलून काही तासांतच त्याने कृष्णा हॉस्पिटलमध्ये प्राण सोडले. चोरगे याच्या बहिणीने कराड शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीत हा उल्लेख असून विशेष म्हणजे राजू चोरगे याच्यावर हल्लेखोर आदित्यने दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ऑगस्ट २०२५ मधेही कोयत्याने हल्ला केला होता. तपासात हे सोमवारी उघड झाले.
पोलिसांकडून मिळालेल्या व फिर्यादीने दिलेल्या जबाबानुसार, राजू चोरगे याचे कुटुंब मोठे असून त्याचा शनिवारी रात्री आदित्य पांडुरंग देसाई याने निघृण खून केला. याप्रकरणी शहर पोलिसात प्रियदर्शनी चोरगे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत तपासा सुरू केला आहे.
दोन महिन्यापूर्वीही दोघांच्यात वाद
शनिवारी रात्री बीअर बारमधे दारू पित बसल्यानंतर झालेल्या वादातून सुदर्शन चोरगे याचा निघृण खून झाला. वास्तविक ऑगस्ट २०२५ मध्ये राजू व आदित्य यांच्यात पैशाच्या व्यवहारावरून वाद झाला होता, असे बहीण प्रियदर्शनी चोरगे यांच्या फिर्यादीत म्हटले आहे. या वादात संतापलेल्या आदित्यने राजूच्या डोक्यावर कोयत्याने वार केला होता. यात राजू जखमी झाला होता. त्याच्यावर रूग्णालयात उपचार केले होते. शिवाय दोघेही मित्र असल्याने यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल झालेली नव्हती, असे सांगितले जाते. यानंतरही दोघे वारंवार भेटत असत.
शनिवारी रात्री नेमके काय घडले?
१ नोव्हेंबर २०२५ रोजी शनिवारी रात्री ११.३० वाजता मुंबईत असलेले राजूचे नातेवाईक जयेश यांना राजूच्या फोनवरून फोन आला. फोनवरून राजू नव्हे तर त्याचा मित्र अक्षय सहजराव बोलत होता. त्याने जयेश यांना सांगितले की, आदित्य आणि राजूची भांडणे होऊन त्यात तो जखमी झाला आहे. त्याला आम्ही कृष्णा रूग्णालयात उपचारासाठी आणले आहे. जयेश यांनी हे ऐकताच फिर्यादी यांना हॉस्पिटलकडे जाण्यास सांगितले. आदित्य याने पूर्वीचा राग मनात धरून राजूवर गंभीर वार केल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. राजूच्या नातेवाईकांनी संशयित अदित्य याला फोन केल्यावर त्याने आपणच वार केले असून तुम्हाला काय करायचे ते करा, अशी धमकी दिली.
पाच ठिकाणी खोलवर वार झाल्याने मृत्यू
आदित्य याने राजूच्या पोटावर, छातीवर, बरगडीवर ५ ठिकाणी भोसकले होते. फिर्यादी प्रियदर्शनी या राजूला भेटल्यावर त्याने माझ्या मित्रानेच माझा घात केला, हे शेवटचे शब्द बोलला. राजूवर उपचार सुरू होते.
पहाटेच पोलिसांनी लावली फिल्डींग
गंभीर जखमी राजू चोरगे याच्यावर वार करून संशयित हल्लेखोर हा परराज्यात पसार होण्याच्या प्रयत्नात होता. उपअधीक्षक राजश्री पाटील या पहाटेच कृष्णा रूग्णालयासह घटनास्थळावर दाखल झाल्या. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशिलदार यांच्यासह मृत राजूच्या मित्रांकडे कसून विचारपूस केली.
यामधे हा सगळा थरार उघडकीस आला. हा थरार ऐकून पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केले. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अशोक भापकर, सज्जन जगताप, संग्राम पाटील, धीरज कोरडे, दिग्विजय सांडगे, मुकेश मोरे, आनंदा जाधव यांच्यासह कर्मचारी रवाना झाले. पोलिसांची वेगवेगळी पथके चार ठिकाणी दबा दारून बसली होती. पोलिसांनी लावलेल्या फिल्डिंगमुळे पहाटेच संशयिताला बेड्या ठोकण्यात यश आले.