रायगडावर रविवारी साजरी होणार राजमाता जिजाऊ जयंती
कोल्हापूर :
अखिल भारतीय मराठा महासंघ व मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्यावतीने यंदा राजमाता जिजाऊ यांची रविवारी दि.12 जानेवारी रोजी होणारी जयंती ऐतिहासिक अशा रायगड किल्ल्यावर साजरी केली जाणार आहे. मराठा महासंघाच्या जिल्ह्यातील 100 हून अधिक महिलासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यासाठी रायगडावर जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मुळीक म्हणाले, शहाजीराजे भोसले आणि राजमाता जिजाऊ यांनी रयतेच्या स्वतंत्र सार्वभौम स्वराज्याची संकल्पना मांडली. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संकल्पनेला मूर्त रूप दिले. 6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड येथे राज्याभिषेक झाला. अशी ही हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड येथे जिजाऊंच्या मार्गदर्शनाखाली शिवछत्रपतींनी रायगडावरून स्वराज्याचा कारभार चालवत चौफेर विस्तार केला.
शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या पाचाड येथील त्यांच्या वाड्यातच अखेरचा श्वास घेतला. येथून काही अंतरावरच जिजाऊंचे समाधीस्थळ असून आजही सर्वांना हे प्रेरणादायी आहे. जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाची माहिती विशेषत: महिलांना व्हावी, या उद्देशाने रायगड येथे यंदा प्रथमच राजमाता जिजाऊ यांची जयंती थाटामाटात साजारी करण्याचा नियोजन केले आहे. यासाठी शनिवार दि. 11 रोजी सकाळी मराठा महासंघाच्या महिलांसह शेकडो कार्यकर्ते रायगडकडे जाण्यासाठी रवाना होणार असून प्रथम वाई मार्गे प्रतापगड येथे जाणार आहे. येथील ऐतिहासिक माहिती सर्वांना दिली जाणार आहे. याप्रसंगी जिजाऊंची महती सांगणारा स्त्राsत ‘शिवरायांची किर्ती सांगे! आईचं माझा गुरु!‘ हा मंत्र घरा-घरांमध्ये पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील रहाणार आहे.
रायगडावरील राजमाता जिजाऊ जयंती उत्सव हा दौरा न होता अभ्यास दौरा व्हावा यासाठी विशेष नियोजन आखणी केली आहे.दरम्यान, राजमाता जिजाऊ जयंती उत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली असल्याचेही वसंतराव मुळीक यांनी यावेळी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला मराठा महासंघाचे शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, मनोज नरके, राजू परांडेकर, किशोर डवंग, प्रकाश जाधव, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील आदी उपस्थित होते.
- म्हणून रायगडावर जयंतीचे आयोजन
दरवर्षी जिजाऊ जयंती कोल्हापुरात उत्साहात साजरी केली जाते. यंदा प्रथमच रायगडवर साजरी करण्याचे नियोजन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा रायगडावर झालेला राज्याभिषेक जिजाऊंच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण ठरला होता. जिजाऊंच्या प्रेरणेमुळेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची निर्मिती केली. हे मराठा समाजातील महिलांना भावले जाणारे असल्याने यंदाची जिजाऊंची जयंती रायगडावर करण्याचे ठरल्याची माहिती मराठा महासंघाच्या महिला अध्यक्ष शैलजा भोसले यांनी दिली.
- रायगड रविवारी भगवामय होणार
मराठा महासंघाकडून प्रथमच रायगडावर जिजाऊ जयंती दिमाखदार पद्धतीने साजरी करणार आहे. 100 हून अधिक महिला भगवी साडी किंवा ड्रेस परिधान करूनच गडावर जाणार आहे. त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे शेकडो पदाधिकारी, कार्यकर्तेही भगवे ध्वज, भगवी टोपी घालून उपस्थित असणार आहेत. त्यामुळे रविवारी रायगड भगवामय झाला आहे.