रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार
संघव्यवस्थापनाकडून घोषणा : विराटकडून अभिनंदनाचा मेसेज
वृत्तसंस्था/बेंगळूर
आयपीएलच्या 18 व्या मोसमासाठी रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघाने नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे. आरसीबीने कर्णधारपदाची जबाबदारी स्टार खेळाडू रजत पाटीदारकडे सोपवली आहे. आरसीबीला आतापर्यंत एकदाही विजेतेपदावर नाव कोरता आलेले नाही. यंदा रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा संघ जेतेपद मिळवतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. रजत पाटीदार हा 2021 पासून आरसीबीसोबत असून त्याने आपल्या कामगिरीच्या जोरावर टीममधील स्थान भक्कम केले आहे. आयपीएल 2025 च्या लिलावाआधी त्याला आरसीबीने रिटेन करण्यासाठी 11 कोटी मोजले होते. रजत हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतो. आता झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी 20 क्रिकेट स्पर्धेमध्ये रजत पाटीदारच्या नेतृत्त्वात फायनल गाठली होती. शांत स्वभावाच्या पाटीदारकडे आता आरसीबीसारख्या मोठ्या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
रजत बदलणार आरसीबीचे नशीब?
आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून ते 17 व्या हंगामापर्यंत संघात अनेक मॅचविनर्स आणि स्टार खेळाडू असूनही आरसीबीला एकदाही विजेतेपद जिंकता आलेले नाही. आरसीबी संघ आतापर्यंत फक्त 3 वेळा अंतिम फेरीत पोहोचला आहे, ज्यामध्ये त्यांना सर्व वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे संघाच्या नेतृत्वातही बदल दिसून आले आहेत. गेल्या तीन हंगामात फाफ डू प्लेसिस आरसीबीचे कर्णधारपद सांभाळत होता, त्याला मेगा लिलावापूर्वी संघाने कायम ठेवले नव्हते आणि त्यानंतर तो आयपीएल 2025 साठी आरसीबी संघाचा भाग नाही. संघ व्यवस्थापनाने रजत पाटीदारवर विश्वास टाकताना त्याच्याकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. आता, रजतच्या नेतृत्वात आरसीबीचा संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मी आणि संघातील इतर सदस्य रजत, तुझ्या मागे आहोत. या फ्रँचायझीमध्ये तू ज्या पद्धतीने वाढला आहेस आणि ज्या पद्धतीने तू कामगिरी केली आहेस, त्यामुळे तू सर्व आरसीबी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहेस. माझ्यासह इतर सदस्य तुझ्या पाठीशी आहेत. या नव्या भूमिकेसाठी तुला सर्व खेळाडूंचा पाठिंबा असेल.
विराट कोहली, दिग्गज क्रिकेटपटू.
मी आणि संघातील इतर सदस्य रजत, तुझ्या मागे आहोत. या फ्रँचायझीमध्ये तू ज्या पद्धतीने वाढला आहेस आणि ज्या पद्धतीने तू कामगिरी केली आहेस, त्यामुळे तू सर्व आरसीबी चाहत्यांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहेस. माझ्यासह इतर सदस्य तुझ्या पाठीशी आहेत. या नव्या भूमिकेसाठी तुला सर्व खेळाडूंचा पाठिंबा असेल.