For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानचा विजयी चौकार

06:10 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानचा विजयी चौकार
Advertisement

होमग्राऊंडवर राजस्थान सहा गड्यांनी विजयी : सामनावीर जोस बटलरची धमाकेदार शतकी खेळी : विराटच्या शतकानंतरही आरसीबी पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था /जयपूर

येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर शनिवारी झालेल्या सामन्यात जोस बटलरचे धमाकेदार शतक व संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने रॉयल चँलेजर्स बेंगळूरवर सहा गडी राखून विजय मिळवला. प्रारंभी, विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावर आरसीबीने 184 धावा केल्या. यानंतर राजस्थानने विजयी लक्ष्य 19.1 षटकात चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. राजस्थानचा हा सलग चौथा विजय असून गुणतालिकेतील अव्वलस्थान त्यांनी आणखी मजबूत केले आहे. आरसीबी मात्र आठव्या स्थानावर आहे. आरसीबीने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आव्हान गाठताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैस्वालला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर राजस्थानचा डाव कॅप्टन संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी सावरला. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 147 धावांची भागीदारी करत विजयाचा पाया रचला. सॅमसनने 42 चेंडूत 8 चौकार व 2 षटकारासह 69 धावा केल्या. त्याला सिराजने बाद केले. सॅमसन बाद झाल्यानंतर रियान पराग व ध्रुव जुरेल स्वस्तात बाद झाले. दुसरीकडे, बटलरने मात्र 4 सिक्स आणि 9 चौकारांच्या जोरावर 58 बॉलमध्ये 100 धावा करत महेंद्रसिंह धोनी स्टाइलने सिक्स मारुन राजस्थानला विजय मिळवून दिला. बटलरचे हे आयपीएलमधील सहावे शतक ठरले.  हेतमेयर 11 धावांवर नाबाद राहिला. राजस्थानने विजयी आव्हान 19.1 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात पार केले.

Advertisement

विराट कोहलीचे शतक व्यर्थ

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून आरसीबीला प्रथम फलंदाजी दिली. कर्णधार डु प्लेसिस आणि कोहली यांनी संघाच्या डावाला दमदार आणि भक्कम सुरुवात करून देताना 14 षटकात 125 धावांची शतकी भागीदारी केली. आरसीबीने शेवटच्या 6 षटकात 58 धावांची भर घालताना दोन गडी गमविले. कोहली आणि डु प्लेसिस यांनी पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 53 धावा झोडपल्या. आरसीबीचे अर्धशतक 32 चेंडूत, तर विराट कोहलीचे अर्धशतक 39 चेंडूत 3 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने फलकावर लागले. या जोडीने शतकी भागीदारी 68 चेंडूत नोंदवली. डावातील 14 व्या षटकात चहलने डु प्लेसिसला बटलरकरवी झेलबाद केले. त्याने 33 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 44 धावा जमवल्या. आरसीबी संघातील आक्रमक फलंदाज मॅक्सवेल पुन्हा एकदा अपयशी ठरला. बर्गरने त्याचा केवळ एका धावेवर त्रिफळा उडवला. सौरभ चौहानने 6 चेंडूत 1 षटकारासह 9 धावा जमवल्या. चहलने त्याला जैस्वालकरवी झेलबाद केले. कोहलीने आपले शतक 67 चेंडूत 4 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकवले. आरसीबीचे दीडशतक 102 चेंडूत फलकावर लागले. राजस्थानच्या गोलंदाजांनी शेवटच्या तीन षटकामध्ये आरसीबीला फटकेबाजीपासून बरेच रोखण्यात यश मिळवले. ग्रीन 5 धावावर नाबाद राहिला.

विराटचे आयपीएलमधील आठवे शतक

विराट कोहलीने राजस्थानविरुद्ध आपला उत्कृष्ट फॉर्म सुरू ठेवला आणि आयपीएलच्या चालू हंगामातील पहिले शतक झळकावले. या हंगामात शतक झळकावणारा कोहली पहिला खेळाडू ठरला आहे. विशेष म्हणजे, कोहलीचे आयपीएल कारकिर्दीतील हे आठवे शतक आहे. कोहलीने 67 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. तो या लीगच्या इतिहासात सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज आहे.

आयपीएलमध्ये 7500 धावा करणारा विराट पहिला खेळाडू

आयपीएलच्या या हंगामात विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. आता त्याच्या नावावर आणखी एक ऐतिहासिक विक्रम जमा झाला आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात   विराटने 34 धावा करताच आयपीएलमध्ये 7500 हजार धावाचा टप्पा गाठणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विराटनंतर या यादीत शिखर धवन व डेव्हिड वॉर्नर यांचा नंबर लागतो.

संक्षिप्त धावफलक

आरसीबी 20 षटकात 3 बाद 183 (कोहली नाबाद 113, डु प्लेसिस 44, मॅक्सवेल 1, चौहान 9, ग्रीन नाबाद 5, अवांतर 11, चहल 2-34, बर्गर 1-33). राजस्थान रॉयल्स 19.1 षटकांत 4 बाद 189 (जोस बटलर नाबाद 100, संजू सॅमसन 69, रियान पराग 4, हेतमेयर नाबाद 11, टोप्ली 2 बळी, यश दयाल व सिराज प्रत्येकी एक बळी).

Advertisement
Tags :

.