For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विजयासह राजस्थानचे अव्वल स्थान अधिक भक्कम

06:58 AM Apr 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
विजयासह राजस्थानचे अव्वल स्थान अधिक भक्कम
Advertisement

लखनौचा सात गड्यांनी पराभव, कर्णधार सॅमसन, ज्युरेल यांची नाबाद अर्धशतके

Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

कर्णधार आणि ‘सामनावीर’ संजू सॅमसन आणि ध्रुव ज्युरेल यांच्या नाबाद अर्धशतकांच्या त्याचप्रमाणे अभेद्य शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघाने अग्रस्थानावरील आपली पकड अधिक मजबूत करताना लखनौ सुपरजायंट्सचा 6 चेंडू बाकी ठेवून 7 गड्यांनी दणदणीत पराभव केला. या विजयामुळे राजस्थान रॉयल्सने स्पर्धेच्या गुणतक्त्यात 9 सामन्यातून 16 गुणासह अग्रस्थान भक्कम केले आहे.

Advertisement

कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडा यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर शनिवारी येथे खेळविण्यात आलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 197 धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरादाखल खेळताना राजस्थान रॉयल्सने 19 षटकात 3 बाद 199 धावा जमवित हा सामना सात गड्यांनी जिंकला. या स्पर्धेतील शनिवारचा हा 44 वा सामना आहे.

जैस्वाल आणि बटलर या सलामीच्या जोडीने राजस्थानच्या डावाला सावध पण भक्कम सुरुवात करून देताना 35 चेंडूत 60 धावांची भागीदारी केली. यश ठाकुरने बटलरचा त्रिफळा उडविला. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 34 धावा जमविल्या. त्यानंतर राजस्थानला स्टोईनिसने आणखी एक धक्का दिला. स्टोईनिसच्या गोलंदाजीवर सलामीचा जैस्वाल बिश्नोईकरवी झेलबाद झाला. त्याने 18 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 24 धावा जमवल्या. अमित मिश्राने रियान परागला बदोनीकरवी झेलबाद केले. त्याने 11 चेंडूत 1 षटकारासह 14 धावा जमवल्या. राजस्थानची यावेळी स्थिती 8.4 षटकात 3 बाद 78 अशी होती.

कर्णधार सॅमसन आणि ध्रुव ज्युरेल यांनी दमदार फलंदाजी करत चौथ्या गड्यासाठी अभेद्य 121 धावांची शतकी भागीदारी नोंदवली. या जोडीने राजस्थानला एक षटक बाकी ठेवून विजय मिळवून दिला. सॅमसनने 33 चेंडूत 4 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 71 तर ज्युरेलने 34 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारासह नाबाद 52 धावा झळकवल्या. राजस्थानला केवळ अवांतर 4 धावा मिळाल्या. राजस्थानने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 60 धावा जमवताना एक गडी गमवला. राजस्थानचे अर्धशतक 30 चेंडूत तर शतक 70 चेंडूत आणि दीडशतक 93 चेंडूत फलकावर लागले. सॅमसनने 28 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारांसह तर ज्युरेलने 31 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकवले. या जोडीने शतकी भागीदारी 53 चेंडूत नोंदवली. राजस्थानच्या डावात 8 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. लखनौतर्फे यश ठाकुर, स्टोईनिस आणि अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यामध्ये राजस्थान संघातर्फे चहलच्या जागी रियान परागला तर लखनौतर्फे डिकॉकच्या जागी अमित मिश्राला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानात उतरविले.

या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून लखनौला प्रथम फलंदाजी दिली. त्यांच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. सलामीचा डिकॉक बोल्टच्या पहिल्याच षटकातील तिसऱ्याच चेंडूवर त्रिफळाचित झाला. त्याने 3 चेंडूत 2 चौकारासह 8 धावा जमविल्या. त्यानंतर संदीप शर्माने स्टोईनिसला खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचित केले. यानंतर कर्णधार केएल राहुल आणि दीपक हुडा यांनी संघाची बाजू सावरताना तिसऱ्या गड्यासाठी 10.1 षटकात 115 धावांची शतकी भागीदारी केली. लखनौची ही जोडी राजस्थानच्या अश्विनने फोडली. अश्विनच्या गोलंदाजीवर हुडा पॉवेलकरवी झेलबाद झाला. त्याने 31 चेंडूत 7 चौकारासह 50 धावा जमवल्या. संदीप शर्माने लखनौला आणखी एक धक्का देताना पुरनला बोल्टकरवी झेलबाद केले. त्याने 1 चौकारासह 11 धावा जमवल्या. डावातील 18 व्या षटकात कर्णधार राहुल आवेश खानच्या गोलंदाजीवर उत्तुंग फटका मारण्याच्या नादात बोल्टकडून झेल देऊन तंबूत परतला. त्याने 48 चेंडूत 2 षटकार आणि 8 चौकारांसह 76 धावा झळकवल्या. बडोनी 13 चेंडूत 1 चौकारासह 18 धावावर तर कृणाल पांड्या 11 चेंडूत 1 चौकारासह 15 धावावर नाबाद राहिले. लखनौला 18 अवांतर धावा मिळाल्या.

लखनौच्या डावामध्ये 2 षटकार आणि 20 चौकार नोंदवले गेले. लखनौने पॉवर प्ले दरम्यानच्या 6 षटकात 46 धावा जमवताना 2 गडी गमवले. राहुल आणि हुडा यांनी अर्धशतकी भागीदारी 34 चेंडूत तर शतकी भागीदारी 54 चेंडूत नोंदवली. राहुलने 31 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह अर्धशतक झळकवले तर हुडाने 30 चेंडूत 7 चौकारासह अर्धशतक पूर्ण केले. लखनौचे दीडशतक 91 चेंडूत फलकावर लागले. राजस्थानतर्फे संदीप शर्माने 31 धावात 2 तर आवेश खान, रविचंद्रन अश्विन आणि बोल्ट यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : लखनौ 20 षटकात 5 बाद 196 (राहुल 76, हुडा 50, पुरन 11, बदोनी नाबाद 18, कृणाल पांड्या नाबाद 15, डिकॉक 8, अवांतर 18, संदीप शर्मा 2-31, बोल्ट, आवेश खान, आर. अश्विन प्रत्येकी एक बळी).

राजस्थान रॉयल्स 19 षटकात 3 बाद 199 (यशस्वी जैस्वाल 24, जोस बटलर 34, रियान पराग 14, संजू सॅमसन नाबाद 71, ध्रुव ज्युरेल नाबाद 52, अवांतर 4, यश ठाकुर, स्टोईनिस आणि अमित मिश्रा प्रत्येकी एक बळी.)

Advertisement
Tags :

.