राजस्थानचा मुंबईवर दणदणीत विजय
सामनावीर संदीप शर्माचे 5 बळी तर यशस्वी जैस्वालचे नाबाद शतक : गुणतालिकेत अव्वलस्थान कायम
वृत्तसंस्था/ जयपूर
येथील सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने आपला विजयी धडाका कायम ठेवताना मुंबई इंडियन्सचा 9 गडी राखून पराभव केला. तिलक वर्मा व नेहाल वढेरा यांच्या शानदार खेळीच्या जोरावर मुंबईने 20 षटकांत 9 बाद 179 धावा केल्या. यानंतर राजस्थानने 18.4 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात विजयी लक्ष्य पूर्ण केले. यशस्वीने 60 चेंडूत 7 षटकार आणि 9 चौकारांसह 104 धावांची नाबाद खेळी केली. तर गोलंदाजी करताना संदीप शर्माने 4 षटकांत 15 धावा देत 5 विकेट्स घेतले आणि संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावली. राजस्थानचा हा 8 सामन्यांतील 7 वा विजय आहे. तर मुंबईचा 9 सामन्यांतील 5 वा पराभव आहे. विजयासह राजस्थानने अव्वल क्रमांकावरील स्थान आणखी भक्कम केले आहे. तर मुंबई सातव्या क्रमांकावर आहे.
जैस्वालचा शतकी धमाका
मुंबईने विजयासाठी दिलेल्या 190 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलर आणि यशस्वीने शानदार सुरूवात केली. पॉवर प्लेपर्यंत या दोघांनी मिळून 61 धावा केल्या. यानंतर अचानक जयपूरमध्ये पावसाला सुरूवात झाली. पुन्हा सामना सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच षटकात पियुष चावलाने बटलरला क्लीन बोल्ड केले. बाद होण्यापूर्वी बटलरने 25 चेंडूत 6 चौकार लगावत 35 धावा केल्या. यानंतर यंदा आयपीएलमध्ये सुरूवातीलाच बाद होणारा यशस्वी या सामन्यात चांगलाच फॉर्मात दिसला. यशस्वीने अवघ्या 31 चेंडूत आपले अर्धशतक झळकावले. यानंतर यशस्वीने सुरेख खेळी साकारताना 60 चेंडूत 9 चौकार व 7 षटकारासह 104 धावा फटकावल्या. जैस्वालचे यंदाच्या हंगामातील पहिलेच शतक आहे. त्याला सॅमसनने 28 चेंडूत नाबाद 38 धावा करत चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 109 धावांची भागीदारी साकारली व संघाला 18.4 षटकांतच विजय मिळवून दिला.
तिलक वर्मा, वढेराची खेळी व्यर्थ
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण हा निर्णय संघाच्या पथ्यावर पडला नाही, कारण मुंबईला सुरूवातीलाच लागोपाठ तीन मोठे धक्के मिळाले. सलामीवीर रोहित शर्मा काही कमाल करू शकला नाही. तो 5 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टनं त्याची विकेट घेतली. ईशान किशनला भोपळाही फोडता आला नाही. सूर्यकुमार यादव 8 चेंडूत 10 धावा करून बाद झाला. यानंतर मुंबईच्या दोन युवा फलंदाजांनी डाव सावरत महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. तिलक वर्मा आणि नेहाल वधेराने 99 धावांची शानदार भागीदारी रचली. तिलक वर्माने 45 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारासह 65 धावा केल्या. तर नेहलने 24 चेंडूत 4 षटकार आणि 3 चौकारांसह 49 धावा केल्या. ही जोडी बाद झाल्यानंतर हार्दिक पंड्या, टीम डेव्हिड, कोएत्झी झटपट बाद झाल्याने मुंबईला 9 बाद 179 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स 20 षटकांत 9 बाद 179 (रोहित शर्मा 6, सुर्यकुमार यादव 10, तिलक वर्मा 65, मोहम्मद नबी 23, वढेरा 49, हार्दिक पंड्या 10, संदीप शर्मा 18 धावांत 5 बळी, ट्रेंट बोल्ट 2 तर आवेश खान, चहल एक बळी).
राजस्थान रॉयल्स 18.4 षटकांत 1 बाद 183 (यशस्वी जैस्वाल 60 चेंडूत 9 चौकार व 7 षटकारासह नाबाद 104, बटलर 35, संजू सॅमसन नाबाद 38, पियुष चावला एक बळी).
आयपीएलमध्ये 200 बळी घेणारा चहल पहिला गोलंदाज
फिरकीपटू युजवेंद्र चहलने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. चहल आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असून आता त्याने मुंबईविरुद्ध लढतीत बळींचं द्विशतक पूर्ण केले. चहलने आयपीएलच्या अवघ्या 153 सामन्यांमध्ये ही कामगिरी केली आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत ड्वेन ब्राव्होचं दुसऱ्या क्रमांकावर आहे. ब्राव्होने 161 सामन्यात 183 बळी घेतले आहेत. या लिस्टमध्ये तिसऱ्या क्रमांकावर पीयूष चावला आहे, त्याने 186 सामन्यांमध्ये 181 विकेट घेतल्या आहेत.