महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थान : परंपरा मोडणार की राखणार ?

05:21 AM Nov 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात तीव्र चुरस, आश्वासनांचा वर्षाव हा आशय ‘विश्लेषण’ या सदरात घ्यावा

Advertisement

राजस्थान विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. 3 डिसेंबरला मतगणना होऊन पुढचे सरकार कोणाचे असेल याचे उत्तरही मिळणार आहे. मतदान 75 टक्क्यांपेक्षा अधिक झाले असल्याने मतदारांचा उत्साह मोठा होता, हे देखील दिसून आले आहे. राजस्थान या राज्याची एक विशिष्ट परंपरा गेल्या 30 वर्षांपासून आहे. ती अशी की, येथे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच स्पर्धा असते. तिसऱ्या कोणत्याही राष्ट्रीय किंवा स्थानिक पक्षाला नाव घेण्यासारखे स्थान नसते. तसेच या दोन पक्षांपैकी एकालाही येथे सलग दोन निवडणुकांमध्ये सत्ता स्थापन करता आलेली नाही. त्यामुळे यावेळी हे राज्य ही पंरपरा मोडणार की राखणार यासंबंधी मोठी उत्सुकता आहे....

Advertisement

राजस्थान विधानसभेच्या 200 जागा आहेत. त्यांच्यापैकी एका जागेवरील काँग्रेस उमेदवाराचे निधन झाल्याने तेथील निवडणूक लांबणीवर पडली आहे. परिणामी 199 जागांवर मतदान शनिवारी पार पडले. बहुमतासाठी 100 जागांची आवश्यकता असून नेहमीप्रमाणे भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यातच चुरस आहे. बहुजन समाज पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच काही प्रादेशिक पक्षही काही मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवित आहेत. तथापि, त्यांचा प्रभाव या दोन प्रमुख पक्षांइतका नाही. गेल्या निवडणुकीत मात्र, बहुजन समाज पक्षाने 6 जागा जिंकून चांगली कामगिरी केली होती. पण हे सर्व आमदार नंतर काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेसचे सरकार अधिक भक्कम झाले होते. यंदा बसपचाही फारसा प्रभाव जाणवत नाही.

आलटून पालटून सत्ता

राजस्थानच्या मतदाराने 1993 पासून भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांना प्रत्येक विधानसभा निवडणुकीत आलटून पालटून सत्ता दिली आहे. 1993 मध्ये भारतीय जनता पक्षाला कौल मिळाला होता. तेव्हा ज्येष्ठ नेते भैरवसिंग शेखावत मुख्यमंत्री झाले होते. भाजपला 200 पैकी 95 तर काँग्रेसला 76 जागा मिळाल्या होत्या. भाजपने काही अपक्षांच्या साहाय्याने सरकार स्थापना केली होती.

काँग्रेसचे घवघवीत यश

1998 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने घवघवीत यश मिळविले होते. त्या पक्षाला 200 पैकी 153 जागा मिळाल्या होत्या आणि भाजपला केवळ 33 जागांवर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर काँग्रेस नेते अशोक गेहलोत प्रथम राज्याचे मुख्यमंत्री झाले होते. काँग्रेसने मिळविलेल्या त्या सर्वाधिक जागा होत्या.

पुन्हा भाजपची सरशी

2003 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने काँग्रेसला 200 पैकी 120 जागा मिळवून पराभूत केले. काँग्रेसला केवळ 56 जागा मिळाल्या. त्या निवडणुकीत अपक्ष आणि इतरांनी एकंदर 24 जागा कमावून चांगली कामगिरी केली होती. भारतीय जनता पक्षाच्या नेत्या वसुंधरा राजे शिंदे या मुख्यमंत्री झाल्या होत्या.

काँग्रेसला पुन्हा यश

2008 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पारडे फिरले. काँग्रेसला सर्वाधिक 96 जागा मिळाल्या. तर भाजपला 78 जागा कमावता आल्या. प्रथमच राज्यात बहुजन समाज पक्षाने 6 जागा मिळवून मोठी कामगिरी केली. काँग्रेसला हा पक्ष आणि काही अपक्षांनी साहाय्य केल्याने सरकार स्थापना आले होते.

भाजपचे विक्रमी यश

पुढच्या 2013 च्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने विक्रमी 163 जागांची प्राप्ती केली होती. या राजस्थानात आजवर कोणत्याही पक्षाने मिळविलेल्या सर्वाधिक जागा होत्या. त्यामुळे हा विक्रमी विजय म्हटला जातो. काँग्रेसला केवळ 21 जागा मिळाल्या होत्या. वसुंधरा राजे पुन्हा मुख्यमंत्री झाल्या होत्या.

काँग्रेसची सत्तावापसी

2018 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा बाजी मारली. त्या पक्षाला 200 पैकी 100 जागांवर विजय मिळाला. तर भाजपच्या पारड्यात 76 जागा पडल्या. बहुजन समाज पक्षाने सहा जागा मिळवून बऱ्यापैकी कामगिरी केली. या पक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे अशोक गेहलोत मुख्यमंत्री झाले.

सहा पैकी 3-3

अशा प्रकारे गेल्या तीन वर्षांमध्ये भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांना आलटून पालटून प्रत्येकी तीन वेळा सत्ता मिळाली आहे. या परंपरेचा विचार करता आता सत्तेवर येण्याची संधी भाजपला आहे. मात्र काँग्रेसने मतदारांना परंपरा मोडण्याचे आवाहन केले आहे. तर भाजपने आपल्याला मोठे यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. काय होणार, ते पुढच्या रविवारीच समजणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article