For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौला नमवून राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी

06:55 AM Mar 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौला नमवून राजस्थान रॉयल्सची विजयी सलामी
Advertisement

सामनावीर संजू सॅमसनचे नाबाद अर्धशतक, राहुल, पुरन यांची अर्धशतके वाया

Advertisement

वृत्तसंस्था/ जयपूर

2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील येथे रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात सामनावीर कर्णधार संजू सॅमसनच्या नाबाद 82 धावांच्या खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने लखनौ सुपरजायंट्सचा 20 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. मात्र या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सचा कर्णधार के. एल. राहुल आणि निकोलास पुरन यांची अर्धशतके वाया गेली. या स्पर्धेतील हा चौथा सामना होता.

Advertisement

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानने 20 षटकात 4 बाद 193 धावा जमवल्या. त्यानंतर लखनौ सुपरजायंट्सने 20 षटकात 6 बाद 173 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 20 धावांनी गमवावा लागला.

राजस्थानच्या डावामध्ये कर्णधार संजू सॅमसनने शेवटपर्यंत खेळपट्टीवर राहून 52 चेंडूत 6 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 82 धावा झळकवल्या. सलामीचा यशस्वी जैस्वालने केवळ 12 चेंडूत 1 षटकार आणि चौकारांच्या मदतीने 24 धावा केल्या. सलामीचा बटलर दुसऱ्याच षटकात बाद झाला. नवीनुल हकने बटलरला राहुलकरवी झेलबाद केले. त्याने 9 चेंडूत 2 चौकारांसह 11 धावा केल्या. जैस्वाल पाचव्या षटकामध्ये मोहसीन खानच्या गोलंदाजीवर कृणाल पंड्याकरवी झेलबाद झाला. 5 षटकाअखेर राजस्थानने 2 बाद 49 धावा जमवल्या होत्या.

कर्णधार सॅमसन आणि रियान पराग यांनी संघाला सुस्थितीत नेताना तिसऱ्या गड्यासाठी 9.5 षटकात 93 धावांची भागीदारी केली. नवीनुल हकने परागला बदली खेळाडू हुडाकरवी झेलबाद केले. त्याने 29 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारांसह 43 धावा जमवल्या. बिश्नोईने हेटमायरला 5 धावावर झेलबाद केले. कर्णधार सॅमसन आणि ज्युरेल यांनी पाचव्या गड्यासाठी अभेद्य 43 धावांची भागीदारी केली. ज्युरेलने 12 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारांसह नाबाद 20 धावा केल्या.

राजस्थानला अवांतराच्या रुपात 8 धावा मिळाल्या. राजस्थानने पहिल्या पॉवर प्लेच्या 6 षटकात 54 धावा जमवताना दोन गडी गमवले. राजस्थानचे अर्धशतक 31 चेंडूत, शतक 64 चेंडूत तर दीडशतक 97 चेंडूत फलकावर लागले. सॅमसनने 33 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांसह आपले अर्धशतक झळकवले. राजस्थानच्या डावामध्ये 11 षटकार आणि 10 चौकार नोंदवले गेले. लखनौतर्फे नवीनुल हकने 41 धावात 2 तर मोहसीन खान आणि बिश्नोई यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

लखनौची खराब सुरुवात

प्रत्युत्तरादाखल खेळताना लखनौच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. पहिल्याच षटकातील चौथ्या चेंडूवर राजस्थानच्या बोल्टने सलामीच्या डीकॉकला बर्गरकरवी झेलबाद केले. त्याने 4 धावा जमवल्या. बोल्टने लखनौला पाठोपाठ दुसरा धक्का दिला. त्याने देवदत्त पडिक्कलचा खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळा उडवला. दुसऱ्या बाजूने गोलंदाजी करणाऱ्या बर्गरने बदोनीला एका धावेवर झेलबाद केले. लखनौची यावेळी स्थिती 3 बाद 11 अशी होती. कर्णधार केएल राहुल आणि हुडा यांनी चौथ्या गड्यासाठी 49 धावांची भर घातली. यजुवेंद्र चहलने हुडाला ज्युरेलकरवी झेलबाद केले. त्याने 13 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह 26 धावा जमवल्या.

कर्णधार राहुल आणि निकोलास पुरन यांनी पाचव्या गड्यासाठी 85 धावांची भागीदारी केल्याने लखनौला पुन्हा विजयाची आशा वाटू लागली. डावातील 17 व्या षटकात संदीप शर्माने राहुलला झेलबाद केले. त्याने 44 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 58 धावा जमवल्या. रविचंद्रन अश्विनने स्टोईनिसला 3 धावावर झेलबाद केले. पुरन आणि कृणाल पंड्या यांनी शेवटपर्यंत आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला, पण त्यांना यश मिळू शकले नाही. पुरनने 41 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 64 तर कृणालने नाबाद 3 धावा जमवल्या. लखनौला अवांतराच्या रुपात 14 धावा मिळाल्या.

लखनौने पॉवर प्लेच्या 6 षटकात 47 धावा जमवताना 3 गडी गमवले. लखनौचे अर्धशतक 39 चेंडूत, शतक 70 चेंडूत तर दीडशतक 102 चेंडूत फलकावर लागले. या सामन्यात लखनौ सुपरजायंट्सने डावातील 3.1 षटकांचा खेळ झाला असताना यश ठाकुरच्या जागी दीपक हुडाला इम्पॅक्ट खेळाडू म्हणून निवडले. लखनौच्या डावात 8 षटकार आणि 11 चौकार नोंदवले गेले. राहुलने अर्धशतक 35 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने तसेच पुरनने अर्धशतक 30 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने नोंदवले. राजस्थानतर्फे बोल्टने 35 धावात 2 तर बर्गर, रविचंद्रन अश्विन, चहल आणि संदीप शर्मा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

संक्षिप्त धावफलक : राजस्थान रॉयल्स 20 षटकात 4 बाद 193 (जैस्वाल 24, बटलर 11, संजू सॅमसन नाबाद 82, पराग 43, हेटमायर 5, ज्युरेल नाबाद 20, अवांतर 8, नवीनुल हक 2-41, मोहसीन खान 1-45, बिश्नोई 1-38).

लखनौ सुपरजायंट्स 20 षटकात 6 बाद 173 (डिकॉक 4, राहुल 58, पडिकल 0, बदोनी 1, हुडा 26, पुरन नाबाद 64, स्टोईनिस 3, कृणाल नाबाद 3, अवांतर 14, बोल्ट 2-35, बर्गर 1-30, आर. अश्विन 1-35, चहल 1-25, संदीप शर्मा 1-22).

Advertisement
Tags :

.