राजस्थान रॉयल्सचा मुकाबला आज ‘केकेआर’शी
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
राजस्थान रॉयल्स आज रविवारी येथे आयपीएलच्या महत्त्वाच्या सामन्यात गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सशी सामना करताना चार सामन्यांतील पराभवाचा सिलसिला तोडून पहिल्या दोन संघांमध्ये स्थान मिळविण्यासाठी उत्सुक असतील. 16 गुणांसह प्लेऑफमधील स्थान निश्चित केल्यानंतर रॉयल्सची कामगिरी घसरली असून मागील चार सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागलेला आहे.
मागील दोन सामन्यांमध्ये त्यांना फलंदाजीने दगा दिलेला असून 150 चा टप्पा ओलांडण्यात ते यशस्वी झालेले नाहीत. त्यातच इंग्लंडचा स्टार सलामीवीर जोस बटलर देशातर्फे खेळण्यासाठी मायदेशी परतल्याने रॉयल्सला फटका बसला आहे. पराभवाचा सिलसिला तोडायचा असेल, तर त्यांचे अव्वल तीन फलंदाज यशस्वी जैस्वाल, कर्णधार संजू सॅमसन आणि रियान पराग यांना अतिरिक्त जबाबदारी पेलावी लागेल.
दुसरीकडे, केकेआरने (19 गुण) त्यांचा अहमदाबादमधील गुजरात टायटन्सविऊद्धचा सामना पावसात वाहून गेल्यानंतर गुणतालिकेतील अव्वल स्थान निश्चित केले आहे. त्यांचा आत्मविश्वास वाढलेला असेल, परंतु त्याच वेळी त्यांना आत्मसंतुष्टतेपासून सावध राहावे लागेल. दरम्यान, त्यांनी फॉर्ममध्ये असलेला सलामीवीर फिल सॉल्ट गमावला आहे. हा इंग्लिश खेळाडू पाकिस्तानविऊद्धच्या मालिकेसाठी मायदेशी परतला आहे. केकेआरच्या सॉल्ट आणि नरेन या दोन सलामीवीरांनी 897 धावा केलेल्या आहेत. रहमानउल्ला गुरबाज याला सॉल्टच्या जागी संधी मिळण्याची शक्यता आहे. केकेआर आपली लय अबाधित ठेवण्यास उत्सुक असून याकामी कर्णधार श्रेयस अय्यर, रिंकू सिंग आणि आंद्रे रसेल यांच्यावर जबाबदारी असेल. या सामन्यातही पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
संघ-कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), के. एस. भरत रहमानउल्ला गुरबाज, रिंकू सिंग, अंगक्रिश रघुवंशी, शेरफेन रदरफोर्ड, मनीष पांडे, आंद्रे रसेल, नितीश राणा, व्यंकटेश अय्यर, अनुकुल रॉय, रमणदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, सुनील नरेन, वैभव अरोरा, चेतन साकारिया, हर्षित राणा, सुयश शर्मा, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, साकिब हुसेन, मुजीब उर रहमान, गस अॅटकिन्सन आणि गझनफर.
राजस्थान रॉयल्स : संजू सॅमसन (कर्णधार), आबिद मुश्ताक, आवेश खान, ध्रुव जुरेल, डोनोवन फरेरा, कुलदीप सेन, कुणाल सिंह राठोड, नांद्रे बर्गर, नवदीप सैनी, रविचंद्रन अश्विन, रियान पराग, संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, शुभम दुबे, रोवमन पॉवेल, टॉम कोहलर-कॅडमोर, ट्रेंट बोल्ट, यशस्वी जैस्वाल, युजवेंद्र चहल, तनुष कोटियन
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.