For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

आरसीबीचा पुन्हा एकदा स्वप्नभंग

06:58 AM May 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
आरसीबीचा पुन्हा एकदा स्वप्नभंग
Advertisement

एलिमिनेटर सामन्यात राजस्थानचा 4 गडी राखून विजय : शुक्रवारी होणार हैदराबादशी लढत

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या एलिमिनेटर सामन्यात राजस्थान रॉयल्सने आरसीबीचा चार गडी राखून पराभव केला. आरसीबीने दिलेले 173 धावांचे आव्हान राजस्थानने 19 षटकांतच पूर्ण केले. या विजयासह राजस्थानचा सामना दुसऱ्या क्वालिफायर लढतीत शुक्रवारी सनरायजर्स हैदराबादशी चेन्नईत होईल.  19 धावांत 2 बळी घेणाऱ्या आर.अश्विनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

Advertisement

173 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना यशस्वी जैस्वालने आक्रमक सुरुवात केली. त्याने 30 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने आठ चौकार लगावले. टॉम कोहलरने 20 धावा केल्या. कुल्हेरला फर्ग्युसनने बाद केले तर जैस्वाल फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात ग्रीनच्या गोलंदाजीवर बाद झाला. कर्णधार संजू सॅमसन (17) व ध्रुव जुरेल (8) फार काळ मैदानावर टिकले नाहीत. यानंतर रियान पराग व हेटमायर यांनी संघाचा डाव सावरला. परागने 26 चेंडूत 36 तर हेटमायरने 14 चेंडूत 26 धावांचे योगदान दिले. ही जोडी मोक्याच्या क्षणी बाद झाल्यानंतर पॉवेलने 8 चेंडूत नाबाद 16 धावा करत संघाला 19 व्या षटकात विजय मिळवून दिला. आरसीबीकडून मोहम्मद सिराजने 2 गडी बाद केले.

आरसीबीच्या पदरी पुन्हा निराशा

प्रारंभी, राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी कर्णधाराचा निर्णय सार्थ ठरवला. पॉवरप्लेमध्ये ट्रेंट बोल्टने भेदक मारा केला. बोल्टने पहिल्या तीन षटकात फक्त सहा धावा देत विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांना शांत ठेवले. पण विराटने दुसऱ्या गोलंदाजांचा समाचार घेतला. विराट आणि डु प्लेसिस यांनी 37 धावांची भागीदारी केली. डु प्लेसिसने 14 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी केली. डु प्लेसिसला बोल्टने बाद करत राजस्थानला पहिले यश मिळवून दिले. विराटने 33 धावांचे योगदान दिले. आपल्या या छोटेखानी खेळीमध्ये एक षटकार आणि तीन चौकार ठोकले. चहलने विराटला बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

सलामीची जोडी बाद झाल्यानंतर कॅमेरॉन ग्रीन आणि रजत पाटीदार यांनी डाव सावरला. ग्रीनने 21 चेंडूत 27 धावांचे योगदान दिले. ग्रीन धोकादायक होत होता, पण त्याचवेळी अश्विनने त्याला जाळ्यात अडकवले. दुसरीकडे रजत पाटीदार याने पिटाई सुरुच ठेवली. त्याने 22 चेंडूमध्ये 34 धावांची खेळी केली. 13 व्या षटकात ग्रीन बाद झाला. पाठोपाठ पुढील चेंडूवर अश्विनने मॅक्सवेलला तंबूचा रस्ता दाखवला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. यानंतर पाटीदारही 15 व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर बाद झाला. लागोपाठ विकेट गेल्याने आरसीबीची 5 बाद 122 अशी स्थिती झाली होती. यावेळी महिपाल लोमरोरने 17 चेंडूमध्ये 32 धावांची खेळी केली. दिनेश कार्तिकला फारसा प्रभाव दाखवता आला नाही. 11 धावा काढून तो बाद झाला. अखेरीस स्वप्नील सिंग आणि कर्ण शर्मा यांनी फटकेबाजी करत आरसीबीची धावसंख्या 170 पार पोहोचवली. आरसीबीने 20 षटकांत 8 बाद 172 धावा केल्या. राजस्थानकडून आवेश खानने 44 धावांत सर्वाधिक 3 गडी बाद केले.

संक्षिप्त धावफलक : आरसीबी 20 षटकांत 8 बाद 172 (विराट कोहली 33, डु प्लेसिस 17, कॅमरुन ग्रीन 27, रजत पाटीदार 34, महिपाल लोमरोर 32, कार्तिक 11, आवेश खान 44 धावांत 3 बळी, अश्विन 19 धावांत 2 बळी).

राजस्थान रॉयल्स 19 षटकांत 6 बाद 174 (यशस्वी जैस्वाल 45, टॉम कोहलर 20, रियान पराग 36, हेटमायर 26, पॉवेल नाबाद 16, मोहम्मद सिराज 2 बळी, फर्ग्युसन, कर्ण शर्मा व ग्रीन प्रत्येकी एक बळी).

विराटच्या आयपीएलमध्ये आठ हजार धावा, आणखी एका विक्रमाला गवसणी

राजस्थानविरुद्ध सामन्यात रनमशीन विराट कोहलीने आयपीएलमध्ये आणखी एका विक्रमाला गवसणी घातली आहे. एलिमिनेटर सामन्यात विराट कोहलीने 33 धावांची छोटेखानी खेळी केली, पण या खेळीतही त्याने नवा विक्रम केला आहे. विराट कोहलीने आठ हजार धावांचा पल्ला पार केला आहे. आयपीएलच्या इतिहासात आठ हजार धावा करणारा विराट कोहली पहिलाच फलंदाज आहे. विराट कोहलीच्या आसपास रोहित, धोनी अथवा इतर कोणताही फलंदाज नाही.  विराटने 252 सामन्यात 8004 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके आणि 55 अर्धशतकांचा समावेश आहे. दुसऱ्या क्रमांकावर शिखर धवनच्या नावे 6769 धावा आहेत तर तिसऱ्या स्थानी असणाऱ्या रोहित शर्माने 257 सामन्यात 6628 धावा केल्या आहेत.

आरसीबी आयपीएल जेतेपदापासून दूरच...

आयपीएलमध्ये आरसीबीने शानदार कमबॅक करत प्लेऑफमध्ये स्थान पटकावले होते. आरसीबीने लागोपाठ सहा सामन्यात विजय मिळवत प्लेऑफचं तिकिट मिळवले पण एलिमिनेटरचा अडथळा मात्र त्यांना दूर करता आला नाही. आरसीबीने आतापर्यंत नऊ वेळा प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे पण प्रत्येक वेळी त्यांना चषकावर नाव कोरता आले नाही. 17 वर्षानंतरही आरसीबीला चषक उंचावता आलेला नाही. तीन वेळा त्यांनी फायनलमध्येही धडक मारली, पण चषकापासून ते दूरच राहिले आहेत.

Advertisement
Tags :

.