राजस्थान, महाराष्ट्र यांना नाममात्र आघाडी
वृत्तसंस्था / राजकोट, थिरुवनंतपूरम
2025-26 च्या रणजी क्रिकेट हंगामाला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील राजकोटमध्ये सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर यजमान सौराष्ट्रने कर्नाटकवर पहिल्या डावात नाममात्र 4 धावांची आघाडी मिळविली आहे. तसेच थिरुवनंतपूरम येथे सुरू असलेल्या या स्पर्धेतील दुसऱ्या एका सामन्यात महाराष्ट्राने केरळवर 20 धावांची आघाडी पहिल्या डावात मिळविली आहे.
सौराष्ट्र आणि कर्नाटक यांच्यातील सामन्यात कर्नाटकाचा पहिला डाव 372 धावांवर आटोपला. त्यानंतर राजस्थानने 4 बाद 200 या धावसंख्येवरुन खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचे 9 गडी 342 धावांत बाद झाले. त्यामुळे कर्नाटकाला पहिल्या डावात आघाडी घेण्याची शक्यता वाटत होती. पण चेतन साकारीया आणि दोडीया शेवटच्या जोडीने चिवट फलंदाजी करत 34 धावांची भागिदारी केल्याने सौराष्ट्रने पहिल्या डावात 376 धावा जमवित कर्नाटकावर 4 धावांची नाममात्र आघाडी मिळविली. कर्नाटकाच्या श्रेयस गोपालने 110 धावांत 8 गडी बाद केले. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाअखेर कर्नाटकाने दुसऱ्या डावात 1 बाद 89 धावा जमविल्या. अगरवाल 31 तर पडिकल 18 धावांवर खेळत आहे.
महाराष्ट्राला आघाडी
थिरुवनंतपूरम येथे सुरू असलेल्या सामन्यात महाराष्ट्राने केरळवर पहिल्या डावात 20 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी मिळविली. महाराष्ट्राचा पहिला डाव 239 धावांत आटोपल्यानंतर केरळचा पहिला डावात 219 धावांपर्यंत मजल मारल्याने महाराष्ट्राला 20 धावांची आघाडी मिळाली. केरळच्या पहिल्या डावात संजू सॅमसनने 54 तर निझारने 49 धावा केल्या. महाराष्ट्रातर्फे गुरबानीने 2 तर सक्सेनाने 3 गडी बाद केले. शुक्रवारी तिसऱ्या दिवसाअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद 51 धावा जमवित केरळवर 71 धावांची आघाडी मिळविली आहे.
इंदौरमध्ये सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पंजाबविरुद्ध खेळताना मध्यप्रदेशने शुक्रवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाअखेर 8 बाद 519 धावा जमवित पंजाबवर 287 धावांची आघाडी मिळविली. रजत पाटीदार 205 धावांवर खेळत असून व्यंकटेश अय्यरने 73 धावा केल्या आहेत. अर्शद खान 7 धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी पंजाबचा पहिला डाव 232 धावांवर आटोपला होता.
संक्षिप्त धावफलक: राजकोट- कर्नाटक प. डाव 372, सौराष्ट्र प. डाव 376, कर्नाटक दु. डाव 1 बाद 89, थिरुवनंतपूरम-महाराष्ट्र प. डाव 239, केरळ प. डाव 219, महाराष्ट्र दु. डाव बिनबाद 51, इंदौर-पंजाब प. डाव 232, मध्यप्रदेश प. डाव 8 बाद 519 (रजत पाटीदार खेळत आहे 205, व्यंकटेश अय्यर 73, अर्शद खान खेळत आहे 60, प्रेरित दत्ता 4-145, नमन धिर 3-110)