For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रोमांचक सामन्यात राजस्थानचा 1 धावेने पराभव

06:53 AM May 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
रोमांचक सामन्यात राजस्थानचा  1 धावेने पराभव
Advertisement

रियान पराग नडला, पण एकटा पडला : विजयासह केकेआरच्या प्ले ऑफच्या आशा कायम 

Advertisement

वृत्तसंस्था/ ईडन गार्डन्स, कोलकाता

रविवारी ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा एका धावेने पराभव केला. केकेआरने 11 सामन्यांत पाचवा विजय मिळवला तर राजस्थानला 12 सामन्यात नववा पराभव पत्करावा लागला.  या सामन्यात कोलकाताने प्रथम फलंदाजी करत 206 धावा केल्या, प्रत्युत्तरात राजस्थानला 20 षटकांत 205 धावा करता आल्या. या सामन्यात, रियान परागने 95 धावांची खेळी केली, परंतु तो संघाचा विजय निश्चित करू शकला नाही. यासह, केकेआरने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

Advertisement

प्रारंभी, केकेआरने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला खरा पण त्यांच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर सुनील नरेन 11 धावा काढून आऊट झाला. पण, यानंतर रहमानउल्लाह गुरबाज आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी संघाची धुरा हातात घेतली आणि जलद धावा केल्या. गुरबाजने 25 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. रहाणेने 30 धावांचे योगदान दिले. रहाणेचा अडथळा रियान परागने दूर केला तर गुरबाजला थिक्षणाने माघारी पाठवले

आंद्रे रसेलचे तुफानी अर्धशतक

कर्णधार रहाणे व गुरबाज बाद झाल्यानंतर अंगकृष रघुवंशी आणि आंद्रे रसेल यांनी शेवटच्या षटकांमध्ये आरआरच्या गोलंदाजांना झोडपून काढले आणि चौथ्या विकेटसाठी 59 धावांची भागीदारी केली. रघुवंशीने 31 चेंडूत 5 चौकारासह 44 धावा केल्या. याचवेळी, रसेलने या हंगामात पहिल्यांदाच आपला जबरदस्त फॉर्म दाखवला आणि 25 चेंडूत 57 धावांची शानदार खेळी खेळली. यामध्ये 4 षटकार आणि 6 गगनचुंबी षटकार मारले. रघुवंशी बाद झाल्यानंतर रिंकू सिंगने 6 चेंडूत नाबाद 19 धावा करत रसेलला चांगली साथ दिली. यामुळे केकेआरने 20 षटकांत 4 गडी गमावत 206 धावा केल्या.

रोमांचक लढतीत राजस्थानच्या पदरी निराशा

केकेआरने विजयासाठी दिलेल्या 207 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकात वैभव सूर्यवंशीची विकेट गमावली. 4 धावा काढल्यानंतर आऊट झाला. त्यानंतर पदार्पण करणारा कुणाल राठोड खाते न उघडताच बाद झाला. येथून यशस्वी जैस्वाल आणि कर्णधार रियान पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी 58 धावांची भागीदारी केली. ही भागीदारी मोईन अलीने मोडली. त्याने यशस्वीला आऊट केले. यशस्वी जैस्वालने 21 चेंडूत 34 धावा केल्या. त्यानंतर मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने त्याच षटकात ध्रुव जुरेल (0) आणि वानिंदू हसरंगा (0) यांना आऊट करून राजस्थानची धावसंख्या 5 बाद 71 अशी केली. पण रियान पराग आणि हेटमायर यांनी सहाव्या विकेटसाठी 92 धावांची भागीदारी करत सामना रोमांचक मोडवर आणला. ही जोडी जमलेली असताना 29 धावांवर हर्षित राणाने हेटमायरला आऊट केले. त्यानंतर हर्षित राणानेही रियान परागलाही बाहेरचा रस्ता दाखवला. परागने 45 चेंडूत 8 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 95 धावा केल्या.

सामन्याच्या शेवटच्या षटकात राजस्थानला विजयासाठी 22 धावांची आवश्यकता होती. वैभव अरोराच्या त्या षटकात शुभम दुबेने दोन षटकार आणि एक चौकार मारून सामना रोमांचक बनवला. पण शेवटच्या चेंडूवर त्याला विजयासाठी आवश्यक असलेल्या तीन धावा करता आल्या नाहीत. शेवटच्या चेंडूवर दुसरी धाव घेत असताना जोफ्रा आर्चर धावबाद झाला. यामुळे राजस्थानला 205 धावांपर्यंतच मजल मारता आली. केकेआरने हा सामना एका धावेने जिंकला.

संक्षिप्त धावफलक

केकेआर 20 षटकांत 4 बाद 206 (गुरबाज 35, सुनील नरेन 11, अजिंक्य रहाणे 30, रघुवंशी 44, आंद्रे रसेल 25 चेंडूत नाबाद 57, रिंकू सिंग नाबाद 19, आर्चर, थिक्षणा, रियान पराग व युद्धवीर प्रत्येकी एक बळी)

राजस्थान रॉयल्स 20 षटकांत 8 बाद 205 (यशस्वी जैस्वाल 34, रियान पराग 45 चेंडूत 95, हेटमायर 29, शुभम दुबे नाबाद 25, मोईन अली, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती प्रत्येकी 2 बळी).

केकेआरच्या प्लेऑफच्या आशा कायम

केकेआर संघ सध्या गुणतालिकेत 11 गुणांसह सहाव्या स्थानावर पोहोचला आहे. केकेआरचे या हंगामातील अजून 3 सामने बाकी आहेत. प्लेऑफचे तिकीट मिळवण्यासाठी केकेआरला उर्वरित 3 सामने जिंकावे लागतील. पण असे झाले तरी त्यांना बाकीच्या संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागेल. केकेआरचे उर्वरित 3 सामने चेन्नई, हैदराबाद आणि आरसीबीविरुद्ध आहेत. प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर केकेआरला दमदार कामगिरीची आवश्यकता असेल.

Advertisement
Tags :

.