For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस्थानची केकेआरवर 2 गड्यांनी मात

06:58 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राजस्थानची केकेआरवर 2 गड्यांनी मात
Advertisement

बटलरचे शतक ठरले भारी, सुनीलची खेळी वाया, रियान पराग, पॉवेलची फटकेबाजी

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकात्ता

जोस बटलरच्या शानदार नाबाद शतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने कोलकात्ता नाईट रायडर्सवर शेवटच्या चेंडूवर थरारक विजय मिळवित या स्पर्धेत गुणतक्त्यातील आपले आघाडीचे स्थान 12 गुणासह अधिक भक्कम केले.

Advertisement

 

सलामीच्या सुनील नरेनने झळकविलेल्या शानदार शतकाच्या जोरावर कोलकात्ता नाईट रायडर्सने 20 षटकात 6 बाद 223 धावा जमवित राजस्थान रॉयल्सला विजयासाठी 224 धावांचे आव्हान दिले. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने 20 षटकात 8 बाद 224 धावा जमवित 2 गडी राखत शानदार विजय नोंदविला. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करत विजय मिळविणारा राजस्थान रॉयल्स संघ पहिला ठरला आहे. बटलरचे आयपीएल स्पर्धेतील हे 7 वे शतक असून विराट कोहलीने सर्वाधिक 8 शतके नोंदवली आहेत.

केकेआरच्या धावसंख्येच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना जोस बटलरची नाबाद शतकी खेळी राजस्थान रॉयल्सला शेवटच्या चेंडूवर विजय मिळवून देणारी ठरली. सलामीच्या जैस्वालने 9 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 19 धावा तर कर्णधार संजू सॅमसनने 8 चेंडूत 2 चौकारासह 12 धावा जमविल्या. जुरेल 2 धावावर तर रविचंद्रन अश्विन 1 चौकारासह 8 धावावर बाद झाले. वरूण चक्रवर्तीने आपल्या या षटकातील पहिल्या चेंडूवर अश्विनला तर दुसऱ्या चेंडूवर हेटमायरला खाते उघडण्यापूर्वी बाद केल्याने राजस्थानवर अधिक दडपण आले. बटलर आणि पराग यांनी तिसऱ्या गड्यासाठी 50 धावांची अर्धशतकी भागीदारी केली. परागने 14 चेंडूत 2 षटकार आणि 4 चौकारांसह 34 धावा फटकावल्या. पॉवेलने 13 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 26 धावा झोडपल्या. सुनील नरेनने त्याला पायचीत केले. बोल्ट बाद झाला त्यावेळी राजस्थानला विजयासाठी 38 धावांची जरूरी होती. बटलरने आक्रमक फटकेबाजी करीत संघाला विजय मिळवून दिला. बटलरने 60 चेंडूत 6 षटकार आणि 9 चौकारासह नाबाद 107 धावा झळकविल्या. राजस्थानच्या डावात 12 षटकार आणि 20 चौकार नेंदविले गेले.

राजस्थानने पॉवरप्लेच्या 6 षटकात 76 धावा जमविताना दोन गडी गमविले. राजस्थानचे अर्धशतक 29 चेंडूत, शतक 51 चेंडूत, दीड शतक 92 चेंडूत द्विशतक 110 चेंडूत फलकावर लागले. बटलरने आपले अर्धशतक 36 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने तर शतक 55 चेडूत 6 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने नोंदविले. राजस्थानच्या डावात 16 अवांतर धावा मिळाल्या. कोलकात्ता संघातर्फे हर्षित राणा, सुनील नरेन आणि वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 तर अरोराने 1 गडी बाद केला.

सुनील नरेनचे पहिले शतक

तत्पूर्वी, 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील मंगळवारी येथे खेळविण्यात आलेल्या 31 व्या सामन्यात राजस्थान संघाने नाणेफेक जिंकून कोलकत्ता संघाला प्रथम फलंदाजी दिली. सलामीच्या सुनील नरेनने टी-20 प्रकारातील आपले पहिले शतक झळकविले. सॉल्ट आणि नरेन यांनी डावाला सुरूवात केली. पण पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर परागने सॉल्टला जीवदान दिले. पण हे जीवदान अधिक महागडे ठरले नाही. आवेश खानने स्वताच्याच गोलंदाजीवर सॉल्टला टिपले. त्याने 13 चेंडूत 1 चौकारासह 10 धावा जमविताना सुनील नरेनसमवेत 21 चेंडूत 21 धावांची भागीदारी केली.

सुनील नरेन आणि रघुवंशी यानी दुसऱ्या गड्यासाठी 43 चेंडूत 85 धावांची भागीदारी केली. कुलदीप सेनने रघुवंशीला अश्विनकरवी झेलबाद केले. त्याने 18 चेंडूत 5 चौकारांसह 30 धावा जमविल्या. कर्णधार श्रेयस अय्यर अधिकवेळ खेळपट्टीवर राहू शकला नाही. त्याने 7 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 11 धावा जमविताना नरेनसमवेत तिसऱ्या गड्यासाठी 27 धावांची भर घातली. चहलने अय्यरला पायचीत केले. सुनील नरेनला रसेलकडून चांगली साथ मिळाली. रसेलने 10 चेंडूत 2 चौकारांसह 13 धावा जमविताना सुनील नरेनसमवेत चौथ्या गड्यासाठी 51 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. आवेश खानने त्याला झेलबाद केले. सुनील नरेनने आपल्याकडे फलंदाजीची सूत्रे अधिक वेळ राखल्याने कोलकात्ता संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडता आला. सुनील नरेन 18 व्या षटकात बाद झाला. त्याने 56 चेंडूत 6 षटकार आणि 13 चौकारांसह 109 धावा झळकविल्या. बोल्टने त्याचा त्रिफळा उडविला. रिंकू सिंगने 9 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 20 जमविल्या. कुलदीप सेनने वेंकटेश अय्यरला 8 धावावर झेलबाद केले. कोलकात्ता संघाच्या डावामध्ये 9 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले.

कोलकात्ता संघाने पॉवरप्लेच्या 6 षटकात 56 धावा जमविताना 1 गडी गमविला. कोलकात्ता संघाचे अर्धशतक 35 चेंडूत तर शतक 60 चेंडूत, दीडशतक 86 चेंडूत आणि द्विशतक 110 चेंडूत फलकावर लागले. सुनील नरेनने 29 चेंडूत 3 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक पूर्ण केले. तर त्याने आपले टी-20 मधील पहिले शतक 49 चेंडूत 6 षटकार आणि 11 चौकारासह झळकविले. सुनील नरेनने चहल आणि रविचंद्रन अश्विन यांच्या गोलंदाजीवर आक्रमक फटकेबाजी केली. त्याने चहलच्या चेंडूवर मिडविकेटच्या देशेने चौकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. त्यावेळी कोलकत्ता संघाचे मालक शाहरूख खान यांनी स्टॅन्ड्समधून सुनील नरेनला फ्लॉईंग किस दिला. राजस्थानतर्फे आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी 2 तर बोल्ट आणि चहल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. कोलकात्ता संघाला अवांतरच्या रूपात 21 धावा मिळाल्या त्यामध्ये 13 वाईड चेंडूचा समावेश आहे.

संक्षिप्त धावफलक : कोलकात्ता नाईट रायडर्स 20 षटकात 6 बाद 223 (सुनील नरेन 119, रघुवंशी 30, सॉल्ट 10, श्रेयस अय्यर 11, रसेल 13, रिंकू सिंग नाबाद 20, अवांतर 21, आवेश खान 2-35, कुलदीप सेन 2-46, बोल्ट 1-31, चहल 1-54).  राजस्थान रॉयल्स 20 षटकात 8 बाद 224 (जोस बटलर नाबाद 107, पराग 34, जैस्वाल 19, सॅमसन 12, पॉवेल 26, अवांतर 16, हर्षित राणा, सुनील नरेन, वरूण चक्रवर्ती प्रत्येकी 2 बळी, अरोरा 1-45,).

Advertisement
Tags :

.