For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राजस आणि तामसी भक्ती

06:50 AM Jul 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
राजस आणि तामसी भक्ती
Advertisement

अध्याय दहावा

Advertisement

भक्तांचे तीन प्रकार बाप्पा सांगत आहेत. सात्विक भक्त सर्वश्रेष्ठ असून त्याला ईश्वराकडून कोणतीही अपेक्षा नसते. परमात्मा किंवा त्याची कोणतीही विभूती हे त्याचे श्रद्धास्थान असते आणि त्याची प्राप्ती हे त्याचे अंतिम ध्येय असते. सात्विक मनुष्य समाधानी असतो. त्याचा परमातम्यावर अतूट विश्वास असतो म्हणून सात्विक भक्ती करणारे श्रेष्ठ असून ईश्वरप्राप्ती हे त्याचे ध्येय असते. सरळमार्गाने इच्छा पूर्ण झाल्यास ठीक. जर झाल्या नाहीत तर त्या आपल्या भल्याच्या नाहीत असे समजून स्वस्थ रहावे, हा त्याच्यादृष्टीने राजमार्ग असतो. जीवनात असं वागत गेल्याने त्यांचा नरकवास चुकतो. भक्तीच्या प्रकारातील ही सर्वश्रेष्ठ भक्ती होय. पुढील श्लोकात बाप्पा राजस भक्तांबद्दल सांगत आहेत.

राजसी सा तु विज्ञेया भक्तिर्जन्ममृतिप्रदा । यद्यक्षांश्चैव रक्षांसि यजन्ते सर्वभावत ।। 20।।

Advertisement

अर्थ-जन्म व मरण देणारी भक्ति ती राजसी भक्ति जाणावी. ती करणारे भावनापूर्वक यक्ष, राक्षस यांचे यजन करतात.

विवरण-राजस लोकांचे देहसुख मिळवणे हे यांचे ध्येय असते. नरकात मिळणाऱ्या दु:खाना भिऊन हे लोक अधर्माचरण करत नाहीत, पण यांना सत्ता व संपत्तीची फार हाव असते. यांच्या या अशा मनोवृत्तीमुळे त्यांची जन्ममृत्युच्या फेऱ्यातून सुटका होत नाही. राजस व्यक्तीला भोगविलास प्रिय असून ते मिळवण्यासाठी, काय वाटेल ते करायची त्याची तयारी असते. फार महत्त्वाकांक्षी असल्याने, यशाची व त्यामागून येणाऱ्या मानाची त्याला फार ओढ असते. राजस भक्त यक्ष, राक्षस आदींची भक्ती करत असतो. यक्ष हे कुबेराचे भाऊ मानले जातात. कुबेर हा संपत्तीचा द्योतक आहे. यक्षांची पूजा करणारा राजस भक्त हा संपत्तीचा पुजारी असतो. संपत्तीचा साठा करण्याकडे त्यांचा कल असतो. दुसऱ्या प्रकारचे राजस लोक राक्षस म्हणजे दुष्ट प्रवृत्तीची उपासना करत असतात. शक्ती, अधिकार आणि त्यातून येणारी आडदांड वृत्ती याचे राक्षस वृत्ती ही द्योतक होय. अशा लोकांना अधिकाराची हाव असते म्हणून राजस भक्तीचे लोक सत्ता आणि संपत्ती यांची आराधना करताना दिसतात. पुढील श्लोकात बाप्पा तामसी भक्ती करणाऱ्यांबद्दल सांगत आहेत.

वेदेनाविहितं क्रूरं साहंकारं सदम्भकम् ।

भजन्ते प्रेतभूतादीन्कर्म कुर्वन्ति कामुकम् ।। 21 ?

शोषयन्तो निजं देहमन्त:स्थं मां दृढाग्रहा ।

तामस्येतादृशी भक्तिर्नृणां सा निरयप्रदा ।। 22 ।।

अर्थ-वेदांना मान्य नसलेले, क्रूर, अहंकारयुक्त व दंभयुक्त कर्म तामसी स्वभावाचे लोक करतात ते प्रेत-भूते इत्यादिकांची भक्ति करतात. कामुक कर्म करतात, स्वत.चा देह व देहामध्ये स्थित असलेल्या म ला सुकवितात, दृढ आग्रहाने युक्त असतात, या प्रकारची भक्ति मनुष्यांना नरक देणारी आहे.

विवरण - तामसी लोक फक्त पृथ्वीवरील सुखाचीच अपेक्षा करतात ते परलोकाचा विचार सुद्धा करत नाहीत. ते प्रेत पिशाच्च यांची भक्ती करतात व हवे ते सर्व मिळवण्याचा प्रयत्न करतात. हे उतावळ्dया आणि भडक स्वभावाचे असतात. वेदशास्त्रामध्ये काहीही आधार नसलेली कर्मे ते आपण करतोय तेच बरोबर अशा दांभिक वृत्तीने रेटून नेतात. वृत्ती दांभिक असल्याने त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे असतात. यांच्या वासना भयंकर असतात. त्या अपूर्ण राहिल्याने मृत्यूनंतर ते भूतयोनीत राहतात. तेथेही ते दुष्टवृत्तीने इतरांना त्रास देत असतात. त्यांच्या या वृत्तीचा बाप्पांनाही त्रास होतो.कारण आत्मरुपाने बाप्पा त्याच्या शरीरात रहात असतात. तामसी लोक शारीरिक कष्ट म्हणजे तप समजतात. त्यामुळे ते शरीराला नाना प्रकारे छळत असतात. या त्यांच्या वर्तनाला कोणताही शास्त्राधार नसतो.                         क्रमश

Advertisement
Tags :

.