राजाराम महाराजांमुळे कोल्हापूरच्या शिक्षणाला दिशा
कोल्हापूर :
भारतातील राजे ज्यावेळी विलासी जीवन जगत होते. त्यावेळी राजाराम महाराज (दुसरे) हे कोल्हापुरात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत होते. कोल्हापूर हायस्कूलच्या माध्यमातून उभारणी करत त्यांनी खऱ्या अर्थाने कोल्हापूरच्या आधुनिक शिक्षणाला दिशा दिली, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक भारत महारुगडे यांनी केले.
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांच्या 154 व्या पुण्यतिथीनिमित्त राजाराम महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंतराव थोरात अध्यक्षस्थानी होते. महारुगडे म्हणाले, राजाराम महाराजांना अल्प कारकीर्दीत शिक्षणाचे प्रचंड मोठे कार्य केले. त्यांच्याच काळात पुणे-बंगळुरू रस्त्याचे काम झाले. शिरोलीजवळील लोखंडी पुलाला सहा लाख रुपयांचा निधी राजाराम महाराजांनी दिला होता. कोल्हापूर हायस्कूलची उभारणी करून कोल्हापूरला आधुनिक शिक्षणाची वाट दाखवली. राजाराम महाराजांचे ज्या ठिकाणी निधन झाले, त्या इटलीतील फ्लॉरेन्समध्ये त्यांचे स्मृतिस्थळ, त्यांच्या नावाने एक पूल उभारला आहे. इंग्लंडमधील एका नेमबाजी अकॅडमी असोसिएशनला राजाराम महाराजांनी निधी दिला होता. त्याची कृतज्ञता म्हणून या असोसिएशनने कोल्हापूर कप या नावाने स्पर्धा सुरू केली. ही स्पर्धा आजही इंग्लंडमध्ये सुरू आहे.
अध्यक्ष स्थानावरून डॉ. यशवंतराव थोरात म्हणाले, कोल्हापूरकरांनी राजाराम महाराज यांच्यासाठी काहीच केले नाही. राजाराम महाराजांची आठवण जागृत ठेवायची असेल तर राजाराम महाविद्यालयाने इटलीतील फ्लॉरेन्स विद्यापीठाबरोबर सामंजस्य करार करावा. यामुळे आपल्याकडील विद्यार्थ्यांना फ्लॉरेन्समध्ये शिक्षण घेता येईल, तेथील प्राध्यापक राजाराममध्ये येऊन ज्ञानदान करू शकतील. यासाठी आम्हीही सहकार्य करू. प्राचार्य डॉ. अनिता बोडके यांनी प्रास्ताविक केले. यावेळी उषा थोरात, बाळ पाटणकर, इतिहास अभ्यासक इस्माईल पठाण, सचिन मेनन, नंदिनी घाटगे उपस्थित होते. प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी प्रास्ताविक केले. दीपाली धावणे यांनी आभार मानले.